Monday, May 4, 2020

दभि : समीक्षेची चित्रलिपी उलगडताना

डॉ. द. भि. कुलकर्णी 

आपली अभिरुची व आपला आस्वाद यांच्या आधारे सामाजिक अभिरुची व साहित्य निर्मिती यांचा अन्वय लावणे, समाजाची अभिरुची विकसित करणे, साहित्यनिर्मितीला दिशा देणे, साहित्याच्या परंपरेत कलाकृतीची व लेखकाची स्थाननिश्चिती करणे हे समीक्षकाचे कार्य असते. मराठी साहित्य परंपरा कशी परपुष्ट होईल हा मर्ढेकर-नेमाडे यांच्याप्रमाणेच त्यांचाही ध्यास होता. वाचकाच्या अभिरुचीवर, लेखकाच्या प्रतिभेवर व निर्मितीवर संस्कार हे थोर समीक्षकाचे कार्य असते. ते दभिंनी आयुष्यभर व्रतस्थपणे केले.
----------------------------------------------------

वणीला बी. ए. ला शिकत असतानाच दै. ‘लोकमत’मधून डॉ. द. भि. कुलकर्णी यांचे ‘विहरणीच्या खुणा’ हे सदर वाचत होतो. समीक्षेची गंभीर मांडणी. सोपी भाषा. संवादी शैली. साहित्यातील एकेका तत्त्वाचे, प्रश्नाचे विवेचन; तेही पांडित्यपूर्ण नव्हे, तर अनुभूतिजन्य. सूत्रबद्ध मुद्देसूद विचार. पण त्यातील क्रम मात्र एकमेकांत मिसळलेला. मला साहित्याची आवड होती, समज नव्हती; पण या लेखकाजवळ वाचकाशी संवाद साधण्याची, त्याला आपल्या आस्वादात सामावून घेण्याची तीव्र तळमळ आहे, हे ते लेखन वाचून जाणवत असे. त्यातून येणारे वेगवेगळे विषय व आशयाची उत्सुकता. त्यातूनच या लेखकाबद्दल एक आदर, आकर्षण व किंचित दडपणही निर्माण झाले. पुढेमागे या लेखकाच्या संपर्कात येऊ असे स्वप्नातही वाटले नव्हते. ‘विहरणीच्या खुणा’ म्हणजे काय ते कळत नव्हते. माझा मित्र सतीश म्हणायचा, ‘‘अरे हे चुकीचे छापून आले आहे. ‘विरहिणीच्या खुणा’ असेच आहे ते!’’. ‘विरहिणी’ म्हणजे काय ते मात्र माहित होते, ‘विहरणीच्या खुणा’चा अर्थ मात्र पुढे महानुभावांचे साहित्य वाचले तेव्हा कळला. हरपाळदेवाच्या म्हणजे चक्रधरांच्या पत्नीला तिच्या सासू-सासऱ्यांनी त्या विचारलेल्या होत्या.  
१९९६ ला एम. ए. ला. नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात व वसतिगृहात प्रवेश घेतला. त्यावेळी दभि विभागातून निवृत्त झाले होते. त्यांच्या अध्यापनाची चर्चा व व्यक्तिमत्त्वाचा दबदबा परिसरात मात्र कायम होता. ‘साहित्यशास्त्र शिकवावे ते दभिंनीच’ असे सारे म्हणत. विद्यापीठात आहेस तर मग भेट तरी त्यांना, असे आमचे आमचे वणीचे सर सांगत. वणीच्या मी कार्यकारी संपादक असलेल्या ‘रंगस्वानंद’ दिवाळी अंकात त्यांच्या विद्यार्थिनी कल्पना पांडे-माळोदे यांनी दभिंवर लेख लिहिला होता. अंक घेऊन दभिंना भेटण्यासाठी मी व मित्र संजय, ‘सकाळ भेट वर्ज्य’ असल्याने संध्याकाळी गेलो. अंक दिला. सहा वाजता ते आम्हाला पायी फिरायला फुटाळा तलावाकडे घेऊन गेले. त्यांनीच आमचा परिचय करून घेतला. नाव, गाव, पुस्तके, वाचन, अभ्यासक्रमाचे स्वरूप विचारले. मीही त्यांना शब्दशक्ती, अस्तित्ववाद अशा काही संज्ञा विचारल्याचे आठवते. शेवटी सर म्हणाले, ‘माझ्या लेखनिकाला वृत्तपत्रात नोकरी लागली आहे, मला लेखनिक हवा आहे. तुमच्यापैकी कुणी ते काम केले तरी चालेल.’ दभिंचा लेखनिक होण्यासाठी खूप जण आतुर असत. मात्र त्याची काही एक पात्रता होती. त्याला सायकल असली पाहिजे. अक्षर व शुद्धलेखन चांगले हवे. शिवाय साहित्याची आवड हवी. यातले तिसरे सोडले तर मला सायकल नव्हतीच. अक्षर तर जोरदारच होते. त्यामुळे मी हा विचार मनातून काढून टाकला.
साधारणतः पंधरा दिवसांनी एका विद्यार्थाने मला दभिंचा लेखनिक होण्याचा निरोप दिला. मी सायकलची अडचण सांगितली. तर ‘बाहेरची पत्रे, झेरॉक्स वगैरे कामे जुनाच लेखनिक करेल, अक्षर व शुद्धलेखनाची जबाबदारी माझी’ असे सरांनी सांगितले. तेव्हापासून म्हणजे १९९६ ते २००२; नागपूर सोडेपर्यंत मी त्यांचा लेखनिक होतो. उणेपुरे सहा वर्ष. उणेपुरे यासाठी की कुठल्या कारणाने जाणे झाले नाही, तर धनंजय, दुलिराम, दीपक, नामदेव..कुणीही त्यांचे डिक्टेशन घेण्यास तयारच असे. या काळात मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, समीक्षानिर्मितिप्रक्रियेचा व विचार-लेखनप्रक्रियेचा जवळून परिचय झाला. आमच्यात कधी गैरसमज झाले नाही, वाद झाले नाही, कधी अंतराय पडला नाही. नोकरी, स्थलांतर या भौतिक कारणांनी दूर गेलो असलो, तरी संपर्क कायम होता. काही नवे वाचले, शंका असल्या तर मी त्यांना फोनवर वा भेटून विचारत असे. त्यांनाही काही नवीन सुचले तर ते फोन करून सांगत. लिहिले की फोनवरून वाचून दाखवत. त्याबद्दलच्या अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया जाणून घेत. ‘हे नको’ असे म्हटले की ते लगेच ते रद्द करत. ‘तुमच्यापेक्षा जास्त समजते’, ही वृत्ती त्यांच्यात नव्हती. विद्यार्थ्याचे विरोधी मतही ते मोलाचे मानत. त्यातून तास-दीडतास चर्चा होत. त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चा रेकॉर्ड करायला हव्या होत्या, असे आज तीव्रपणे वाटते. कायम ज्ञानाची ओढ व नव्याचा ध्यास हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू होते. एकेकदा ते गमतीने म्हणत, ‘चला, खूप विचार केल्यानंतर आता आपल्या लक्षात येतेय की विचार करण्यात अर्थ नाही’. 
सर पहाटे चारला उठत. अंघोळ करून वाचत असत किंवा लिहित. नागपूरला दीपक रंगारी अगदी पहाटे त्यांच्याकडे जाऊन डिक्टेशन घेत असे. खूप महत्त्वाचा लेख असेल, त्यांना स्फुरण असेल तर क्वचित मलाही पहाटे बोलावत. डिक्टेशनला बोलावले असेल तर ते ठरलेल्या वेळी तयारच असत. लेखनिकाला त्यांनी कधी वाट पाहायला लावले नाही. कारण ते आविष्काराला आतुरच असत. ‘आविष्कारातुरता’ हा वाङ्मयीन गुणच आहे आणि तो कादंबरीकार वि. स. खांडेकरांकडे कसा होता, याचे विवेचन त्यांनी ‘कादंबरी: स्वरूप आणि समीक्षा’ या ग्रंथात केले आहे. ‘आविष्कारातुरता’ निर्मितिप्रक्रियेच्या उत्कटतेतून येते असे त्यांचे प्रतिपादन होते. ‘निर्मितिप्रक्रियेची उत्कटता हे उत्तम कलाकृतीचे एक लक्षण आहे’, असे म्हणून आशयातील उत्कटता वेगळी, अभिव्यक्तीची उत्कटता वेगळी आणि निर्मितिप्रक्रियेतील उत्कटता कशी वेगळी असते; तिचे लक्षण काय, असे  सविस्तर विवेचनच त्यांनी केले आहे. (पस्तुरी: २६ ते ३०) ज्ञानेश्वर- तुकाराम, मर्ढेकर-जी.ए., ग्रेस- चित्रे- नेमाडे आदींच्या लेखनात ही उत्कटता कशी आहे, हे त्यांनी वेळोवेळी सांगितले. ही उत्कटता प्रतिभेचा गुण असतो आणि तो व्यासंग, स्फूर्ती, प्रज्ञा, आत्मनिष्ठा यांच्या साह्याने फुलतो, असे त्यांनी जे म्हटले आहे; ते त्यांच्या समीक्षेबद्दलही खरे होते. 
डिक्टेशनसाठी कोरे कागद पॅडला आधीच नीट लावून ठेवलेले असत. बैठक स्वच्छ असे. सर प्रसन्न असत. गेलो की मीच अगरबत्ती लावत असे. देवासाठी नाही; प्रसन्न व सुगंधी वातावरणात डिक्टेशन घेता यावे म्हणून. डिक्टेशन घेणे म्हणजे नवशिक्या गायकाने तंबोरे जुळवत शिकत मग गायनाला विलंबित व द्रुत लयीत सुरुवात केल्यासारखे असते. मन प्रसन्न व एकाग्र करत, कागद, पेन व हात यांत योग्य अंतर राखत, लेखकाची गती पकडत, पूर्ण विधान ध्यानात ठेऊन लिहिणे; ते करताना शुद्धलेखनाच्या चुका होणार नाही, अक्षरांचे वळण व लय बिघडणार नाही, याची काळजी घेणे. लेखनिकाची ही अनुभूती इथून पुढे सेल्फीच्या जमान्यात येणे शक्य नाही. ही एक गुरुकुलातली ज्ञानपरंपरा होती. यांत गुरूच्या व्यक्तिमत्त्वाच्या, परस्पर आंतरक्रियेचा आणि प्रभावाचा योग जुळून येत असे. असो. दोन्ही बाजूनी समास सोडून, शीर्षक दोनदा अधोरेखित करून, मग एक ओळ सोडून दभिंचे नाव व दोन ओळी सोडून परिच्छेद करून पहिले वाक्य लिहावयाचे. सर समोरच्या खुर्चीवर वा बैठकीवर बसून डोळे बंद करून किंवा दोन भुवयांच्या मध्ये  बोटांच्या चिमटीने पकडून सांगत, ‘श्री ज्ञानेश्वरानी...’.
लहान मुलाला पत्ता समजावून सांगावा तसे ते एकेक शब्द ऱ्हस्व-दीर्घासहित उच्चारत. शब्द, वाक्य, उपवाक्य, सगळी विरामचिन्हे, परिच्छेद यांसह सांगत. त्याकडे बारकाईने लक्ष देऊन तसा शब्द लिहायचा. लेखनिकाची गती तेच पकडत त्यामुळे पुन्हा वाक्य सांगावे लागत नसे. मध्ये कधीही व कितीही थांबलो, शंका विचारली तरी; एवढेच नव्हे तर, अर्धवट राहिलेले डिक्टेशन दुसऱ्या दिवशी पुन्हा दिले तरी ते आधीचे वाक्य मुखपाठ सांगत. त्यापुढे असे लिहा म्हणत. त्यांचे विचार, आकलन अत्यंत स्पष्ट असे. स्फूर्ती असल्याशिवाय, उत्कटतेशिवाय व आतून जाणवल्याशिवाय ते कधी लिहित नसत. आविष्कारातुरता व निर्मितिप्रक्रियेची उत्कटता म्हटले ती हीच. त्यामुळे जरी सदरलेखन असले तरी दोन तीन लेख आगाऊ जमा करून मगच सदर छापायला परवानगी देत. कुणी सांगितले, कुणी मागितले, परिचयाचे, जवळचे असे कुठलेही लौकिक नाते त्यांच्या समीक्षा लेखनात प्रवेश करू शकत नसे. बाह्य कारणाने त्यांनी कधीच समीक्षा लिहिली नाही. त्यांच्या समीक्षेची निर्मितिप्रक्रियाच वेगळी होती. ते चौफेर वाचत. साहित्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, विज्ञान, अध्यात्म, ज्योतिष्य, तत्त्वज्ञान, सगळे साहित्यप्रकार; प्राचीन अर्वाचीन साहित्य, अगदी मेंदुविज्ञान, जनुकशास्त्र ते स्थापत्यकला... कोणतीही ज्ञानशाखा त्यांना वर्ज्य नव्हती. त्यांचे चिंतन सतत चालू असायचे आणि ज्या दिवशी आतून जाणवत असे त्या दिवशी ते सलग डिक्टेशन देत; मग कितीही वेळ लागू दे. त्यामुळे संध्याकाळी चार ते सहा अशी माझी वेळ असली तरी कधी रात्री दहा वाजत. तर कधी पूर्ण सुट्टी. ती नोकरी नव्हती, साधना होती. त्यामुळेच सायकल, अक्षर ही पात्रता नसूनही त्यांनी मला लेखनिक म्हणून निवडले? 
डिक्टेशन देताना थकवा आला तर मध्येच उठून दोरीवरील कपडे गोळा करणे, झाडांना पाणी घालणे अशी कामे ते करीत. ते म्हणायचे, ‘या कामात आपला मेंदू गुंतलेला नसतो त्यामुळे चिंतन चालूच असते. शरीरालाही बदल मिळतो. कामात बदल म्हणजेच विश्रांती.  चिंतन मुरले तरच आतून काहीतरी नवे सुचते. तीच स्फूर्ती. आविष्कातुरता. हे आकलन प्रातिभ नसेल, नुसते बौद्धिक असेल तर मात्र लेखनात उत्कटता येत नाही, शैली रुक्ष होते. प्रातिभ स्फुरण हीच श्रेष्ठ साहित्याची अट असते, असे ते म्हणत. हे त्यांच्याच लेखनालाही लागू होत असे. आस्वादकाजवळ ‘विमलप्रज्ञा’ असावी असे अभिनवगुप्त म्हणतो. नवनवोन्मेशशालिनी प्रज्ञा –प्रतिभा असेल तरच कलाकृतीत नावीन्य येते, असे त्याचे म्हणणे होते. त्यामुळेच काव्याचा आस्वाद कुणालाही येत नाही. कारण तो तार्किक नसतो. निव्वळ बुद्धी असेल तर तो आस्वादक कवितेला तर्क लावील. तर्क शास्त्राच्या आकलनासाठी आवश्यक आहे, साहित्याच्या नाही, असे सरांचे प्रतिपादन होते. त्यामुळे ‘विमलप्रज्ञा’ ही आस्वादाची अट व नवनवोन्मेशशालिनी प्रज्ञा ही आविष्काराची अट असते. ही दोन्ही तत्त्वे त्यांच्याच समीक्षेत आहेत. त्यामुळेच त्यांच्या समीक्षेत रुक्षता, तर्ककठोरता नव्हती. निबंधवजा शैली नव्हती. ते आस्वादातून तत्त्वाचा शोध घेत. तत्त्वासाठी आस्वाद पणाला लावीत नसत. 
‘समीक्षा आणि निबंध’ या लेखात दभिंच्या या गुणाचा प्रत्यय येतो. ‘निबंध हा साहित्यप्रकार लेखकाच्या बौद्धिक शक्तीचा आविष्कार असतो; सामाजिक गरज, व्यावसायिक निकड किंवा विरंगुळा किंवा बौद्धिक हालचाल म्हणून तो (लेखक) या किंवा त्या विषयाकडे वळेल...काही पक्षी खडे खातात ते त्यांच्या साह्याने अन्नपचन होते म्हणून, ते त्यांना आवडतात किंवा पचतात म्हणून नव्हे...याच्या उलट, साहित्य हा समीक्षकाचा ध्यास असतो...यांच्या मनात साहित्यविषयक समस्या आहेत, साहित्यविषयक जिज्ञासा आहे; त्यासंदर्भात एक अश्वस्थता आहे...ही अश्वस्थता त्यांना समीक्षालेखनास प्रवृत्त करते. त्यांची समीक्षा त्यांच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा हुंकार असतो...साहित्याच्या आस्वादातून साहित्याच्या निर्मितिप्रक्रियेपर्यंत पोहोचण्याची त्यांना निकड असते. (प्रतीतिभेद: ६/७) असे त्यांनीच म्हटले आहे. समीक्षेची निर्मितिप्रक्रियाच त्यांनी इथे उलगडली आहे. तीच त्यांच्याही समीक्षेची प्रक्रिया होती. 
या विवेचनातून त्यांनी समीक्षकाचे प्रकार ठरवले आहेत: ‘निबंधकार समीक्षक’ व ‘सर्जनशील समीक्षक’. यातील पहिल्या प्रकारात त्यांनी, डॉ. रा. शं. वाळिंबे, डॉ. रा. भा. पाटणकर, प्रा. म. वा. धोंड यांचा समावेश केला; तर दुसऱ्या प्रकारात श्री. के. क्षीरसागर, दि. के. बेडेकर, कुसुमावती देशपांडे, वा. ल. कुलकर्णी, गंगाधर गाडगीळ यांचा समावेश केला होता. खरे तर ही वर्गवारी आस्वादप्रधान, आकलनसापेक्ष होती; त्यात हेवा किंवा द्वेष नव्हताच. हे निबंधकार ‘आपल्या बौद्धिक व्यायामासाठी विषयाचा वापर साधने म्हणून करतात. विषयाचा फडशा पडून झाला की त्यापासून वेगळे होतात’, अशी टीकाही त्यांनी केली आहे. यापेक्षा एक तिसरा समीक्षकांचा वर्ग ते मानत – ‘प्रक्षुब्ध समीक्षक’. यात त्यांनी वि. का. राजवाडे, बा. सी. मर्ढेकर व भालचंद्र नेमाडे यांचा समावेश केला होता. अर्थात या तिसऱ्या वर्गवारीबद्दल त्यांनी कुठे स्वतंत्र लिहिल्याचे आठवत नाही, मात्र माझ्या एम. फिल.च्या प्रबंध-रूपरेषेसाठी त्यांनी पहिले प्रकरण हेच सुचवले होते. माझा विषय ‘भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यविचार’ असा होता. तेव्हा पूर्वपक्ष म्हणून ‘अभ्यासक समीक्षक’ व ‘सर्जनशील समीक्षक’ असे विवेचन करून नेमाडे हे ‘प्रक्षुब्ध समीक्षक’ कसे आहेत, ते सांगावे अशी ही रूपरेषा होती. ‘मराठी साहित्यविचार व व्यवहाराला नवे वळण या प्रक्षुब्ध निबंधानी व लेखकांनीच लावलेले आहे. अशा निबंधांचे तुम्ही संपादन करा’ असेही ते म्हणत. 
ही त्यांची वर्गवारी म्हणजे मराठी समीक्षेच्या परंपरेची व्यवस्थिती होती. मराठी कवितेत जशा दोन परंपरा त्यांनी सांगितल्या. तशा मराठी समीक्षेच्या तीन प्रवृत्ती आहेत, हे त्यांचे सूत्र खरेच महत्त्वाचे होते. ‘सर्जनशील समीक्षा समजून घ्यायची असेल तर तुम्ही कुसुमावती, मर्ढेकर, वा. ल., गाडगीळ वाचा’ असे ते म्हणत.  दभि स्वत: याच परंपरेतील  समीक्षक होते.  काखेत त्यावेळी जे पुस्तक असेल, तेच विचार व तत्त्वे त्यावेळच्या आस्वादाला लावणे त्यांना मान्य नव्हते. रा. भा. पाटणकर यांच्या समीक्षेबद्दल त्यांचे असेच मत होते. माडखोलकर, कमल देसाई, मुक्तिबोध व अपूर्ण क्रांती या पाटणकर यांच्या ग्रंथांकडे पाहिले की, त्यात स्वअभिरुचीचा शोध दिसत नाही; परस्पर अभिरुची असणारे लेखक एकाचवेळी कसे आवडू शकतात, असा दभिंचा आक्षेप होता. सर्जनशील समीक्षकाची पुढची समीक्षा त्याच्या आधीच्या लेखनाचा विस्तार असतो किंवा पुढचा शोध तरी असतो किंवा नवे आकलन असते, असावे असे ते मानत. त्यामुळेच ज्ञानेश्वर- तुकाराम, मर्ढेकर, म. म. देशपांडे हे कवी. मोहन राकेश, पु. शि. रेगे  हे कादंबरीकार या त्यांच्या आवडीच्या लेखकांवर ते वारंवार पण दरवेळी नवे लिहित असत. 
त्याच त्या कलाकृती व त्याच लेखकाचे पुढचे आकलन ते मांडत असत. त्यामुळे ‘सावित्री’ व ‘रणांगण’ या कादंबऱ्यांवर, पु. शि.-बेडेकर-जी.ए. या लेखकांवर त्यांनी वारंवार लिहिले. ‘सुरेश भट नवे आकलन’, ‘अनन्यता मर्ढेकरांची’ हे ग्रंथ, किंवा ‘कणा’, ‘जोगिया’ अशा कविता, नेमाडे यांच्या कादंबऱ्या, यांच्यावर नवे नवे भाष्य ते करत राहिले. आस्वादाशी प्रामाणिक राहून आपल्या प्रतीतीचा दरवेळी नव्याने शोध घेत, तिला कठोरपणे तपासत त्या त्या प्रतिभावंताच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर व संदर्भात शोध घेत ते लिहित असत. हे त्यांच्या सर्जनशील समीक्षेचे असाधारण वैशिष्ट्य होते. अशी समीक्षा मराठीत दभिंनीच लिहिली. एरव्ही मराठी समीक्षा विषयवारीने, लेखकानुसारी व ग्रंथानुसारी असते. दभिंनी तिला प्रतीतिनिष्ठ केले, अभिरुचिनिष्ठ केले हे त्यांचे मराठी समीक्षेला योगदान होय. 
यामुळे एक झाले. ज्या वाचकांचे हे लेखक व त्या साहित्यकृती आवडीच्या होत्या, ते दभिंचे चाहते झाले. समीक्षेला त्यांनी असे लोकप्रिय बनवले, अभ्यासकाच्या मैफिलीतून सामान्य माणसांच्या ओसरीपर्यंत नेले.  क्षीरसागर- पाटणकर यांच्या ग्रंथांचे असे झाले नाही, ते विद्वतजणांच्या ग्रंथालयातच राहिले. ज्ञानेश्वरांवरच तर दभिंनी कितीतरी वेगवेगळ्या पैलूने लिहिले. हा त्यांच्या विमलप्रज्ञेचा आविष्कार होता. या शोधात दरवेळी ते नवे व अपूर्व आकलन मांडत असत. उदा. ज्ञानेश्वरांच्या सर्व साहित्यात एक संवादयुग्म आहे- ज्ञानेश्वरीत गुरु-शिष्य संवाद, चांगदेव पासष्टीत मित्रसंवाद, अभंगात लोकसंवाद व अमृतानुभवात आत्मसंवाद आहे, हे त्यांचे असेच नवे आकलन. किंवा ‘अकार चरण युगुल | उकार उदर विशाल | मकर महामंडल | मस्तकाकारे’ या ओवीत ओंकाररूप गणेशाचे दृश्यरूप कसे आहे, यासाठी त्यांनी ज्ञानदेवांचा ॐ हा असा आडवा नसून उभा (ॐ) आहे हे सांगितले. ‘अकार’ म्हणजे गणेशाचे दोन पाय, ‘उकार’ म्हणजे उदार-पोट व ‘मकार’ म्हणजे मस्तक होय. शब्दरूप ॐ मध्ये ज्ञानदेवांना दृश्यरूप गणेशाचा साक्षात्कार कसा होतो, हे त्यांचे विवेचनही अपूर्व व मौलिक होय. (ज्ञानेश्वरांचे श्रोतृसंवाद ) त्यांच्या आधी हे कोणी सांगितले नाही. इतरांचे जे वाचले ते दभि सांगत नसत, ते ज्ञान पचवून त्या आधारे जे कोणालाच जाणवले नाही ते असे ते पहिल्यांदा सांगत असत. शिवाय ते सोप्या, ओघवत्या, चिंतनपर व रसरसत्या जिवंत शैलीने सांगत. त्यांचा ‘पस्तुरी’ (२००२) हा ग्रंथ याची साक्ष आहे. सामान्य व विदग्ध अशा दोन्ही वाचकाला तो आकृष्ट करतो. सोपेपणा आणि रसाळपणा - साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ अशी विरुद्ध वैशिष्ट्ये त्यांच्या या लेखनात एकत्र दिसतात. 
तीच गोष्ट ‘हिमवंतीची सरोवरे’ (१९९६) या ग्रंथाची. हा ग्रंथ संपादित लेखांचा असल्याने ‘बेस्ट ऑफ दभि’ असा आहे. चित्रे, मुक्तिबोध, तांबे, तुकाराम, महाकाव्य, मुक्तछंद असे कवितेवरील; तसेच ‘बंदूक आणि देवदास’, ‘तिसऱ्यांदा रणांगण’, ‘स्वामी’ आणि ‘कादंबरीसमीक्षा’ हे कादंबरीवरील व ‘युगदर्शन’ हा समकालीन साठोत्तरी साहित्यप्रवाहातील प्रवृत्तीविशेषांवरील लेख, हे महत्त्वाचे व एकदम नवी मांडणी करणारे आहेत. ‘युद्धोत्तर काळातील मराठी संवेदनशीलतेचे दर्शन चित्रे, कोलटकर, नेमाडे, ग्रेस यांच्या साहित्यातून दिसते’, ‘वीरयुगात महाकाव्य निर्माण होतात, आज वीरयुग नाही म्हणून महाकाव्ये निर्माण होत नाही’. ‘नाट्यकलेत संवेदना असूनही त्या स्वयंभू म्हणून वावरत नाहीत’, ‘स्वामी कादंबरीत कसलीच व्यामिश्रता नाही’, ‘कादंबरीत कथातत्त्व-घटनांची काळानुसार जुळणी आणि कथाबंध-घटनांमधील कार्यकारणभाव ही दोन तत्त्वे असतात’ ‘मुक्तिबोधांच्या काव्यात समाजविरह आणि आत्मकेंद्रितता हे दोन ध्रुव आहेत’--अशी या ग्रंथात नोंदवलेली निरीक्षणे दभिंच्या मर्मज्ञतेची द्योतक आहेत. हा ग्रंथ वाचून हृदयनाथ मंगेशकर इतके प्रभावित झाले होते; ते म्हणायचे, ‘डॉक्टर, तुमचे हे पुस्तक माझे फार आवडते आहे. माझ्याजवळ कायम असते’. असे म्हणून त्यांची त्यांच्या शबनममधून ते लगेच काढून दाखवले. त्याच वर्षी दभिंना ‘वाग्विलासिनी’ पुरस्कार मिळाला होता. 
जाडजूड ग्रंथ व पांडित्यपूर्ण विवेचन अशा निर्मितिपेक्षा टिपणवजा ठिणगीसारख्या स्फुट समीक्षेतूनच दभि आपले आकलन मांडत राहिले. मर्ढेकर-कुसुसुमावती, गाडगीळ यांनीही तर तेच केले होते. अरुण जाखडे, अक्षयकुमार काळे सर म्हणायचे, सरांनी एकेका विषयाला धरून ग्रंथ लिहावे. मी सांगितल्यावर म्हणाले, ‘मी ते काम ‘महाकाव्य: स्वरूप आणि समीक्षा’, ‘मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र: पुन:स्थापना’, ‘दोन परंपरा’, ‘नाटक: स्वरूप आणि समीक्षा’, ‘कादंबरी: स्वरूप आणि समीक्षा’, या ग्रंथातून केले आहेच. आता आस्वादातून तत्त्वाचा शोध सांगणे जास्त गरजेचे आहे’. अर्थात यातील पहिले तीन ग्रंथ सोडले तर बाकी ग्रंथ म्हणजे लेखसंग्रह आहे, फक्त ते एका साहित्यप्रकारावरचे आहे इतकेच. म्हणजे त्यातही तत्त्व-सूत्र आणि मग विवेचन असे नाहीच. भराभर बाह्य संदर्भ देऊन ग्रंथाचे वजन वाढवण्यापेक्षा आपल्या अनुभूतीशी प्रामाणिक राहूनच लेखक-कलाकृतीच्या नवनव्या सत्याचा व सत्त्वाचा शोध घेत राहणे, हा त्यांच्या समीक्षेचा गुण होता. पण त्यामुळे प्रकल्पवजा काम त्यांच्या हातून घडले नाही. विशेषत: ‘ज्ञानेश्वर-तुकाराम आंतरिक अनुबंध’ हा एक प्रकल्प त्यांना करावयाचा होता. शिवाय ‘वाङ्मयीन सापेक्षतावाद’ हा नवा साहित्यसिद्धांत त्यांना मांडावयाचा होता. या दोन्ही गोष्टींना मराठी वाचक मुकलाच. नाही म्हणायला त्यांनी ‘नवअलौकिकतावादा’ची मांडणी केली आहे; मात्र तीही  स्फुटलेखातूनच झाली आहे. 
डॉ. श्यामला मुझुमदार यांनी ‘अलौकिकतावाद आणि नवअलौकिकतावाद’ या (नवभारत,मार्च-एप्रिल, २०१०) तसेच ‘नवअलौकिकतावादाचा प्रारंभ-दभि’ (समीक्षेची क्षितिजे, २०१०) या लेखांतून मात्र दभिंच्या नवअलौकिकतावादाची मांडणी केली आहे. नवअलौकिकतावादात दभिंनी अभिनवगुप्ताच्या ‘व्यंग्यार्थ’ व मर्ढेकरांच्या ‘घाट-लय’ सिद्धांताची सांगड घातली आहे. त्यासाठी त्यांनी ‘साहित्यकृतीतील अर्थव्यूह’ ही संकल्पना मांडली आहे. साहित्यकृतीत व्यंग्यार्थ असतो म्हणजे काय, तर तिच्यात ‘अर्थाचा अर्थ’ असतो. तिच्या आस्वादातून रसिकाला अर्थसमृद्धी मिळते, असे अभिनवगुप्त म्हणतात; तर साहित्यकृतीत आशय लयतत्त्वातून घाटाचे रूप धारण करतो, असे मर्ढेकर म्हणतात. आता अभिनवगुप्त म्हणतात त्या ‘अर्थाचा स्फोट’ (व्यंग्यार्थ) व मर्ढेकर म्हणतात ते ‘आशयाला संघटनारूप प्राप्त होणे’ (घाट) यांची जुळणी कशी करायची? तर त्याची उकल दभिंनी ‘व्यूह’ या संकल्पनेने केली. हाच त्यांचा नवअलौकिकतावाद – 
‘संपूर्ण कलाकृतीत व्यंग्यार्थ सुटा व विस्कळीत नसतो; तिच्यात व्यंग्यार्थाचा एक व्यूह असतो. तो शब्द, अलंकार, प्रतिमा, प्रतीक, यांतून साकारला जातो. या लहान लहान घटकांचे अनंत व्यूह साहित्यकृतीत जिवंत असतात त्यातून रसिकाला नवीन अर्थ भावतो. त्याचा एक मोठा व्यूह होतो. म्हणून साहित्यकृतीची भाषा ही व्यूहाची भाषा आहे. व्यंग्यार्थात हे जे अनंतव्यूह असतात, ते मात्र मर्ढेकर मानतात तसे केवळ संवाद, विरोध, समतोलात्मक नसतात. या व्यूहांचे एक ऊर्जाकेंद्र असते. मात्र ते साहित्यकृतीच्या केंद्रस्थानी नसते, ते कलाकृतीत कुठेही असते. केंद्रापासून घाटापर्यंत साहित्यकृतीच्या परिसरात लयतत्त्व कार्य करते. लयतत्त्वाला या उर्जाकेंद्रातूनच आकृती (घाट) मिळते. अशाप्रकारे साहित्यकृतीत आशयाची संघटना असते, निव्वळ आकृतीची नाही.’ (श्यामला मुजुमदार, नवभारत, मार्च-एप्रिल, २०१०: ४१ ते ५४)
            अशा व्यूहात्मक साहित्यकृतीचे तत्त्व दभिंनी आपल्या नवअलौकिकतावादातून मांडले आहे. अभिनवगुप्ताने मर्ढेकरी सौंदर्यशास्त्र अभ्यासणे शक्यच नव्हते; पण मर्ढेकरांना भारतीय साहित्यशास्त्र अभ्यासणे सहज शक्य होते. ते त्यांनी केले असते तर, साहित्यकृतीतील आशयसापेक्ष ‘व्यंग्यार्थ’ व आकृतिसापेक्ष ‘लय’ यांचा पेच सुटला असता. ‘मर्ढेकर भारतीय साहित्यशास्त्रातील अलौकिकतावादाकडे वळले असते तर ...प्रसरणशील अर्थ, लय, सौंदर्य व जीवनमूल्ये यांच्या यथार्थ संबंधाचे चित्रही त्यांना नेमकेपणाने उभे करता आले असते. त्यांच्या लयाश्रित सौंदर्यशास्त्राला नवी विविध परिमाणे प्राप्त झाली असती.’ (मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना, प. आ.) असे दभिंनी म्हटले आहे. त्यामुळे मर्ढेकरी सौंदर्यशास्त्रात असलेली उणीव दभिंनी नवअलौकिकतावाद मांडून दूर केली आहे. त्यांनी अभिनवगुप्त व मर्ढेकर दोन्ही अभ्यासून त्यांचा समन्वय साधला आणि समीक्षेतील कलावाद-जीवनवाद, अलौकिकतावाद- अलौकिकतावाद हा पेच सोडवण्याचा प्रयत्न केला. इथे दभिंचे मर्ढेकरांशी मतभेद आहेत. मात्र ते नोंदवून मर्ढेकरांच्या सौंदर्यशास्त्रावरील ‘आकृतिवादा’च्या आरोपाला उत्तरही दिले आहे. 
या सिद्धांतातून दभिंनी जीवनमूल्ये व कलामूल्ये यांचे  एकत्रीकरणही केले. तसेच भारतीय साहित्यशास्त्र व पाश्चात्त्य सौंदर्यशास्त्र यांचा समन्वयही साधला. अभिनवगुप्त आणि मर्ढेकर यांच्या पुढची वाट ज्या अलौकिकतावादात दभिंनी सांगितली त्याचे विवेचन ‘मर्ढेकर आणि अभिनवगुप्त’ (अनन्यता मर्ढेकरांची, २००९) या लेखातही दिसते. मर्ढेकरांनी सर्व कलांचे सौंदर्यशास्त्र सांगितले, तर अभिनवगुप्ताने साहित्यकलेचे. दभि मात्र अभिनवगुप्ताचे व्यंग्यार्थाचे तत्त्व इतर कलेला लावून पाहतात आणि व्यंग्यार्थाला सौंदर्यकलेच्या प्रांतात नेतात. हे त्यांचे मौलिक योगदान आहे. त्याकडे नीट लक्ष दिले पाहिजे. ते म्हणतात, ‘साधारणीकृत अनुभवालाच ‘व्यंग्यार्थ’ अशी संज्ञा आहे. हा व्यंग्यार्थ जसा शब्दांतून प्रकटतो तसा तो संगीतातील स्वर, नृत्यातील गती, नाट्यातील अभिनय यांतूनही प्रकटत असतो.’ (अनन्यता मर्ढेकरांची: २१) इथे दभि अलौकिकतावादातील व्यंग्यार्थाला आपल्या नवअलौकिकतावादातील व्यूह संकल्पनेशी जोडून घेतात; त्याच वेळी मर्ढेकरी सौंदर्यकल्पनेला व्यंग्यार्थाशी जोडून घेतात. अलौकिकतावाद व मर्ढेकरी सौंदर्यविचाराचा हा समन्वय आहे. तोच नवअलौकिकतावाद होय. ‘अभिनवगुप्त व्यक्तिविशिष्टता सोडावयास सांगतो तर मर्ढेकर जीवशास्त्रीय भूमिका सोडावयास सांगतात. तपशील भिन्न असला तरी या दोन्ही भूमिका एकाच प्रक्रियेचे प्रतिपादन करीत आहेत.’ (अनन्यता मर्ढेकरांची: २१) असे म्हणून दभिंनी पौर्वात्य अलौकिकतावादाला पाश्चात्य सौंदर्यविचारांशी जोडून आशयवादी व आकृतिवादी साहित्यसिद्धांताचा पेच सोडवला आहे.         
दभिंचा हा ‘नवअलौकिकतावाद’ हा रा. भा. पाटणकरांच्या ‘द्विधृवात्मकतेच्या सिद्धांता’च्या पुढचे हे विवेचन होते. पण पुन्हा तेच की, पाटणकरांनी हा विचार ‘सौंदर्यमीमांसा’ या ग्रंथातून मांडला तर दभिंनी स्फुटलेखातून. त्यामुळेच त्यांच्या हयातीत याची नीट दखल घेतल्या गेली नाही. शिवाय मर्ढेकरी सौंदर्यशास्त्रावरच्या ‘आकृतिवादी’ या आक्षेपाला नीट दिलेला पर्यायही समोर आला नाही. मर्ढेकरी सौंदर्यशास्त्रातील ही उणीव दूर न झाल्याने पुढे केवळ आशयवादाचे पीक आले. देशीवादाचा पर्याय स्वीकारला गेला. मात्र देशीवादातही सांस्कृतिक आकृतिबंधाचे विवेचन आहे, साहित्यशास्त्रीय नाही.  त्यामुळे रूपबंधाचा प्रश्न कायम राहिला आहे. म्हणूनच नेमाड्यांनाही पुढे जाऊन ‘रूपाचे भान हरवले आहे’ अशी तक्रार करावी लागली, ती लागली नसती. कारण दभिंच्या नवअलौकिकतावादात आशय व रूप या दोन्हीचेही स्पष्टीकरण सापडते. फक्त त्याची नीट तात्त्विक व प्रबंधवजा मांडणी होणे गरजेचे होती. दभिंनी ‘मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना’ या आपल्या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीच्या मलपृष्ठावरच याची प्रस्तावना व गरज बोलून दाखवली आहे.  
दभिंनी अनेक समीक्षालेखांतून या नवअलौकिकतावादाचे उपयोजनही केले. दभि म्हणतात, ‘दर्शनी अर्थाशिवाय आणखी काय असते कवितेत? दर्शनी अर्थातून निघणारे अर्थझंकार असतात; त्या अर्थझंकाराचे चपळ आणि परिवर्तनशील व्यूह असतात; अशा व्यूहांची मिटती-उमलती केंद्रे असतात. एवढेच नव्हे, तर सलग जीवनपटातून त्या कवितेने स्वत:चे रूप वेगळे काढलेले असते. (पस्तुरी: १२) इथे दभिंनी आपल्या नवअलौकिकतावादाचे उपयोजनच केले आहे. यात अर्थ (व्यंग्यार्थ), स्वत:चे रूप (घाट) अर्थझंकार (व्यूह) या तिन्ही संकल्पनाचे स्पष्टीकरण आले आहे. असेच उपयोजन त्यांच्या ‘बंधछाया आणि कणा’ (पस्तुरी) या लेखातही आहे. मात्र सलग व प्रकरणत: तात्त्विक विचार न मांडल्यामुळे त्यांच्या उपयोजित समीक्षेतच या वादाचे व्यूह शोधावे लागतात. त्यामुळे त्यांच्या स्फुट व उपयोजित समीक्षेतून त्यांची सैद्धांतिक तत्वे व संकल्पना शोधून समोर आणणे ही मोठी जबाबदारी पुढील अभ्यासकांवर आहे. मात्र हा सिद्धांत म्हणजे त्यांनी मराठीला दिलेले मौलिक योगदान आहे, एवढे मात्र नक्की. 
४ 
नवअलौकिकतावादाप्रमाणेच दभिंच्या ‘वाङ्मयीन सापेक्षतावाद’ या सिद्धांताचाही असाच शोध घ्यावा लागेल. हा सिद्धांत मला मांडावयाचा आहे, असे ते म्हणत; पण त्यांनी त्याबद्दल कुठे लिहिल्याचे दिसत नाही. त्याचेही कण कुठेतरी त्यांच्या चाळीस ग्रंथातील समीक्षेत विखुरले असणारच. त्यांनी प्रबंधवजा लिहावे असे म्हटल्यावर ते म्हणत, ‘मर्ढेकर, मुक्तिबोध यांनी लय व मानुषता हे सिद्धांत लेखरूपानेच मांडले आहेत. पुढच्या अभ्यासकांनी त्याचे विवेचन केले, तसे माझेही करतील. मी समीक्षेत काय काम केले आहे ते मी व माझे विद्यार्थी जाणतात. इतरांना ते पन्नास वर्षानंतर कळेल. ज्ञानेश्वरांना सातशे व तुकारामांना तीनशे वर्ष जावी लागली, माझ्यासाठी पन्नास काही फार नाही.’ हा त्यांचा अहंकार नव्हता ती आत्मभानाची खूण होती. आपल्या आत्मचरित्रवजा अशा ग्रंथातही ते म्हणतात, ‘प्रबंधात्मक लेखनामध्ये मुख्यत: बौद्धिक शक्ती कार्यरत असते; त्यात संशोधन असते पण समीक्षा नसते...माझा पिंड समीक्षकाच; संशोधकाचा, ग्रंथकाराचा नव्हे.’ (अपार्थिवाचा यात्री : ९७) 
असे असूनही दभि पीएच.डी.साठी महाकाव्य या साहित्यप्रकारच्या अभ्यासाकडे का वळले? त्याचे कारण तत्कालीन मराठी अभिरुची व साहित्य निर्मितीच्या प्रेरणांमध्ये आहे. ते म्हणतात, ‘अर्वाचीन मराठी अभिरुची भावकाव्यप्रधान आहे; तिने कादंबरीवरही आक्रमण केले आहे. ते दूर झाले पाहिजे, मराठी साहित्याभिरुची व्यापक झाली पाहिजे, या उद्दिष्टाने प्रेरित होऊन मी महाकाव्याकडे वळलो होतो. दुर्दैवाने अजूनही मराठीत महाकाव्यात्मक कादंबरी निर्माण झालेली नाही; अजूनही मराठी कादंबरीची निर्मितिप्रेरणा आत्मचरित्रात्मक आहे, भावकाव्यात्मक आहे...मर्ढेकरांच्या एका लेखाने मराठी वाङ्मयाभिरुची परिष्कृत झाली. माझ्याही प्रबंधाचा एक दिवस परिणाम होईलच.’ (अपार्थिवाचा यात्री : १०६) 
आपले लेखन-वाचन संशोधन ही खाजगी व वैयक्तिक बाब नसते, ती लेखकाची सामाजिक-सांस्कृतिक जबाबदारी असते, हे खोल भानच यातून दिसते. तसेच मराठी कादंबरी आत्मचरित्रात्मक व भावकाव्यात्मक असून ती महाकाव्याच्या तोडीला गेली पाहिजे असे त्यांना वाटत होते. मात्र त्या तोडीला नेऊ शकणारे आजचे लेखक त्यांना भालचंद्र नेमाडे वाटत असावे; पण ते म्हणत की, ‘नेमाड्यांना महाकाव्य लिहायचे की प्रतिकादंबरी?’ याचे उत्तर त्यांना बहुधा ‘हिंदू’ नंतर मिळाले असेल. ‘पद्मगंधा’च्या दिवाळी (२०१५) अंकात त्यांनी नेमाड्यांवर लेख लिहिला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘नेमाडे यांची कादंबरी कड्यावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखीसारखी आहे... नेमाड्यांची भावकाव्यात्मता नाडीच्या ठोक्याप्रमाणे टप्याटप्याने प्रकटते.’ (पृ. २२) याचा अर्थ, महाकाव्य (Epic), भावकाव्य (Liric) आणि नाट्यात्मक (Dramatic) अशा तीन साहित्यगुणांपैकी ‘भावकाव्यात्मता’ हा गुण नेमाडे यांच्या कादंबऱ्यांत आहे. त्यामुळे १९६४ पासून कादंबरी साहित्याबद्दल असमाधानी असणाऱ्या दभिंना त्यांच्या रूपाने आश्वस्त करणारा कादंबरीकार गवसला असावा, असे म्हणता येते. अशाप्रकारे त्यांची समीक्षा अर्थनिर्णयनाबरोबरच, लेखकाच्या प्रवृत्तीचे स्वरूप व साहित्य परंपरेत लेखकाचे स्थानही ठरवत असे. 
५ 
सर्जनशील समीक्षकाच्या आस्वादक व उपयोजित समीक्षेत त्यांची सैद्धांतिक तत्त्वे असतात. मर्ढेकरांचा लय, मुक्तिबोधांचा मानुषता, नेमाड्यांचा देशीवाद हे सिद्धांत त्याचे उदाहरण होय. दभिंच्या लेखांतून अशीच सिद्धांततत्त्वे आपल्याला सापडतात. संशोधनपर ग्रंथाच्या शेवटी जशी विषय, संज्ञा-संकल्पना सूची असते, तशी या समीक्षाग्रंथालाही असती, तर त्यांचा सहज शोध लागला असता. समीक्षेची अशी कितीतरी तत्त्वे दभिंच्या लेखनात दडलेली आहेत. उदा. ‘संभवाचा सिद्धांत’, ‘लिरिकल क्वालिटी व विश्ववात्सल्य’, ‘अवास्तव आणि अद्भुत’, ‘प्रदेशनिष्ठ कथेची प्रकृती’, ‘भाषिक संवेदनशीलता’,  ‘शब्दभ्रम व अर्थभ्रम’ (प्रतीतिभेद); ‘केशवसुत संप्रदाय’, ‘कवीचे स्वातंत्र्य’, ‘कवीचा आत्माविष्कार’, ‘कवीची क्लुप्ती’, ‘सामाजिक उत्तरदायित्व’ (दोन परंपरा), ‘कविता आणि गूढता’, ‘अनुभूतीची भाषांकितता, ‘अन्यूनअतिरिक्तता’, ‘वस्तुनिष्ठ नवनिर्मिती’ (अनन्यता मर्ढेकरांची) ही त्याची काही उदाहरणे होत. खरे तर अशा ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी तरी अशी सूची शेवटी जोडली जावी, जेणेकरून त्यांच्या समीक्षेतील नवी तत्त्वे गवसतील. 
जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांचे सामर्थ्य सांगताना दभि म्हणायचे, त्यांच्या कथेत उपकथानके आणि अनेक कथांची बीजे दडलेली आहेत. त्यामुळे ‘जीएंच्या एकेका कथेत अनेक कवींचे कवितासंग्रह व कथाकारांचे कथासंग्रह विसर्जित झाले आहेत.’ हीच गोष्ट दभिंच्या समीक्षेबद्दलही म्हणता येते. त्यांच्या एकेका समीक्षालेखांत साहित्याच्या स्वरूपाविषयीची, साहित्याच्या निर्मितिप्रक्रियेविषयीची, लेखकाचे व्यक्तिमत्त्व व प्रतिभेविषयीची तत्त्वे दडलेली आहेत. मात्र ती त्यांनी वाचलेल्या ग्रंथातील किंवा इतर लेखकांची नव्हेत; त्यांना आस्वादातून गवसलेली ही तत्त्वे होत. त्यांच्या कोणत्याही लेखातील काही विधाने आपण नीट न्याहाळली तर आस्वादातूनच साहित्यकृतीचे स्वरूप व साहित्यकृतीचे परंपरेतील स्थान ठरवणे, लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेणे, साहित्यकृतीचे अर्थनिर्णयन करणे, वाचकांच्या अभिरुचीचा विकास करणे ही समीक्षेची सर्व उद्दिष्ट्ये साध्य झालेली दिसतात. उदाहणार्थ - 
‘कवितेतील हा अर्थही गोठल्यासारखा नसतो तर गतिशील असतो, तो एकदिशानुगामी नसतो; त्याचे प्रसरणशील व्यूह असतात. म्हणून तर कवितेला अर्थनृत्य म्हणतात.’ (पस्तुरी : ६७) ‘मर्ढेकर हे शतकातील सर्वश्रेष्ठ कवी..(कारण) त्यांनी साहित्येतर ललित कलाकृतीप्रमाणे भावकवितेला वस्तुनिष्ठ अस्तित्व मिळवून दिले. मराठी भावकविता कवीच्या लौकिक व्यक्तिमत्त्वाशी बांधली गेली होती. तिला त्यांनी कविनिरपेक्ष अस्तित्त्व मिळवून दिले’.(पस्तुरी:१०९) ‘लेखनातील भावानुभूती प्रत्ययपूर्ण (आत्मनिष्ठ), अनेकसंदर्भसूचक (तादात्म्ययुक्त) आणि विश्वाच्या गाभ्याला हात घालणारी (महात्मता) असेल तर ते लेखन आपोआपच ‘वाङ्मय’ होणार’ (पस्तुरी : १२०) ‘महाकाव्य, नाट्य आणि कादंबरी हे भावकाव्यापेक्षा किती वेगळे आणि वरचढ वाङ्मयप्रकार; पण परिभाषाविमुखतेमुळे आणि रोमँटिक आणि रोमँटिसिस्ट प्रभावामुळे याचे आज आपणास विस्मरण होत आहे’ (समीक्षेची वल्कले : ७०), ‘खांडेकर-कुसुमाग्रजांच्या काळात मराठीत जी रूपककथा आणि जी गद्यगीते लिहिली गेली ती विचारकविताच होती; पण तिचा तेव्हा नीट विकास झाला नाही; कल्पकतेचा हव्यास, तत्सम भाषेचा सोस, मुक्त चिंतनाऐवजी अध्यात्म इत्यादी मर्यादांमुळे तो कुंठित झाला.’ (समीक्षेची वल्कले : ७०), ‘(ज्या) लेखनामागील निर्मितिप्रक्रिया मनोविकृतीशी निगडित असते अशा लेखनाचा उपयोग मानसशास्त्रज्ञांना असतो; समीक्षक किंवा रसिक यांना नसतो; कारण तिथे कलानिर्मिती किंवा विचारनिर्मिती झालेलीच नसते; फक्त आत्माविष्कार झालेला असतो..लेखनामागील निर्मितिप्रक्रिया शोधायला लेखकाच्या घरी जावे लागत नाही; ती प्रत्यक्ष लेखनातच उपस्थित असते.’ (समीक्षेची वल्कले : १३९)  
ही काही दभिंची समीक्षा-सुभाषिते नव्हेत, ती नुसती निरीक्षणेही नाहीत. तर ती प्रमेये-हायपोथेसिस आहेत. तीत पुढील संशोधनाची बीजे आहेत. त्यांच्या अशा एकेका विधानांमधून काव्य-कादंबरी, आत्मचरित्र असे साहित्यप्रकाराचे स्वरूप; मर्ढेकर- खांडेकर-कुसुमाग्रज यांच्या प्रतिभेचा व कार्याचा शोध; मराठी अभिरुची व साहित्यनिर्मिती यांचा परस्पर संबंध व निर्मितीच्या मर्यादा; लेखकाची निर्मितिप्रक्रिया; वाचकाची अभिरुची यांचा शोध – अशी सूत्रे-प्रमेये सापडतात. आज विद्यापीठांमधून तेच ते विषय पीएच. डी. साठी दिले जातात. त्यांना नवीन विषय पाहिजे असल्यास दभिंच्या अशा दडलेल्या प्रमेयातून निवड करावी. म्हटले ना की त्यांच्या समीक्षेत अनेक संशोधकांचे प्रबंध विसर्जित झाले आहेत. 
एका परीने दभिंनी प्रबंधवजा समीक्षाग्रंथ लिहिले नाही ते बरेच झाले; नाहीतरी इतकी सूत्रे नंतरच्या पिढीला गवसली नसतीच. मराठी साहित्यव्यवहार, मराठी अभिरुची, लेखकप्रतिभा त्याचे व्यक्तिमत्त्व व लेखनप्रवृत्ती, मराठी परंपरा, साहित्यप्रकारचे स्वरूप, त्यांच्या निर्मितीमागच्या प्रेरणा, साहित्याची निर्मितिप्रक्रिया, लेखकाच्या व साहित्यकृतीच्या मर्यादा आणि त्यामागची कारणे, प्रतिभावंताच्या व्यक्तिमत्त्वावर पडलेला प्रभाव, त्याने केलेले अनुकरण यातून त्याच्या साहित्याला प्राप्त झालेले वैशिष्ट्य व मर्यादा, तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक घटना-घडामोडी व त्याचे साहित्यात पडलेले प्रतिबिंब- अशा विविधांगी पद्धतीने दभिंनी आपल्या समीक्षेचे दालन व्यापले आहे. त्याचा नीट अभ्यास व विस्तार होणे गरजेचे आहे.
सरांचे विद्यार्थी पुरुषोत्तम माळोदे यांच्या ‘विदग्ध प्रतिभावंत: विश्राम बेडेकर’ या ग्रंथाचे नागपूरला प्रकाशन होणार होते. बेडेकर आवडते लेखक व माळोदे आवडता विद्यार्थी असल्याने त्यांनी १२ ऑग २०१५ चे हे निमंत्रण स्वीकारले. कुठेही नवीन व्याख्यान द्यायचे असेल, तर ते फोन करायचे. त्यात ते काय नवीन मुद्दे मांडणार ते आधीच सांगायचे. मला ते म्हणाले की, ‘बेडेकर व मर्ढेकर यांच्या काळात र. धों. कर्वे यांची लैंगिक शिक्षण व संततिनियमनाची चळवळ सुरू होती. मर्ढेकरांच्या साहित्यात जो लैंगिक मोकळेपणा व बेडेकरांच्या साहित्यात जे मुक्त स्त्री-पुरुष संबंध दिसतात. कदाचित तो या कर्वेंच्या चळवळीचा प्रभाव असेल. असे काहीसे मी बोलणार आहे.’ समकालीन संस्कृती व लेखकाची निर्मिती, त्यातील आशयाचे स्वरूप यांच्या संबंधाचा हा नवा उलगडा होता. हे त्यांनी पुढे कुठे लिहिले काय ते माहित नाही. प्रत्यक्ष कार्यक्रमात तर ते याहून खूप वेगळे व नवीन बोलले असे मला माळोदे यांनी सांगितले. 
बालकवींची ‘फुलराणी’ ही नुसती निसर्गकविता आहे, ती सामाजिक नाही; म्हणून होत असलेल्या टीकेलाही त्यांनी आपल्या आस्वादक समीक्षेतूनच उत्तर दिले की, त्याकाळात बालविवाह, जरठकुमारी विवाहही होत असत. त्यावेळी आगरकरांची समंतीविवाहाची चळवळ सुरू होती. बी कवींच्या ‘दीपज्योतीस’ या कवितेत जसा विधवा पुनर्विवाह हा विषय आहे. ‘फुलराणी’ या कवितेतही बालकवी संमतीविवाहाबद्दलच बोलत आहेत. ज्या काळात बालविवाह व विनासंमती विवाह होत आहेत, त्या काळात बालकवी प्रेमविवाह व त्याला कुटुंबियांची संमती असे चित्र कवितेतून रंगवत आहेत, असे त्यांनी लिहिले. श्रेष्ठ प्रतिभावंताने आपल्या साहित्यातून सामाजिक आशय काय फक्त घोषवाक्यातूनच सांगावा? असे ते म्हणत.
दभिंनी आस्वादक समीक्षा लिहिली हे खरे आहे. पण त्यांची आस्वादक समीक्षा आजच्या, ‘मला असे वाटते’ अशा तऱ्हेची नाही. ती आस्वादातून तत्त्वांचा, सूत्रांचा, प्रमेयांचा शोध घेत होती. त्यामुळेच चरित्रात्मक समीक्षेला त्यांचा विरोध होता. साहित्यकृतीच्या आकलनासाठी कलावंताच्या दाराशी जाण्याची गरज नाही, असे ते म्हणत. ‘जंगल पाहणे म्हणजे जंगलात जाऊन झाडे मोजणे नव्हे’ असे म्हणत आस्वादातून तपशीलाची चर्चा करणाऱ्या समीक्षेलाही त्यांनी नावे ठेवली होती. त्यामुळे म. वा. धोंड यांनी ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’चा घेतलेला शोध त्यांना मौलिक वाटत नव्हता. तीच गोष्ट धोंड यांनी केलेल्या ‘तरीही येतो वास फुलांना’ या मर्ढेकरांच्या चरित्रसाधनाचा व कवितेचा अनुबंध जोडून केलेल्या समीक्षेचाही. ही समीक्षा नाही, तसेच हे संशोधनही नाही; तपशील संकलन आहे; साहित्याच्या व प्रतिभावंताच्या आकलनासाठी त्याचा यत्किंचितही फायदा नाही, असे ते सांगत. आश्चर्य म्हणजे ‘तरीही येतो वास फुलांना’ हे पुस्तक त्यावर्षीच्या ‘ललित’च्या निवडक वाचक शिफारस या यादीत वरच्या क्रमांकावर होते. मर्ढेकरांच्या साहित्याचा अन्वय त्यांचेच साहित्यशास्त्र व सौंदर्यशास्त्र यांच्या आधारे कसा लागतो, त्यासाठी चरित्राकडे जाण्याची कशी गरज नाही हे दभिंनी ‘व्दिदल’ या ग्रंथात दाखवून दिले होते. तरीही वाचकांनी असे ‘वास फुलांना..’ हुंगावे हे दभिंना निश्चितच पटणारे नव्हते. त्यात भरीस भर म्हणजे विजया राजाध्यक्ष यांचे ‘शोध मर्ढेकरांचा’ हे पुन्हा चरित्रात्मक समीक्षेचे हे पुस्तक आले. साहित्यातील तपशील कळला तरी तो आकलनासाठी आवश्यक नसतो. संहिता, व्यक्तिमत्त्व व आस्वाद यातूनच हे आकलन शक्य होते, यासाठी लेखकाची त्याची साहित्यशास्त्रीय भूमिकाच कामी येत असते, चरित्र नव्हे; हे पुन्हा पटवून देण्यासाठी त्यांनी हिरीरीने ‘अनन्यता मर्ढेकरांची’ (२००९) हा ग्रंथ प्रसिद्ध केला. ‘प्रसिद्ध केला’ म्हणजे यातील अनेक लेख हे आधीच प्रसिद्ध झाले होते. मात्र त्याला काही नवे लेख जोडून त्याची प्रबंधवजा मांडणी केली आहे. मर्ढेकरी साहित्याचा अन्वय लावण्याच्या अपेक्षाभंगातून ही निर्मिती झाली होती. आपली समीक्षासुद्धा बापट-पाडगावकर-करंदीकर यांच्या काव्यामुळे झालेल्या अभिरुचिभंगातून निर्माण झाली; कारण या तिघांनी मर्ढेकरांनी निर्माण केलेल्या अभिरुचीवर बोळा फिरवला, असे त्यांनी आधी म्हटले होतेच.
‘अनन्यता मर्ढेकरांची’ या ग्रंथातील ‘मर्ढेकर व अभिनवगुप्त, ‘नवीनतेचा सिद्धांत : नवे आकलन’, ‘मर्ढेकरांचा काव्यविचार’, ‘मर्ढेकरांची निर्मितिप्रक्रिया’ हे लेख नीट वाचले तर दभिंनी मर्ढेकरी अन्वयार्थाला पुन्हा चारित्राकडून सौंदर्यशास्त्र व साहित्यशास्त्राकडे कसे जोडून घेतले आहे, ते कळेल. तसेच त्यात नवअलौकिकतावाद आहे, हेही कळेल. साहित्यातील तपशील हा मूल्य व तत्त्वे यांच्यासाठी असतो. समीक्षेने साहित्यातील जीवनमूल्ये व साहित्यमूल्ये शोधायची असतात; तपशील नाही, असे त्यांचे रास्त सांगणे होते. त्यामुळेच ‘सर्वधारा’ वा ‘कवितारती’ मधून येणाऱ्या प्रत्येक माझ्या प्रत्येक समीक्षालेखावर त्यांची बारीक नजर असायची. त्यातील चांगले काय- अपुरे काय तेही सांगत. पण ज्यावेळी ‘हॉस्पिटलच्या कविता आणि मराठी कवी’ माझा कवितारतीतील लेख त्यांनी वाचला त्यावेळी त्यांनी; ‘ही समीक्षा वाचून कवितेतील हॉस्पिटल कळले; कविता कळली नाही’ असे म्हटले होते. वसंत आबाजी डहाके यांच्या ‘मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती’ यांच्या ग्रंथावरील माझे ललित मधील परीक्षण वाचून त्यात साहित्यातील संस्कृती तपशिलाला महत्त्व दिल्यामुळेही ते माझ्यावर नाराज झाले होते. 
आपले विद्यार्थीच नव्हे समीक्षा लिहिणारा कुणीही साहित्यविचार व साहित्यशास्त्र यांना सोडून बोलू लागला की ते त्याला हटकत असत. त्याचवेळी अस्सल लिहिणाऱ्या नव्या लेखकांचे ते स्वागतही करत. संतोष पद्माकर पवार, कल्पना दुधाळ यांच्या कविता जेव्हा मी त्यांना वाचून दाखवल्या तेव्हा त्याला त्यांनी दाद दिली होती. गंमत म्हणजे नागपूरला त्यांना पोस्टाने एक पाकीट आले. त्यात पत्र व कविता होती. मात्र नाव व पत्ता नव्हता. तरी त्यातील कवितेची दखल दभिंनी घेतली आणि ‘या झाडाने त्या झाडांशी सलगी केली’ या कवितेवर त्यांनी लिहिले तो लेख ‘पस्तुरी’ (१००-१०४) मध्ये आहे.
आपल्या विदार्थ्यानी, विशेषत: समीक्षालेखन, संशोधन करणाऱ्यांनी मौलिक लेखन करावे (कचरा गोळा करू नये) यावर त्यांचा भर होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे अठरा ते वीस प्रबंध सिद्ध झाले त्या संशोधकांची नावे व विषय पाहिले तरी छाती दडपून जाते. डॉ. यशवंत मनोहर (केशवसुत व मर्ढेकर यांचे काव्य), डॉ. सदाशिव कुल्ली (जीएंची जीवनदृष्टी आणि प्रतिमासृष्टी), डॉ. विनायक तुमराम (आदिवासी साहित्य), डॉ. ज्योती लांजेवार (दलित साहित्य : स्त्री प्रतिमा), डॉ. सुलभा हेर्लेकर (इंदिरा संत व पु. शि. रेगे- तुलना), डॉ. श्यामला मुजुमदार (ज्ञानेश्वरीतील अलौकिकतावाद), श्याम धोंड (म. म. देशपांडे) डॉ. प्रमोद मुनघाटे (१८५७चे स्वातंत्र्यसमर आणि मराठी कादंबरी), रत्नप्रभा अंजनगावकर (मराठी गद्यकाव्य), संध्या अमृते (महेश एलकुंचवारांची नाट्यसृष्टी), डॉ. निर्मला काकडे (जयवंत दळवींची नाटके : कामविकृती), डॉ. रत्नाकर डहाट ( मराठी पत्रात्मक कादंबरी), शुभांगी पातुरकर (मराठी मुक्तछंद), डॉ. वीणा मुळे-जोग (अनुवादित साहित्य) इ. यातील प्रत्येक विषय मराठीत पहिल्यांदाच व कदाचित अखेरचाच. प्रत्येक विषय स्वतंत्र. त्या निमित्ताने विद्यार्थ्याबरोबर तेवढाच स्वत:ही अभ्यास करीत. शिवाय हे विषय देतानाही विद्यार्थ्याची अभिरुची व प्रकृती लक्षात घ्यायचे. कुणी टोकाचा असेल तर त्याला समतोल करायचे व जीवनभान द्यायचे. उदाहरण द्यायचे झाले तर कुल्ली हे मार्क्सवादी होते, त्यांना सरांनी नियतीवादी जीएंचा अभ्यास करायला लावला. मला त्यांनी ‘संगीतकला आणि साहित्यकला : सौंदर्यशास्त्रीय संबंध’ असा आधी विषय दिला होता. पण ‘तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक रुक्ष होईल’ असे म्हणून ‘चि. त्र्यं. खानोलकरांची  निर्मितिप्रक्रिया’ हा विषय दिला. नोकरीअभावी मी ते काम पूर्ण करू शकलो नाही. पुढे मी ‘साहित्यविचार व भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्या’ असा विषय निवडला. मात्र आपल्या हातून घडणारे संशोधन मौलिक, अनन्य व पुढच्या संशोधनाला प्रेरक असावे असा त्यांचा जो आग्रह होता. तो किती सार्थ होता हे या विषयांवरून दिसते. 
दभिंनी काव्य, नाटक, कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र अशा सर्वच साहित्यप्रकारांची समीक्षा केली आहे. या प्रत्येक प्रकारच्या समीक्षेत त्यांनी काही महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यापैकी एक म्हणजे आधुनिक मराठी कवितेच्या त्यांनी सांगितलेल्या दोन परंपरा. ‘दुसरी परंपरा’ (१९७४) व ‘पहिली परंपरा’ (१९७६) या ग्रंथांतून त्यांनी मराठी काव्याच्या प्रवृत्तीची वर्गवारी करून तिची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. आधुनिक मराठी काव्याकडे पाहण्याचे पूर्वी जे, कविनिष्ठ व कालखंडप्रधान असे दोन दृष्टिकोन होते; त्या व्यतिरिक्त दभिंनी संप्रदाय-परंपरा हा दृष्टिकोन ठेऊन मराठी कवींची विभागणी परंपरेत केली. पहिल्या लौकिकतावादी- सौंदर्यवादी परंपरेत केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज व मुक्तिबोध यांचा समावेश केला. तर दुसऱ्या अलौकिकतावादी-अभिजातवादी परंपरेत त्यांनी, म. मो. कुंटे, भा. रा. तांबे, माधव ज्युलिअन, कुसुमाग्रज, वसंत बापट, मधुकर केचे यांचा समावेश केला. पहिल्या परंपरेच्या कवींमध्ये, स्वातंत्र्य आणि आत्माविष्कार (कविव्यापार), क्लुप्ती आणि उत्तरदायित्व (काव्यव्यापार) ही वैशिष्ट्ये आहेत; तर सांस्कृतिक अनुवंशशून्यता, व्यक्तिवाद, व्यक्तित्वाचा अविष्कार, यांचा त्याग आणि परंपरादर्शन, लौकिक व्यक्तित्वाचा विलोप, लौकिक अनुभवाची–परांअनुभवाची जोड ही दुसऱ्या परंपरेची वैशिष्ट्ये होत. या वर्गवारीत काही कवींचा समावेश (उदा. कुसुमाग्रज) करण्याबाबत काहीजण (उदा. डॉ. अक्षयकुमार काळे) असहमत झाले; पण एकूण मराठी कवितेतील आशयसूत्रे व कवींच्या व्यक्तित्वाचे हे आकलन व प्रवृत्ती शोधण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला सर्वानीच दाद दिली. 
तीच गोष्ट साठोत्तरी साहित्याबद्दल त्यांनी निरीक्षणे नोंदवलेल्या ‘युगदर्शन’ या निबंधाची. यात दभिंनी जीए., चित्रे, तेंडुलकर, ए. वि. जोशी, पु. शि. रेगे, कमल देसाई ते पार भालचंद्र नेमाडे यांच्यापर्यंतच्या  नववाङ्मयाबद्दलची निरीक्षणे नोंदवली. चित्रे मर्ढेकरनिष्ठ आहेत, जीएंनी भावे-गाडगीळ यांचे बळ एकत्र केले. ग्रेसने रेग्यांचे विशुद्ध वळण घेतले. या पिढीचे स्फूर्तिस्थान, नवसाहित्याची पहिली पिढी व कामू-सार्त्र, बोद्लेअर, काफ्का हे आहे, अशी निरीक्षणे मांडून दभि थांबत नाही; तर या साहित्यामागची जागतिक पार्श्वभूमीपण ते सांगतात. ‘नवअनुभववाद्यांनी अध्यात्म व नीतिशास्त्राला हद्दपार केले व विज्ञाननिष्ठ सत्यांना पुनरुक्त किंवा वर्णनपर ठरवले. आधार उरला तो व्यक्तीला तिच्या इंद्रियानुभवाचाच; या इंद्रियानुभवातून व्यक्त होणाऱ्या अनुमानांचाच. ही अनुमाने जेव्हा भावपूर्ण होतात तेव्हा त्यातून कला निर्माण होते व ती जेव्हा वर्णनपर असतात तेव्हा त्यातून शास्त्र अवतरते. या पॉझिटिव्हिझमचा व अस्तित्ववादाचा फार जवळचा संबंध आहे.’ ( हिमवंतीची सरोवरे : ६) हे वाचल्यावर ग्रेस, चित्रे, कोलटकर हे कवी इंद्रियानुभवाला का महत्त्व देत होते, ते कळते. दभि नुसते आस्वादक समीक्षक नव्हते. आस्वादातून चिंतनाच्या आधारे ते साहित्याचा व संस्कृतीचा, लेखकाच्या प्रवृतीचाही अन्वयार्थ लावत. जीए- ग्रेस-चित्रे-नेमाडे-कमल देसाई आदींच्या लेखनप्रकृतीचे स्वरूप व त्याची कारणेही त्यांनी सांगितली आहेत. हेच तर समीक्षेतील साहित्यकृतीचे अर्थनिर्णयन आणि लेखकाचे मूल्यमापन करणे होय. 
दभि हे संवेदनशील, सर्जनशील, हळुवार वृत्तीचे, चिंतनशील प्रवृत्तीचे, आपली प्रतीती व अभिरुची यांच्याशी प्रामाणिक राहून लेखन करणारे समीक्षक होते. अभिरुचिभंग वा अभिरुची संघर्ष यांतून ते समीक्षा लिहित असत. मराठी प्रतिभा व मराठी साहित्य परंपरा, मराठी अभिरुची व मराठी संस्कृती यांचे त्यांना भान होते. वाङ्मयीन महात्त्मतेचा त्यांना कायम ध्यास होता. तिचे पाईक असणाऱ्यांचा ते कायम शोध घेत असत. मराठी साहित्याची ही महात्मता ज्ञानेश्वर-तुकाराम, मर्ढेकर, बेडेकर-जीए, यां मानदंडावर उभी आहे. चित्रे-ग्रेस, मुक्तिबोध-म.म. देशपांडे, हे या स्तंभाचे आधार आहेत, असे ते मानत. मराठी अभिरुची या लेखकांशी संवादी राहावी असा त्यांचा ध्यास होता. याच्याशी विसंवादी लेखन करणाऱ्या पु. ल., व. पु. अशा लोकप्रिय लेखकांची तर त्यांनी दखलही घेतली नाही. त्यामुळेच या मानदंडाला धक्का पोहोचवणाऱ्या खांडेकर-फडके-देसाई असे कादंबरीकार यांच्या मर्यादा त्यांनी मांडल्या; तर  बापट-पाडगावकर-करंदीकर यांनी मर्ढेकरांनी निर्माण केलेल्या अभिरुचीवर बोळा फिरवला अशी टीका केली. 
मग दभि मानत या मानदंडाच्या परंपरेतील आजचा लेखक कोण? असा प्रश्न पडतो. दभिंचा १९६४ चा ‘युगदर्शन’ लेख आणि पद्मगंधातील २०१६चा ‘नेमाडे: नवे आकलन’ हा लेख वाचल्यावर याचे उत्तर सापडते. ‘नेमाडे यांच्या भाषेचे अर्थप्रभुत्व; समाजाकडून प्रमेयाकडे झालेला त्यांचा प्रवास; विविध अंगाने अनुभव घेण्याची जोखीम; संवादप्रधान निवेदनपद्धती; पात्रांचे मनोविश्लेषण टाळून त्याच्या भाषिक वैशिष्ट्यांतून त्याचे मन व जाणीव व्यक्त करण्याची पद्धत; स्वच्छंदतावाद व अभिजातवादाचे मिश्रण; सामाजिक हिंमत, भाषिक जाण आणि कलात्मक प्रतिभा; उत्कट निर्मितिप्रक्रिया व अभिव्यक्तीची उस्फुर्तता,  विश्ववात्सल्य व भावकाव्यात्मक मन या वैशिष्ट्यांच्या आधारे ते कादंबरीकार व कवी नेमाडे यांना मर्ढेकरांनंतरचे स्थान देतात. ‘मर्ढेकर आणि नेमाडे यांच्या प्रतिमा-प्रतीकांचा तौलनिक अभ्यास होईल तेव्हा प्रत्येक मराठी साहित्यिकाला आपले प्रतिमाविश्व पडताळून पाहावेसे वाटेल’ अशी या दोघांच्या शैलीची अनन्यता सांगून, दभि म्हणतात, ‘विश्ववात्सल्य आणि भावकाव्यात्मता हे महान साहित्यकृतीचे दोन महत्त्वाचे गुण आहेत...दोघांच्याही साहित्यात त्याचे दर्शन घडते. मर्ढेकरांची कविता फल्गु नदीसारखी पालथी वाहणारी आहे. तिचे गुण सौंदर्यवृत्ती असलेल्या रसिकांसच जाणवतात; उलट नेमाडे यांची कादंबरी कड्यावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखी आहे. तिचा घोष सर्वांच्या कर्णपटलावर जाऊन आढळतो. मर्ढेकरांच्या नसानसात भावकाव्यात्मकता आहे तर नेमाड्यांची भावकाव्यात्मकता नाडीच्या ठोक्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने प्रकटते.’ (पद्मगंधा, दिवाळी, २०१५: २२) असे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर-तुकाराम-मर्ढेकर परंपरेत नेमाड्यांना स्थान दिले आहे.  
दभिंच्या समीक्षेने सामाजिक भूमिका मात्र घेतली नाही. साहित्य आणि समाज यांचे नाते असते, साहित्यात घेतलेली भूमिका समाजजीवनात बदल घडवून आणते, या साठोत्तरी साहित्याने घातलेल्या भूमिकेबद्दल दभिंची समीक्षा मौन बाळगते. साहित्य व समाज यांचा संबंध भाषिक असतो अशी त्यांची भूमिका होती, तीच देशीवादी साहित्याचीही आहे. समीक्षेने साहित्याबद्दल भाषिक भूमिका घ्यावी असे दभिंचेही विवेचन होते. दुसरे असे की, तसेच नव्वदनंतरच्या साहित्यावरही दभिंनी एकत्रित भाष्य केले नाही. त्यांच्या विपुल समीक्षेची त्या प्रमाणात दखल घेतल्या गेली नाही, त्याची ही कारणे असावीत.  
असे असले तरी, आपली अभिरुची व आपला आस्वाद यांच्या आधारे सामाजिक अभिरुची व साहित्य निर्मिती यांचा अन्वय लावणे, समाजाची अभिरुची विकसित करणे, साहित्यनिर्मितीला दिशा देणे, साहित्याच्या परंपरेत कलाकृतीची व लेखकाची स्थाननिश्चिती करणे हेच तर समीक्षकाचे कार्य असते. त्यामुळे वाचक व लेखक दोहोंनाही मार्गदर्शन होत असे. दभिंनी हेच केले. मराठी साहित्य परंपरा कशी परपुष्ट होईल हा मर्ढेकर-नेमाडे यांच्याप्रमाणेच त्यांचाही ध्यास होता. वाचकाच्या अभिरुचीवर, लेखकाच्या प्रतिभेवर व निर्मितीवर संस्कार हे थोर समीक्षकाचे कार्य असते. ते दभिंनी आयुष्यभर व्रतस्थपणे केले. 

साधनग्रंथ : (द. भि. कुलकर्णी) 
१. मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र: पुन:स्थापना, अमेय प्रकाशन, नागपूर, (प. आ.), १९८२, 
२. प्रतीतिविश्रांती, विजय प्रकाशन, नागपूर, १९९२ 
३. दोन परंपरा, विजय प्रकाशन, नागपूर, १९९३
४. द्विदल, आंध्र मराठी साहित्य परिषद, हैदराबाद, १९९४ 
५. हिमवंतीची सरोवरे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९९६
६. पस्तुरी, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००२ 
७. कादंबरी: स्वरूप व समीक्षा, (दु. आ.) पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००३
८. प्रतीतिभेद, आकांक्षा प्रकाशन, नागपूर, २००७
९. समीक्षेची वल्कले, पद्मगंधा प्रकाशन पुणे, २००८ 
१०. समीक्षेची क्षितिजे, (संपा) श्यामला मुजुमदार, विजय प्रकाशन, २००८
११. अनन्यता मर्ढेकरांची, पद्मगंधा प्रकाशन पुणे, २००९
१२. मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र: पुन:स्थापना पद्मगंधा प्रकाशन पुणे, २००९ (दु.आ.) 
१३. अपार्थिवाचा यात्री, गोदा प्रकाशन औरंगाबाद, २०१०  
१४. नवभारत, समीक्षा विशेषांक, मार्च-एप्रिल २०१०
१५.  पद्मगंधा, दिवाळी अंक, २०१५     

डॉ. देवानंद सोनटक्के, पंढरपूर, ९८६०२६३१६३, anandsonu23@gmail.com
----------------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र साहित्य पत्रिका, जाने-मार्च, २०१७ 
समीक्षेची अपरूपे, हर्मिस प्रक्षण, पुणे, २०१७  

4 comments:

  1. दीर्घ आणि छान लिहिले आहे.

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर लेखन पूर्वीपासूनची तुझी जिज्ञासू वृत्ती आता सर्व संज्ञा संकल्पना घेऊन उत्तम बहरलेली आहे आम्ही नक्कीच आस्वाद घेत आहोत

    ReplyDelete
  3. खुपच छान मांडणी... दभिंची समीक्षा समजून घेण्यास अत्यंत उपयुक्त.

    ReplyDelete
  4. अतिशय दर्जेदार शब्दात मांडणी, सुंदर समीक्षा, साहित्य निर्मितीचा अन्वय खूप छान मांडला आहे 👌👌🙏

    ReplyDelete

द. भि. : सहवासाचे जंतरमन्तर : डॉ. देवानंद सोनटक्के

  दभि : सहवासाचे जंतरमंतर :    डॉ.   देवानंद सोनटक्के वर्ष १९९६. त्यावेळी मी एम . ए . साठी नागपूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये मराठी विभागात...