Tuesday, May 3, 2022

द. भि. : सहवासाचे जंतरमन्तर : डॉ. देवानंद सोनटक्के



 

दभि : सहवासाचे जंतरमंतर :  डॉ. देवानंद सोनटक्के


वर्ष १९९६. त्यावेळी मी एम.. साठी नागपूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये मराठी विभागात प्रवेश घेतला होता. विद्यापीठाच्या वसतिगृहात राहात होतो. कॅम्पस ते होस्टेल अंतर जवळ होते, तसेच जवळ होते अमरावती रोडवरील ‘जंतरमंतर’. नावावरून अगदी गंमतीशीर वाटणाऱ्या या इमारतीचे आम्हाला त्यावेळी खूप आकर्षण होते.

त्या इमारतील घराची रचना म्हणे इंग्रजी एक्स आकाराची होती. तळमजल्यावर ज्याचा हॉल होता त्यालाही वरच्या मजल्याची गॅलरी होती. त्यामुळे पूर्वेकडून खालच्या मजल्यावर राहणारा घरमालक पश्मिमेकडून गॅलरीत दिसत असे. त्याने खालच्या माणसाच्या अंगणात वरून कचरा टाकला की खालच्या माणसाची गॅलरी त्याच्यावर येत असल्यामुळे तो गॅलेरीतून त्याच्या अंगणात कचरा टाकू शकत असे. अशाप्रकारे प्रत्येकजण तळमजला व वरच्या मजल्यावर राहू शकत असे. पायऱ्यांची रचना अशी की बेडरूममधून किचनला जायचे का, सहा पायऱ्या उतरा. किचनमधून हॉलमध्ये जायचे तर आठ पायऱ्या चढा. असे हे जंतरमंतर. त्यामुळे रवीनगरकडून कॅम्पसकडे पायी जाताना या इमारतीची हमखास चर्चा होत असे.

आणि आणखी चर्चा व्हायची, ती इमारतीत राहणाऱ्या एका लेखकाची !

या लेखकाच्याही बाबतीत अशा कथा- दंतकथा आमच्या होस्टेलमध्ये प्रचलित होत्या. काय तर म्हणे, त्यांच्या कंपौंडच्याच दाराला घंट्या लावल्या आहेत. कुणी आला तर डोअरबेल वाजविण्याआधीच घंट्याची किणकिण ऐकू येते. दाराजवळच ‘सकाळ भेट वर्ज्य’ अशी पाटी आहे. जवळील टपाल पेटीत दररोज न मावणारी पत्रे - मासिके येतात आणि हा लेखक संध्याकाळी एल. आय. टी. किंवा फुटाळा तलावावर दररोज फिरायला जातो. मुख्य म्हणजे वय पासष्ट असले तरी सरांच्या सोबत तरुण असतात आणि ते अभ्यासाची चर्चा करतात.

मी वणीला शिकत होतो. समीक्षा शिकवताना वाघमारे सर म्हणायचे, ‘हा विषय मला माझ्या गुरूंनी शिकवला.’ कल्पनाताई कॅम्पसमधूनच एम. ए. झाल्या होत्या. त्या म्हणायच्या, ‘अरे होस्टेलला राहतोस. सरांना भेटलास की नाही?’ ज्याला सांगावे मी कॅम्पसला शिकतो, त्याने म्हणावे, ‘अरे सरांशी भेट होते की नाही. जाऊन भेट.’ तर असे हे सर. त्यांच्या भेटीची संधी शोधत होतो.

                                                                   | २ |                                                                                                                    

मी वणीवरून संपादित केलेला रंगस्वानंदचा दिवाळी अंक घेऊन, मी आणि मित्र संजय एक दिवस हिय्या करून जंतरमंतरवर गेलो. घंटानाद करावा की करू नये या विवंचनेत, भीत भीत आत गेलो. अंक दिला. म्हटले, ‘तुमच्या विद्यार्थिनीने तुमच्यावर लिहिलेला लेख यात आहे.’ सरांनी सांगितले. ‘बाळांनो, माझी मुलाखत एक पत्रकार घेत आहेत. ती संपेल तासाभरात. मग या.’ मृदू, आवाज. उंची मध्यम. वर्ण सावळा. कपाळावर झुलपे. ते केस मागे सारलेले. त्यामुळे रुंद कपाळ. चेहरा गंभीर. व्यक्तिमत्व प्रसन्न. तासाभराने भेट झाली. आमचा परिचय त्यांनीच करून घेतला. संवादही सहज झाला. त्या दिवशी आम्हीच अखेर जंतरमंतर झालो.

मात्र या भेटीने दभि नावाचे माझ्या मनात असलेले रोमँटिक चित्र पार बदलले. निळा कोट. जाड भिंगाचा चष्मा. लठ्ठ. उंच. घोगरा आवाज- असे दभिंचे काल्पनिक चित्र (साधारणत: पत्रकार कुलदीप नायरसारखे) मी दभिंचे लेखन वाचून मन:चक्षुसमोर रंगवले होते; पण प्रत्यक्षातले दभिसर तसे नव्हेच. त्यामुळे माझ्या मनातील भीती एकदम कमी झाली. पुढे पुढे तर मी सरांच्या खूप जवळ गेलो.

   एम. ए. दुसऱ्या वर्षीचे वर्ग जेमतेम सुरू झाले असावेत. माझा निकाल लागला होता. जेमतेम बी प्लस मिळाला होता. वर्गात मी हुशार होतो. मित्रांना वाटायचे मीच पहिला येईन; पण निकाल विपरीत होता. (त्याची कारणे त्यावेळच्या विभागाच्या सांस्कृतिक पर्यावरणात होती. हे नंतर कळले.) मी खूप उदास होतो. अबोल झालो होतो. एक दिवस एका वर्गमित्राने दभिंनी भेटायला बोलावल्याचा निरोप आणला. मी गेलो तेव्हा ते म्हणाले, ‘माझ्या रायटरला नोकरी मिळाली आहे. म्हणून मला रायटर हवा आहे. तुम्हाला जमत असेल तर उद्यापासून या.’  मी गप्पगार.

  माझे अक्षर चांगले नव्हते, माझ्याजवळ सायकल नव्हती. या दोन्ही गोष्टी त्यांचा रायटर होण्यासाठी गरजेच्या होत्या. मी माझ्या अडचणी सांगितल्या. त्यांनी मान्य केल्या. पुढे तब्बल सहा वर्षे मी त्यांचा रायटर राहिलो. मला एका प्रश्नाचे उत्तर अजून कळले नाही की, दभिंनी मला रायटर म्हणून का निवडले?  मी अंक प्रसिद्ध करत होतो म्हणून? अक्षर, शुद्धलेखन यापेक्षा वाङमयाची आवड हा त्यांच्या रायटरचा निकष मी पूर्ण केला होता? कसे?

                                                            | |                             

सायंकाळी मी बरोब्बर तीन पंचावन्नला सरांकडे गेलो. जुन्या रायटरने- दीपक रंगारीने मला सगळे समजून सांगितले. पत्रव्यवहार. फाईल्स. वगैरे. ऑफिसमध्ये सर्व व्यवस्थित ठेवलेले असायचे. कोरे कागद रायटिंग पॅडला नीट लावलेले. पेन भरपूर. लिफाफे, रेषांचे कागद, डिंक..सारे. सर चार वाजता अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून यायचे. सहा वर्षात त्यांनी कधी मला वाट पाहायला लावले नाही. ते आतुरच असायचे. मनात विषय पक्का. मग खुर्चीवर ते. समोरच्या खुर्चीवर मी. मग डिक्टेशन सुरू. लहान मुलाला शुद्धलेखनासाठी धडा घालावा इतके हळू, शांतपणे सांगत. स्पष्ट उच्चार. शिवाय ह्रस्वदीर्घासहित शब्द सांगणार. मध्ये संकल्पना, वाक्य, परिच्छेद काहीही शंका असेल तर विचारायची मुभा.

  दभिंचे डिक्टेशन हे वाङमयीन एक प्रशिक्षणच होते. विचारांची पद्धत, विषयाचा प्रारंभ, विषय मांडण्याची, खुलवण्याची शैली. मध्येच नवा शब्द प्रचलित करण्याची हातोटी. प्रत्येक विषयाचे मुळापासूनच चिंतन. लहान लहान वाक्ये, लहान लहान परिच्छेद. पहिल्या वाक्यातील मुद्दा पटवूनच पुढचे वाक्य लिहिणे. दोन क्रियापदे सलगच्या दोन वाक्यात न वापरणे. मध्येच एखादा अपरिचित शब्द वापरणे. त्याच्या परिचित अर्थापेक्षा नवाच अर्थ म्हणजे- ‘उपनिषद म्हणजे माहित आहे ना? गुरूच्या पायाजवळ बसून ज्ञान घेणे’ असे मध्येच सांगणे. वाचकाला बहुश्रुत करणे. सामान्य वाचकाला पटवून देणारी सोपी, पण सूत्रबद्ध वाक्यरचना. त्यामुळे समीक्षा लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांना आहे. शिवाय त्यामुळे त्यांचा कुठलाही लेख अपूर्ण विस्कळीत वाटत नाही. तो बौद्धिक असला तरी पढिक आणि पंडिती नसतो. खूप अवतरणे, संदर्भ ते देत नसत. मुळालाच ते हात घालीत. अनुभव व आस्वाद यांचा शोध घेत त्या प्रक्रियेत वाचकाला सामावून घेत. गरज असेल तर अवतरण द्यायचे. ते अवतरण त्यांनी ग्रंथात आधीच अधोरेखित केलेले असायचे. डिक्टेशन देताना वाक्य सांगून झाले की मग ते अवतरण मला पाहून लिहायला सांगत. मग मी त्याचा पूर्ण संदर्भ लिहिणार.

 मी हे लिहीपर्यंत ते मध्ये उठत. टेबलावरचा पानसुपारीचा डबा काढीत. त्यातील सुपारी हाताने बारीक कातरत. कधी ती कातरलेलीच विकत आणत. ती हातावर घेत. पानपुड्याच्या वरच्या झाकणावर लहानशी डबी होती. तिच्यात अडकित्त्याचा पाय घालून मग थोडा चुना उकरत आणि सुपारीवर टाकत. मग पुडीतील थोडी तंबाखू घेऊन त्यावर टाकत मळीत. ते खात. पण त्याचे प्रमाण इतके अल्प की समोरच्याला ते जाणवणार नाही. म्हणायचे, ‘पूर्वी मी खूप सिगारेट ओढायचो. हार्ट अटॅक आल्यापासून आता हे. चुन्यामुळे म्हातारपणी कॅल्शियम मिळते.’ हे त्यांचे व्यसन नव्हते तर चाळा होता, असे म्हणत. त्यांचा हा चाळा खूप सुसंस्कृत होता. इतके होईपर्यंत माझा संदर्भ लिहून पूर्ण होई..

 सायंकाळी सहा-सात पर्यंत लेखन झाले की मग फिरायला. फुटाळा नाहीतर एलआयटी टेकडी. या वेळी मला माझ्या अभ्यासाबद्दल विचारावे लागे. एम. ए. चा एकेक घटक वा प्रश्न. त्यामुळे मला वाचूनच जावे लागायचे. उदा. ज्ञानेश्वरीतील रूपके. मग मला काय माहीत आहे, ते पूर्वज्ञान जाणूनच विषय सुरू करायचे. ज्ञानेश्वर कोण? ते कुठे होते? काय ग्रंथ लिहिले त्यांनी? वगैरे. अगदी मुळापासून. अलंकार म्हणजे काय, त्याचे स्वरूप, प्रकार लक्षणे, मग ज्ञानदेवांचे आवडते अलंकार, मग भगवदगीता, मग मराठी भाष्य, मग अध्याय, मग त्यातील विषय, मग समारोप. असे तपशीलवार. त्यामुळे पेशंट डोकेदुखीसाठी आला तरी पूर्ण चेकअप होऊनच बरा केला जाई. त्याचा मला फायदा असा झाला की सर्वांगीण अभ्यास घडत गेला. उद्या फिरायला गेल्यावर काय वाचले ते विचारणार. त्यामुळे गाईड वाचणे शक्यच नव्हते. पुस्तक मिळाले नाही, असे खोटे सांगता येत नव्हते. रात्री उशिरा परतलो तरी वाचावेच लागायचे.  

   शिवाय जे सांगितले ते दुसऱ्या दिवशी लिहून नेऊन दाखवायचे. रायटर असला तरी ही त्याची नोकरी नाही, तो ज्ञानार्थी आहे. विद्यार्थी, परीक्षार्थी आहे, ही खोल जाणीव सरांना होती. त्यामुळे त्यांनी त्यांची खाजगी कामे- दळण- भाजी वगैरे कधी सांगितले नाही. अलीकडे रायटर ही संकल्पनाच बाद होत आहे. एकल लेखनप्रथा संगणकामुळे शक्य आहे. दभिसरांची रायटर पद्धत म्हणजे जुन्या गुरुकुल पद्धतीचा सुधारित आविष्कारच. सानिध्यातून अधिक ज्ञान. स्पॉंडिलायटीसमुळे सरांना हात दुखून येई. म्हणून रायटर. त्या आजारामुळे मात्र त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांचे भले झाले. त्यांचे सगळे रायटर प्राध्यापक, संपादक व ज्ञानाच्या क्षेत्रातच आहे. एक वेळ पदवीधर बेकार असेल पण रायटरला लगेच नोकरी लागत असे. मी एम. ए. होण्याआधीच मला लोकसत्तातून ऑफर आली होती. तीही यामुळेच. असो. पुन्हा फिरून आलो की उरलेले डिक्टेशन. सोय दोघांचीही. खरे तर आम्ही रायटरनेच त्यांना ट्युशन फी द्यायला हवी होती. इतके महत्वाचे ज्ञान ते देत. बेझलवार मॅडम म्हणायच्या, ‘सरांजवळ राह्तो. देवानंदचा हेवा वाटतो.’

   सायंकाळी दभि इतरांना भेटत असत. अर्थात आधी फोन करून लोक वेळ घेत. मग त्या दिवशी डिक्टेशन नाही. मग चर्चा. किती तरी वेगवेगळे विषय. वेगवेगळे लोक. हृदयनाथ व उषाताई मंगेशकर, कवी सुरेश भट. रवींद्र पिंगे, निर्मलकुमार फडकुले, कुमार सप्तर्षी, रामदास भटकळ, अनंत दीक्षित, अरुण जाखडे, उषाताई देशमुख, श्रीनिवास सिरास, वीणा आलासे, कुमार सप्तर्षी...कितीतरी मान्यवर यांना जवळून पाहण्याचा भेटण्याचा मला लाभ झाला. हृदयनाथ मंगेशकर व सुरेश भट यांना माझ्या खांद्यावर हात ठेऊन गाडीपर्यंत मी पोचवत असे तेव्हा त्या स्पर्शाचा कोण अभिमान वाटत असे. साहित्य, सौंदर्यशास्त्र, तत्त्वज्ञान, संगीतकला, चित्रपट, लैंगिक शिक्षण. असे कितीतरी विषय या भेटीत चर्चेला येत. त्यातही दभिंचे लाडके विद्यार्थी- हेमंत खडके, पुरुषोत्तम माळोदे, तीर्थराज कापगते, श्याम धोंड, प्रमोद मुनघाटे इ. हे लोक इतके नवे विषय व वेगळे विचार मांडत की, ती सगळी चर्चा रेकॉर्ड करून ठेवावयास हवी होती असे आता वाटते. कारण प्रत्येक विषयावर दभि अत्यंत भिन्न आणि मौलिक विचार मांडत. अनेकदा मुनघाटे, खडके, माळोदे व मी विरुद्ध मत मांडत असू. त्यांच्याशी वाद घालत असू. पण तेच विद्यार्थी त्यांना जास्त प्रिय होते. खाजगी चर्चा किंवा कुणाच्या उखाळ्यापाखाळ्या तिथे निघत नसत.

चर्चेतील मौलिक विचार घेऊनच मी होस्टेलला परतत असे. अनेकदा रात्रीचे दहा वाजायचे. मेस बंद होत असे. जेवण थंड. दुसऱ्या दिवशी अकरा वाजता विभागात तास. दुपारी अडीचला ते संपले की फ्रेश होऊन दभिंकडे. वेळच कुठे? त्यामुळे मी रात्रीच किंवा पहाटे उठून मी व सरांनी काल चर्चिलेल्या प्रश्नाचे उत्तर व पुस्तक पाहून लिहून काढत असे. पण त्यात चिंतन व सलगता नसायची. मग दभि दुसऱ्या दिवशी ती चूक लक्षात आणून द्यायचे. ‘या मुद्द्यात तुम्ही एकदम उडी मारली आहे. विषय पटवत खुलत मांडला पाहिजे, एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी असा संबंध पाहिजे, की ते वाक्य आधीच्या वाक्याचे स्पष्टीकरण किंवा विस्तार वाटावा’ वगैरे सांगत. मग पुन्हा घरी येऊन त्याचे पुनर्लेखन करायचे.

कधी डिक्टेशनला गेलो, ते आत असले तरी मला वाट पाहायला लावत नसत. म्हणत, ‘तुमच्यासाठी काही सूचना आहेत, नोटपॅडवर. वाचा.’ एकतर अहोजाहो म्हणत असल्याने गांभीर्य आणि सूचना म्हटल्याने दडपण. काल डिक्टेशन दिलेले त्यांनी पुन्हा वाचून दुरुस्त केलेल्या सूचना एका कागदावर क्रमाने असायच्या. ‘अक्षरावर शिरोरेषा द्यावी. सुबक दिसते. वेलांटी पूर्ण काढावी. घ, आणि ध, ट आणि र, भ आणि फ यातील भेदाच्या गाठी नीट काढाव्यात. आकडे अक्षरातच लिहावेत. दोन्ही बाजूंनी समास हवा. मन एकाग्र हवे.’ वगैरे. शंभर ते दोनशे रुपये मानधन. त्यात इतक्या चुका. राग येऊ नये म्हणून सर्वांसमोर वा तोंडी न सांगता लेखी. यातून मला हे काम रेखीव, कोरीव बारकाईने आणि मुख्य म्हणजे मन एकाग्र करून लिहिणे- हे शिकता आले. लता मंगेशकर वगैरेंना आपल्या अक्षरातील पत्रे जातात म्हणजे काय? हे आवश्यकच होते. एकदा एक फोन होता, प्रथेप्रमाणे तो ‘आपण कोण असे मृदू भाषेत विचारून मग सरांना द्यायचा. म्हणून मी विचारले, तर ते म्हणाले, ‘हृदयनाथ मंगेशकर, मी एकदम उभाच राहिलो. मग त्यांनी पण विचारले. मी ‘रायटर’ सांगितल्यावर म्हणाले, ‘म्हणजे आम्ही तुमच्या अक्षरातली पत्रे वाचतो होय!’ लेखननियमाबरोबर संभाषण नियम पण शिकवले. कसे बोलावे, शब्दांचे उचार कसे करावे, पत्ता कसा सांगावा..शिवाय वागण्याचे मॅनर्सही सांगणार- लिहिताना पेन कानात घालू नये, भडक कपडे वापरू नये, कपड्यांचे रंग असे असावेत. कारचा दरवाजा कसा लावावा. इत्यादी.

मी दररोज एम. ए. च्या एकेका दीर्घोत्तरी प्रश्नाचे उत्तर लिहून नेऊन दाखवायचे. मला आठवते, एकदा विषय दिला होता, ज्ञानेश्वरीतील रूपके. मग त्याची रूपरेषा समजावून सांगितली. अलंकार म्हणजे काय? अलंकाराचे प्रकार, मग रूपक अलंकार, मग त्याचे प्रकार- सांग आणि निरंग रूपक. मग ज्ञानेश्वरीतील रूपके, मग बाराव्या अध्यायातील रूपके. मग त्याचा आशय. समजावून सांगितले. पुस्तके दिली. आता कितीही मी लिहून नेले तरी या विद्वत तोडीचे ते कसे होणार? एखादे वाक्य चुकायचेच. संकल्पना स्पष्ट नसेल होत. मग म्हणायचे, ‘असे चुकीचे मी तिसरीतल्या निबंधात देखील लिहिले नसेल.’ मग चीड यायची. (त्यांचा हेतूही तोच असायचा) कशाला झालो रायटर, असे वाटून जायचे. मी तीन वेळा तो लेख लिहून दाखवला. चुका, टीका सहन करत शेवटी चौथ्यांदा लिहून नेला. ठरवले की आता चूक काढली की उद्यापासून यायचेच बंद. खूप उदास होऊन गेलेलो. ते म्हणाले आणलं लिहून? काही न बोलता मी कागद समोर धरले. न कंटाळता आचार्यांनी ते वाचले. मी चीड, उदासी, भीती...साऱ्यांनी ग्रासलेलो. तर म्हणाले, ‘आज डिक्टेशन नको फिरायला जाऊ.’ हे काय नवीन? बाहेर खरडपट्टी काढणार आज? आचार्यांनी गाडी काढली. मी बसलो. एका झेरॉक्स सेंटरवर जाऊन ते म्हणाले याच्या तीन प्रती द्या. पैसेही त्यांनीच दिले. पुन्हा गाडीत बसून घरी. म्हणाले, ‘आता एक प्रत माझ्या फाईलला ठेवा, एक तुमच्याजवळ व मूळ प्रत तरुण भारतला पाठवा, ते प्रसिध्द करतील.’ नंतर तो लेख खरंच प्रसिद्ध झाला- ज्ञानेश्वरीतील दोन रूपके. माझा पहिलावहिला वाङमयीन समीक्षालेख!                                               | ४ |

 विद्यार्थी घडवण्याची त्यांची पद्धत अशी होती. त्याच्या जोडीने ते तो विषय वाचत. मग ते एम. फिल., पीएच. डी.चे प्रकरण असो की वृत्तपत्रीय लेख. ओळ अन् ओळ, शब्द अन् शब्द वाचून, खाणाखुणा करून, शंका विचारून, चर्चा करून ते पूर्ण करीत. ज्ञान कोणत्याही स्वरूपाचे, अल्पसे का असेना त्यांची तीव्रता आणि तळमळ मात्र सारखीच होती. ते तेवढाच जीव ओतत. पुन्हा त्याचे प्रकट वाचन. माझे प्रकट वाचन त्यांना आवडत असे. इतरांनी लिहून आणलेले लेख ते वाचू लागताच म्हणायचे, ‘देवानंदला द्या. वाचेल तो.’ त्यामुळे माझे वाचन उच्चार खूप सुधारले. दभि ऐकत आहेत म्हटल्यावर महाराष्ट्रातला कोणीही वाचताना काळजीच घेईल. शिवाय ते ‘आजार’ व ‘अवजार’, ‘जरा’ आणि ‘जरा’, ‘जात’ आणि ‘प्राणिजात’ अशा तऱ्हेच्या शब्दातील ‘ज’ चे उचार कसे करायचे म्हणजे ते अर्थविभेदक कसे ठरतात ते सांगत.

    माझ्याकडून त्यांनी खांडेकरांच्या ‘अमृतवेल’वरील लेख लिहवून घेतला. आधी कादंबरीचे कथानक, मग व्यक्तिचित्रण, मग खांडेकरांचे तत्त्वज्ञान, जीवनदृष्टी, भाषाशैली, कादंबरी तंत्र आणि मर्यादा- सगळ्या मुद्द्यांची चर्चा करणारे ग्रंथ वाचायला दिले. मग लेखन तपासून दिले. लेख वणीसारख्या लहान गावातील दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाला, तेव्हा ते नाराजही झाले. मर्ढेकरांवरील लेखाबद्दलही तसेच. भ. श्री. पंडित निबंध स्पर्धेसाठी मी तो मेहनत घेऊन तयार केला. त्याचा माझ्यापेक्षाही आनंद सरांनाच जास्त झालेला. पुढे तो लेख माझ्या ‘सामर्थ्याचा स्वर’ ग्रंथातही तो समाविष्टही झाला.

 सरांशी होणाऱ्या चर्चा, वाद, त्यांच्याकडे येणाऱ्या वाङमयप्रेमींचे संभाषण- यांतून संवाद साधण्याची पद्धत, मुद्दा मांडण्याची पटवून देण्याची पद्धत कळत केली. माझी वाङमयीन समजही वाढत गेली. वाचन पद्धत, अभिरुची, विचारप्रक्रिया आणि शैली घडत गेली. एखाद्या प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टीच ते बदलून टाकत. या काळातच दभिंचे व्यक्तिमत्त्व अधिक कळत गेले. दभिंचे वाङमयावर त्या खालोखाल विद्यार्थ्यावर- तेही वाचन- लेखन करणाऱ्या - प्रचंड प्रेम. तेवढे कुटुंबियांवरही नसेल. ज्ञानाबद्दल मुळातून ओढ. त्यामुळे सर्व विषयावरील ग्रंथ ते वाचत. अगदी मेंदूची रचना, खगोलशास्त्र, शिल्पशास्त्र इ. कुठलाही विषय. वाचताना खाणाखुणा, शंका मते व शेवटी निरीक्षणे नोंदवत. त्याखाली दभि अशी तिरपी सही. गरज पडली तर ती नोंद विषयानुसार कार्डावर करीत. जसे प्राचीन इतिहास, अर्वाचीन काव्य. अशी शेकडो कार्डे त्यांच्या घरी होती. अनेकदा ती कार्डे ते चाळत, मग तो विषय त्यांच्या डोक्यात सुरू होई.

 तेच भाषणाचे! मुद्दे मनात तयार. टिपण कधीच नेत नसत. दुसऱ्या दिवशी भाषण असेल तर मला म्हणायचे, ‘उद्या मी हे नवीन मुद्दे मांडतो. तुम्हाला सांगतो’. मग ते सांगत. ते नवीन आणि मौलिक असत. पण दुसऱ्या दिवशी त्यांची गुंफण ते इतक्या हळुवारपणे, अनुभवातून मांडत की वाटायचे, ते विचार त्या अनुभवाच भाग आहेत. विचार आणि अनुभवांची गुंफण सरच करू जाणे.

 बरेच वक्ते शास्त्रीय पद्धतीने बोलतात. म्हणजे विषय सिद्धांत मग ते पटण्यासाठी उदाहरण, मग निष्कर्ष. दभिंचे भाषण मात्र सेंद्रिय वाङमयीन अनुभव असायचा. जीएंच्या तत्त्वज्ञानाबद्दल बोलायचे तर, तत्त्वज्ञान म्हणजे काय असे वकिली बोलत नसत. म्हणणार – ‘मित्रहो. संध्याकाळ झाली आहे. आणि ही वेळ आपल्याला हुरहूर लावणारी आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना याक्षणी बालपणच्या संध्याकाळी आठवतील. पण माझ्या मनात आठवत आहे ‘बाधा’ कथेतील संध्याकाळ...’ अशी सुरूवात करून श्रोत्यांचे कथेतील स्थल-काळाशी नाते जोडणार. मधले लौकिक अंतर- वेळ तोडून टाकत. जीवनाचे अत्यंत गंभीर भान व्यक्त करत, नवे विचार प्रवाहीपणे मांडत, अनुभव शोधात श्रोत्यांना सामील करून घेत पुढे जात. वेळ कसा गेला ते कळत नसे. ‘मंत्रमुग्ध होणे’ या शब्दांचा अर्थ काय, ते इथे कळे. सोबत शब्दांची सुरावली. हातवारे व मुद्राभिनय. मध्येच एखाद्या श्रोत्याचे नाव घेऊन नर्मविनोद. कधी एखादी गोष्ट तर कधी आठवणी…अक्षरश: एखाद्या शास्त्रीय संगीतातील मैफिलीप्रमाणे त्यांचे भाषण चढत जाई. यातील एकही ओळ अतिशयोक्त नाही. ज्यांनी एकदा तरी दभिंचे भाषण ऐकले त्यांना माझे म्हणणे समूर्त होत असेल.

 मी बरीच वर्ष त्यांच्या भाषणाचा विचार करीत होतो. इतरांशी त्यांची तुलना करून पाहत होतो. त्याकाळी राम शेवाळकर, निर्मलकुमार फडकुले, शिवाजीराव भोसले ही मंडळी वक्ते म्हणून प्रसिद्ध होती. पण ते मला शब्दनिष्ठ आणि बहिर्मुख वाटत. दभिंचे वक्तृत्व अंतर्मुख असायचे. आतल्या आत ते संवाद साधत आहेत. काही शोधत आहेत असे वाटायचे. मुख्य म्हणजे ते श्रोत्यालाही सामावून घेत प्रश्न उपस्थित करत त्याचे उत्तर जणू सर्वानी शोधायचे आहे अशी जाणीव निर्माण करत. त्यांचे व्याख्यान ही मौखिक समीक्षा तर असायचीच. पण लोकसाहित्यासारखा त्याचा आविष्कार ते सार्वत्रिक करत. लोकगीतात पहिला सूर एकीने आळवला तरी तो तिचा नसतो, ती साऱ्यांच्या मनातले गात असते. तसेच. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाला गर्दी खूप होई. एका मर्ढेकर स्मृतिदिनी त्यांनी शंकरनगरमधील राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या सभागृहात साडेतीन तास व्याख्यान दिले. तरी श्रोते खिळून होते. हा एक विक्रमच. 

 ज्ञानेश्वर, मर्ढेकर आणि जीए हे त्यांचे अत्यंत आवडते लेखक. मराठी साहित्यात या प्रत्येकाने क्रांतिकारक परिवर्तन आणले. ही वाङमयीन परंपरा कायम राहावी म्हणून तिचे स्मरण, चर्चा, विकसन, उपयोजन होत राहावे म्हणून त्यांनीच स्थापन केलेल्या ‘प्रास’- प्राध्यापक सभा-मार्फत ते दरवर्षी गुरूपौर्णिमा, मर्ढेकर आणि जीए स्मृतिदिन साजरा करीत. दरवेळी या प्रतिभावंतावर नवे भाष्य करीत. बाहेरचा वक्ता बोलावला तरी लोकांना दभि काय बोलतात, याचेच औसुक्य असायचे. त्यांच्या गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाची अनेकदा काही जण चेष्टाही करीत. पण सरांनी हे निष्ठेने केले. या तिघांनीही साहित्यामध्ये नव्या परंपरा निर्माण केल्या त्याचे अनुसरण किंवा खंडन व्हावे व विचार पुढे जावा ही त्यांची तळमळ होती. सूत्रसंचालन, आभार, प्रास्ताविक, कार्यक्रम पत्रिका नियोजन यांची जबाबदारी देऊन त्यांनी आम्हाला घडवले. संवाद, संपर्क, निमंत्रण पत्रिकेची कल्पकता, विषयाचे नावीन्य इत्यादी ज्ञान नकळत मिळाले.

| ५ |

 एम. ए. चा निकाल लागला त्या आधीच्या रात्री मी सरांकडे असताना दै. सामनामधून पत्रकाराचा फोन की एम. ए. चा निकाल लागला आहे आणि तो उद्या छापून येणार आहे. सरांनी लगेच वृत्तपत्राला फोन लावला. निकाल मात्र कळू शकला नाही. ते म्हणाले, ‘चला विद्यापीठात’. मी म्हटले, ‘सर, निकाल उद्या पेपर मधून कळेलच आणि आता रात्रीचे आठ वाजत आहे’. ते म्हणाले, ‘असू दे. विद्यापीठाचा गेटवर यादी लावतात. चला.’ आम्ही गाडीतून विद्यापीठ गेटवर. तेथे निकाल वगैरे काही नव्हता. पण सरांची अधीरता होती. इतके आतुर त्यांना मी साहित्य संमेलनाच्या निकालाबद्दलही पाहिले नाही. त्यांनी ‘सामना’च्या कार्यालयात गाडी नेली. निकाल प्रेसमध्ये गेला होता. परत आलो घरी.  

अगदी सकाळी मी सरांकडे गेलो. दै. ‘हितवाद’मध्ये सरांनी माझ्या नंबर अधोरेखित केला होता. मला फर्स्ट क्लास मिळाला होता. ते म्हणत होते, ‘फर्स्ट क्लास मिळाला पाहिजे. मराठीत क्लास मिळणे आणि नापास होणे कठीण.’ मी पाया पडलो. सरांनी हातावर पेढा ठेवला आणि शंभर रूपये दिले म्हणाले, ‘पेढे द्या मित्रांना!’

एम. ए. नंतर बरेच जण गावी गेले. काहींनी होस्टेल सोडले. मी उन्हाळ्याचा चार्ज भरला. होस्टेलवर राहून नेट परीक्षेची तयारी केली. जूनमध्ये परीक्षा देऊनच गावी गेलो. बाबा निवृत्त होऊन चौदा वर्षे झाली होती. घरात खूप अडचणी आणि त्यामुळे तणाव होते. ते मी सरांना फारसे कधी सांगितले नव्हते. सांगायला हवे होते. पण..

आता एम. फिल. करायचे मी ठरवले. त्याच वेळी नागपूरच्या श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयात तासिका तत्त्वावर प्राध्यापक हवा होता. सरांनी मला व डॉ. अरुणा देशमुख यांना अर्ज करायला सांगितले. मुलाखत होऊन मी रुजू झालो. पहिले अध्यापन. मी तरुण. कॉलेज मुलींचे..सर म्हणायचे, ‘बॉस आणि विषमलिंगी व्यक्ती शेगडीसारख्या असतात. जवळ गेलं की चटका बसतो, दूर राहिलो तर ऊब मिळत नाही.’ त्यांचे हे द्राष्टान्तिक कोणत्याही महानुभावाला मोलाचे होते.

  मी शिकवायचो सकाळी आणि दुपारी एम. फिल.च्या वर्गात शिकायचो. प्रबंधासाठी मला नेमाडे किंवा चित्रे यांच्यावर संशोधन करा म्हणाले. चित्र्यांनी साहित्यविचार मांडला नव्हता. मला सैद्धांतिक विषय हवा होता. म्हणून मी ‘भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यविचार’ असा विषय घेतला. डॉ. अक्षयकुमार काळे माझे मार्गदर्शक होते. नेमाडे लौकिकतावादी लेखक. दभि अलौकिकतावादी. १९९९ साली हा विषय मला का दिला ते मला २४ जाने. २०१६ ला सर जाण्याच्या तीन दिवस आधी तेही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कळले. पण तेव्हा सर बोलण्याच्या स्थितीत नव्हते.

अक्षयकुमार काळे सर आणि दभि यांच्यात त्यावेळी तात्विक मतभेद होते; पण विषय किंवा संशोधन या दोन्ही बाबतीत मला काहीच अडचण आली नाही. उलट नेमाडे यांनीही संशोधनाचे कौतुक केले. दभि आणि यशवंत मनोहर यांच्यातही तेव्हा असेच मतभेद होते; पण मी दोघांचाही लाडका विद्यार्थी होतो. माझी एम. फिल. ची मुलाखतही मनोहर सरांनीच घेतली. आपले मतभेद वाङमयात; विद्यार्थ्यांच्या करिअरमधे आणायचे नाहीत ही खोल समज या सर्व शिक्षकांत होती. कारण, पटत नसले तरी त्या तिघांनाही परस्परांचे वाङमयीन योगदान आणि ताकद एकमेकांना माहीत होती. पुढे हे वातावरण निवळले. आता तर त्यातले काहीच उरले नाही. पण त्या काळात आमची कोंडी होत होती हे खरे.

माझी नोकरी होती खरी, पण त्यात फार काही व्हायचे नाही. वर्षाच्या शेवटी आठ हजार मिळायचे. त्यात मेसचे वर्षाचे पैसे साडेतीन हजार. होस्टेल भाडे पंधराशे. एकच ड्रेस. त्या वेळच्या नोकऱ्या ‘करवतही नाही आणि सोडवतही नाही’ अशा होत्या. अशा काळात दभिंशी चर्चा झाल्याने एक आभासी वास्तव निर्माण झाले की काय कुणास ठाऊक: पण नागपूर सोडायचे नाही, असे तेही म्हणायचे आणि मीही. तरी काळे सर म्हणायचे त्यांना चर्चा करायला - बोलायला लेखनिक हवा. पण तू ठरव. त्यांनी मला त्यावेळी लोकसत्तात नोकरीची ऑफर देऊ केली होती. पण तेव्हाचे संपादक आणि दभि यांच्यात विस्तव जात नव्हता. अर्थात त्यांनी मला समजून घेतले असतेच. पण तेच. निष्ठावंत कार्यकर्ते पक्षीय राजकारणात नाहक बळी जातात. त्यांचे शत्रू कार्यकर्त्यांचे शत्रू होतात. हे वाङमयालाही लागू होतेच.

या दरम्यान माझे बरेच लेख प्रसिद्ध झाले होते. गुरूपौर्णिमेला आपले व आपल्या विद्यार्थ्यांचे ग्रंथ प्रसिद्ध व्हावे असा दभिंचा प्रयत्न असे. २००० च्या कार्यक्रमात माझा ग्रंथ प्रसिद्ध करायचा असे त्यांनीच ठरवले. डॉ. प्रमोद मुनघाटे यांचे तनुजा प्रकाशन होते. त्यांनाही माझ्या पुस्तकाबद्दल आत्मीयता होती. ते व्यावसायिक नव्हते. ना नफा ना तोटा ना वितरण तत्त्वावर ते ग्रंथ काढीत. माझ्याजवळ येणारे पैसे वर्षाच्या शेवटी देऊ असे ठरले. सरांनी ब्लर्ब लिहून दिला. पण मला कुठे आत्मविश्वास होता? त्यामुळे सहा महिने मी फाईल घरीच ठेवली.

 एक विशिष्ट मानसिक स्थिती अनुभवण्यासाठी एक विशिष्ट आर्थिक परिस्थिती लागते असे मार्क्स म्हणत असे, ते मी अनुभवत होतो. ग्रंथाची प्रुफे झाली. पाच हजार कमी पडले. ते मित्र रवींद्र डोंगरदेवने दिले. प्रकाशनाच्या दिवशी त्याने मला पांढरा कुर्ता घेऊन दिला. मी होस्टेलवरून त्याच्याच बाईकने सभागृहात गेलेलो. नारायण कुलकर्णी कवठेकर अतिथी होते. ते व डॉ. शुभांगी पातुरकर माझ्या ग्रंथावर भरभरून बोलले. प्रकाशनस्थळीच दीड हजार रूपयांचे ग्रंथ खपले आणि त्या वर्षीचा वि. स. संघाचा पाच हजाराचा नवोदित लेखक पुरस्कार त्याला मिळाला आणि डोंगरदेवाचे कर्ज फिटले. आपल्या विद्यार्थ्याचे असे पदरमोड करून लॉन्चिंग करणारा गुरू विरळाच.

 दभि गुणग्राहक होते. माणसांची अचूक पारखही. मी रायटर झालो त्याच महिन्यात त्यांना लतादीदींच्या हस्ते वाग्विलासिनी पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या अभ्यासिकेत ते मोठे आणि जड स्मृतिचिन्ह ठेवलेले असे. मी ते रोज पुसत असे आणि  हातात धरून पाहत असे. एकदा मी म्हणालो, ‘सर हे किती सुंदर आहे नाही?’ तर म्हणाले, ‘ हो ना. पण तसे एके दिवशी तुम्हालाही मिळेल.’ मला खूप आश्चर्य वाटले तेव्हा. विश्वास बसला नाही. कारण तोपर्यंत मी कुणीच नव्हतो. पण पुढे माझ्या पाहिल्या समीक्षा ग्रंथाला वि. सा. संघाचा पहिला पुरस्कार मिळाला तेव्हा मात्र त्यांच्या शब्दांची आठवण झाली. तो घेऊन मी होस्टेलवर न जाता पहिले त्यांच्या घरी गेलो तर पहिला पेढाही त्यांनीच दिला.  

                                                           | ६ |

माणसाचे आयुष्य असंख्य अतर्क्य गोष्टींनी भरलेले असते. त्याला आपल्या निर्णयाचीही जोड असते. प्रसंग, घटना या दरम्यान योग्य निर्णय घेऊनही अनेकदा अपेक्षित घडत नाही, तेव्हा माणसे नियती मानतात. माझा निर्णयावर विश्वास होता. माणूस दुःख-सुख भोगतो ते त्याच्या निर्णयामुळेच, असे माझे त्यावेळचे तत्वज्ञान होते. तत्त्वज्ञान उत्तर देत नसते, प्रश्न सोडविण्याचा आनंद देत असते. आपण मानतो तेच खरे असे वाटत असल्यानेच समाधान नावाची एक स्थिती तयार होत असते. ते सत्यही नसते आणि वस्तुनिष्ठही नसते. वस्तुनिष्ठतेच्या जवळ जाण्याची आणि अर्धसत्याच्या पातळीवर जगण्याची आपली  धडपड सुरू होते.

  त्यावेळी मी खूप तर्कनिष्ठ आणि बुद्धिवादी होतो. पण जगणे त्याच्या खूप पलीकडचे असते. बुद्धी आणि तर्क, क्वचित तुच्छताही घेऊन मी जगण्याला समोर जात होतो. मोठ्यांच्या खांद्यावर बसून खूप लांबचे दिसते, दूरचे जवळ दिसते. पण ते तसे स्वानुभवाचे नसल्याने ते आभासीच असते. अर्थात हे ज्या वाक्यात आणि ज्या पद्धतीने आता कळते; ती एक दोन वाक्ये- निष्कर्षही, त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी खूप किंमत मोजावी लागते. दभिंच्या सहवासाचे हे साईड इफेक्ट होते. त्यांचे शत्रू, पूर्वग्रह, मते, भूमिकाही आपल्या होतात. जी जाणीव तयार होते तीही; आपली नेमकी कोणती, हेही कळत नाही. तत्त्व की पूर्वग्रह भूमिका की अगतिकता, हे बंधन आहे, की स्वातंत्र्य? कसे ठरवायचे, हे तेव्हाचे खूप तीव्र प्रश्न होते.

 माझ्या बरोबरीचे मित्र होस्टेल सोडून गेले. कुणी तलाठी, कुणी दुकानं, ट्युशन्स.. काहींनी त्यात जम बसवून संसारही थाटला. मी? काय करणार होतो नागपूर सोडून? घरच्या शेतीत काय पिकत होते? शहरात घर असणे वाईट. कारण घर असले की शिक्षण पूर्ण करून माणूस घरी येतो आणि जवळपासचे शोधत बसतो. मी २०० किमी दूर. खेड्यात परतून काय केले असते?

एम. ए. प्रथम श्रेणी, एम. फिल. विद्यापीठात प्रथम. एम. एफ. ए. विद्यापीठात प्रथम. नेट तीन वेळा उत्तीर्ण. पुस्तक प्रकाशित. त्याला पुरस्कार. पीएच.डी. रजिस्ट्रेशन आणि संशोधन. अशी पात्रता. पण घरी परतीचे मार्ग बंद आणि पुढचे नोकरीचेही. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने प्राध्यापक पद भरतीवर बंदी घातली होती आणि मी छोट्या मोठ्या नोकऱ्या करत होतो. मध्ये मुंबई, पुणे दूरच्या जागा यायच्या. सर म्हणायचे पुण्या-मुंबईवाले विदर्भाला डावलतात. (आश्चर्य म्हणजे ते स्वत: मुंबई, कोल्हापूर आणि बनारसला नोकरी करून आले होते. शिवाय नंतर मला पक्की नोकरीही पश्चिम महाराष्ट्रानेच दिली.)

  सरांचे राज्यभर व राज्याबाहेरही मित्र, चाहते होते. पण मीही त्याबद्दल कधी गळ घातली नाही. त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले नाही. जिथे ते एक्स्पर्ट होते तिथे मी अर्ज केला नाही. मी जिथे अर्ज करून नोकरीस लागलो. ते त्यांना आधी सांगू शकलो नाही. रुजू झालो मगच सांगितले. एकमेकांचा लौकिक फायदा न घेणारे आम्ही गुरूशिष्य. दोघेही जोरदारच. मी म्हटले ना, पूर्वग्रह की अनुभव, सत्य की आभास यांच्या व्याख्या नीट न कळण्याचं ते वय. शिवाय आपण निष्ठावंत इतके की ते खरेच वाटावे. शाम धोंड यांनी तेव्हाच्या नवराष्ट्र मध्ये संपादकीय सहाय्यक पद देऊ केले होते. त्यांना सहानुभूती इतकी की मी नोकरी नाकारली तेव्हा चिडून मला त्यांनी मुर्खात काढले. नाकारायचे का तर आपलं वाङमयीन व्यक्तिमत्व बाधित होते, असे दभिंचे सांगणे. खरेही असेल ते. पण जेव्हा मला यवतमाळला नोकरी लागली, तेव्हा सरांनी दिग्रसच्या नोकरीचा आग्रह धरला. कोल्हापूरला पक्की नोकरी होती तेव्हा ते नागपूरच्या जागांबद्दल बोलायचे. माणूस एखाद्या व्यक्तीबद्दल जास्त पझेसिव्ह असेल तर त्यावेळी लॉजिक वापरत नाही. एवढेच शहाणपण मी यातून शिकलो. त्यांना आपण जवळ का हवे होतो ते मला शेवटी दभि मंगेशकर हॉस्पिटल मध्ये अॅडमिट होते, तेव्हा कळले.

                                                              | ६ |

  सरांचे वाचन प्रचंड आणि विविधांगी होते. पहाटे चारला ते उठत. मी, दीपक कधी त्यावेळी येऊन डिक्टेशन घेत असे. आम्ही नसलो तर स्वत: सर लिहीत. ते कायम पहाटे चारला उठत. मला आठवते, अमरावतीच्या जनसाहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मी त्यांच्या बरोबर हॉटेलमध्ये होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता त्यांचे व्याख्यान होते. रात्री उशिरापर्यंत आयोजक डॉ. सुदाम सावरकरांशी आम्ही बोलत होतो. झोपायला दोन वाजले असतील. त्यामुळे मी सकाळी उशिरा म्हणजे सात वाजता उठलो, तर दभि आंघोळ वगैरे आटोपून भाषणाचे टिपण लिहीत बसले होते. मग मीच ओशाळलो. ही पहाटे वाचन- लेखनाची सवय त्यांची अजून कायम आहे.

    प्रचंड वाचनामुळे प्रचंड ज्ञान. मग मी खूप प्रश्न त्यांना विचारत असे. त्याला विषयांचे बंधन नव्हते. ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र, मुक्तिबोधांचे साहित्य, दलित कवितेतील समाजशास्त्रीय दर्शन..खूप. मी एकदा प्रश्न विचारला होता. लाकूड, इमारत किंवा कुठलाही आकार हा आपल्याला परिचयाचा का हवा असतो. त्याला आपण सुंदर का मानतो? त्यात सौंदर्य का शोधतो? सर खूप विचारपूर्वक उत्तर द्यायचे. मानवी प्रवृत्ती, विश्वाचे स्वरूप, सौंदर्याची सनातन मानवी ओढ..मग झिणझिण्या यायच्या. खूप गूढ कळल्याचा आनंद व्हायचा.

   दभिंच्या सहवासाची मला किंमतही खूप चुकवावी लागली. विभागातील काही मित्र माझा व्देष करायचे. माझा दाराबाहेरचा टिफिन खाऊन टाकायचे. अभ्यास करत बसलो तर दाराला बाहेरून कडी लावायचे. मी जेव्हा दभिंना विचारले, तेव्हा त्यांनी मला मार्मिक उत्तर दिले. म्हणाले, ‘जर तुम्ही जास्त पैसा कमावला तर तुम्हाला इन्कमटॅक्स भरावा लागतो. तसे प्रतिष्ठेचेही आहे. ती वाढली की द्वेषाचा टॅक्स भरावा लागेलच. हाच प्रश्न मी माझे गुरू ग. त्र्यं. देशपांडे यांना विचारला होता. त्यांनी जे उत्तर दिले तेच मी तुम्हाला देतो. ते म्हणाले, ‘हे पहा दभि, काही लोक आपल्यावर विनाकारण प्रेम करतात तेव्हा आपण तक्रार करतो का?’

   सरांनी ज्ञान दिलं. धीर दिला. निष्ठा शिकवल्या. चांगुलपणा, नैतिकता शिकवली. त्यामुळे विद्यार्थी त्यांचे झाले. पण एक झालं..त्या सगळ्यांना खूप जास्त इन्कमटॅक्स भरावा लागला. व्यावहारिक जगात या मूल्यांना फार किंमत नव्हती. म्हणून मुनघाटे स्कॉलर असून अकरा वर्षांनी, हेमंत खडके आठ वर्षांनी, कापगते बारा, मी सात वर्षांनी नोकरीला लागलो. डॉ. शुभांगी पातुरकर अजून नोकरीवर नाहीत. दीपक अजूनही वृत्तपत्रातच आहे. मात्र त्यांचा एकेक विद्यार्थी बावन्नकशी आहे हे सांगायला नकोच.

गावाकडे पावसाळ्यात लाल रेशमी किडे शेतात सापडत. करंगळीच्या नखाएवढा आकार. त्यावर कुणी नाजूक हाताने मखमलीचे कापड ताणून छान मापात बसवून शिवलेले. त्यावर बोटाने स्पर्श करायचा मोह होई. मग तासन तास त्यांच्या मागे. सकाळी सकाळीच त्यांचा दिवस सुरू होई. ते तुरूतुरू चालत. स्पर्श केला की पाय आत ओढून थांबत. मी त्यांना गोळा करून काचेच्या छोट्या बाटलीत भरत असे. जरा वेळाने सोडून देत असे. दुसऱ्या दिवशी रस्त्यावर असे बरेच कुणाच्या ना कुणाच्या पायी चिरडून गेलेले असत. त्याचे लाल टिंब जमिनीला चिकटून राही. आजही कधीही गेलो त्या जागेवरून की मन हुळहुळते. सौंदर्य क्षणिक असते. हा सिद्धांत त्या किड्यांनाही लागू होता तर...आमचे असेच होते तर. ज्ञानसौंदर्याच्या मखमली प्राप्त करूनही आम्ही व्यावहारिक वाटेवर असेच चिरडत होतो.  

| ६ |

प्राध्यापक म्हणून मी सिटी बिंझाणीत, महिला बिंझाणीत, मग धरमपेठ कॉलेज अशा तासिका तत्त्वावर खूप नोकऱ्या केल्या. सरांच्या विद्यार्थिनी वैशाली बेझलवार यांच्या पीएच.डी. फेलोशिपच्या काळात दोन वर्षासाठी त्यांच्या रिक्त जागी मी नोकरी केली. दरमहा तीन हजार. ती सुटली त्याच दिवशी मला सरांच्या सांगण्यावरून आकांक्षा मासिकात सहायक संपादक म्हणून नोकरी मिळाली. पगार दरमहा बाराशे. मी सकाळी धरमपेठ, दुपारी बजाजनगर, सायंकाळी प्रतापनगर अशी नोकरी करत असे. सर ती धावपळ पाहून म्हणायचे, ‘आता गाडी घेऊ. गरज पडल्यास मी पैसे देतो.’ त्यांनी तसे एकदोघांना सांगितलेही. शेवटी मी सेकन्डहॅड लुना घेतली. चार हजारात. कोणाची मदत घ्यायची नाही. हात कुठे पसरायचा नाही असे ठरलेले. त्यामुळे अधिक हाल व्हायचे. एकेक मित्र नोकरीत डोनेशन देऊन लागल्याच्या बातम्या यायच्या तेव्हाही सर खूप धीर द्यायचे. त्यांचाही इलाज नव्हता.

एकदा त्यांच्या घरी पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे आले होते. त्यांनी या आधी मला पुण्याला नोकरीची ऑफर दिली होती. (पण तिकडे जाऊ नये असे सरच म्हणायचे) त्यावेळी मी नागपुरात नुकत्याच सुरू होणाऱ्या सकाळ पेपर्समध्ये अर्ज केला होता. त्यांनी लगेच अनंत दीक्षित सरांना फोन लावला व माझ्याबद्दल सांगितले. पुढे मुलाखत होऊन मी पत्रकार म्हणून रुजू झालो. पगार होता पंधराशे. सकाळी दहा ते रात्री बारा अशी नोकरी. माझे पीएच. डी. चे संशोधन थांबलेच. ‘जगणे की ज्ञान’ असा तो संघर्ष होता. मग जगण्याला प्रारंभ झाला. सरांना दुसरा रायटर पाहून दिला. जाणेही कमीच व्हायचे. पहिले तीन महिने तर एकही दिवस सुटी नव्हती. भेटीत अंतर पडत गेले.  ही गोष्ट २००३ सालची.

| ७ |

मला ती संध्याकाळ आठवते. महालच्या टिळक चौकात सायंकाळी चारच्या सुमारास प्रमोद मुनघाटे सरांची अचानक भेट झाली. मी असाईनमेंट आटोपून येत होतो. ते म्हणाले नाश्ता करू. सरांनी मला बटाटेवडे खाऊ घातले. मी त्यांना एक प्रश्न केला, ‘सर तुम्ही एम. ए. प्रथम श्रेणी, नेट, पीएच. डी., शिवाय घरच्या अकरा शाळा- कॉलेज. तरी तुम्ही अकरा वर्षांनी नोकरीस लागला. इतके वर्ष हा धीर तुम्ही कसा आणि कोणत्या प्रेरणेने राखला?’. सर चमकले. त्यांना माझ्यात अकरा वर्षापूर्वीचा प्रमोद दिसला असेल. ते म्हणाले, ‘देवानंद, आपल्याला वाचनाची आवड असते. त्यातून आपण वेडे होतो. व्यवहारापासून दूर जातो आणि आपण जे ग्रंथ वाचतो ना ते लेखक ग्रंथातून भेटतात. ते खूप बुद्धिवादी आधुनिक वाटतात. पण ते प्रत्यक्षात तसे असतातच असे नाही. त्यावरून आपण व्यावहारिक जीवनात काही ठरवू नये एवढे नक्की’. ते खूप शांतपणे आणि समजूतदारपणे बोलत होते. मनापासून. त्यात माझे सांत्वन करणे, स्वत:चे इम्प्रेशन मारणे काही नव्हते. अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगावे तसे ते सांगत होते. मी टक लावून ऐकत होतो. त्याला आता नऊ वर्षे झाली; पण तो प्रसंग आणि वाक्ये मला अजून आठवतात. त्याआधी मी त्यांच्या घरी खुपदा गेलो होतो. आमचे खुपदा बोलणे झाले होते. पण आज प्रश्न, उत्तर, जागा आणि वेळ मन:स्थिती विशेष होती. दोन तास आम्ही बोलत होतो. एकेक रेशमी धागा उलगडत गेला. मखमल सैल होत गेली. काचांतून बाहेरचे स्पष्ट दिसू लागले. पाय सरळ आणि सैल झाले... त्या रात्रीच मी निर्णय घेतला. नागपूर सोडण्याचा! ही गोष्ट डिसेंबर २००४ ची.

पत्रकार मित्र राजेश रामपूरकरने सांगितल्यानुसार मी यवतमाळच्या अणे महिला महाविद्यालयात मुलाखत दिली. त्याच दिवशी माझे सिलेक्शन झाले. ३ डिसें. ला जॉईन होऊन एकच ड्रेस तीन दिवस वापरून तिथे शिकवूनच रविवारी मी नागपुरात परत आलो. ‘सकाळ’मध्ये तत्काळ राजीनामा आणि दिलीप डबीर व दभि सरांनाही त्याचवेळी सांगितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा यवतमाळ. महाविद्यालयात गेटवर दोन नारळाची उंच झाडे होती. वारा वाहत तशी ती हलायची. आतून मीही सळसळायचो. आता चर्चा, फुटाळा, गाडीतून फिरणे, थोरांची ओळख सारे निसटले होते.. सरांपासून आता मी अंतराने दूर आलो होतो. सहवासाचे जंतरमंतर संपून आता नव्या जगात शिरलो होतो. मी पाहिले, एक पिटुकली खार नारळाच्या टोकाकडे हळूहळू निघाली होती.

                                                            | ८ |

२००५ साली मी यवतमाळ सोडून हुपरी, जि. कोल्हापूरला रुजू झालो; तर २०११ ला बदली होऊन पंढरपूरला आलो. सरांना देवादिकांचे काही नव्हते, पण अभिनदादा व नात नेहामुळे त्यांना पंढरपूरला यायचे होते. माझेही बोलावणे होतेच. पण देवाचेच बोलावणे आले. पंढरपूरला असल्याने माझे पुण्याला जाणे व्हायचे. सर जेवणासाठी थांबायचे. कधी स्वत: तर कधी आंब्याचा रस, कधी आईस्क्रीम, कधी घरी कधी बाहेर हॉटेलला. विद्यार्थी हे त्यांना त्यांच्या कुटुंबातलेच वाटत. शेवटच्या दिवसात ते म्हणत असत, ‘एक मंगल कार्यालय बूक करून नागपूर-कोल्हापूरकडचे विद्यार्थी माझे सर्व विद्यार्थी सहकुटुंब यावेत. नातवंडासह. मी एका कोपऱ्यात बसून हे सुख न्याहाळीन’. आपल्या विद्यार्थ्यांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी व वृत्ती यातून दिसते. १९९६ ते २०१६ तब्बल वीस वर्ष सरांशी माझा संबंध होता. यात कधी अंतराय आला नाही. कधी गैरसमज झाले नाही. एकमेकांचे लाभ कधी कुणी घेतले नाही. त्यांच्या ‘अपार्थिवाचे चांदणे’ या ग्रंथाचे माझे परीक्षण ‘पंचाधारा’त छापून आले होते. तेवढा एक लेख सोडला तर त्यांच्यावर मी कधी लिहिले नाही. त्यांच्या समीक्षेवर संशोधन होणे गरजेचे होते, आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी पुढे मार्गदर्शकही झाले, त्यांनीही व सरांनीही कधी माझा विषय पीएच. डी. साठी सुचवा असे कधी म्हटले नाही. एका विद्यार्थ्याने ‘दभिंची काव्यसमीक्षा’ हा विषय घेतला पण ते संशोधन पूर्ण झाले नाही. त्यांचे अनेक गौरवग्रंथ निघाले मात्र त्यातही मी लिहिले नाही. नोकरीसाठी मी त्यांचा व परीक्षणासाठी त्यांनी माझा कधी लाभ घ्यायचा नाही, असे आमचे अलिखित सूत्र आपोपाप ठरून गेले होते. त्याचा कधीही उच्चार त्यांनी केला नाही. मीही. मी १९९९ साली त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर विद्यापीठात पीएच.डी. साठी नाव नोंदवले खरे पण पक्की नोकरी नाही, विविध क्षेत्रे व गावे यांची भटकंती आणि त्यांचे पुण्याला व माझे हुपरी (कोल्हापूरला) झालेले स्थलांतर यामुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. मी पीएच. डी. लवकर पूर्ण करावे असे त्यांना खूप मनापासून वाटे. पुढे २०१३ ला मी शिवाजी विद्यापीठात पुन्हा भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीवर संशोधनासाठी नाव नोंदवले, तेव्हा त्यांनी तर हेकाच लावला. त्यात होणाऱ्या विलंबामुळे, ‘त्याला पीएच. डी. करायची नाही, प्रबंध लिहून नोबेल मिळवायचे आहे,’ असे ते जाखडे-खडके यांच्याजवळ मुद्दाम म्हणत. हेतू लवकर संशोधन पूर्ण करावे हा तळमळीचा. मी १ सप्टें. ते २९ डिसेंबर दरम्यान प्रबंध लेखनाला वाहून घेतले. दरम्यान नेमाडे यांना ज्ञानपीठ मिळाला असल्याने दभिसरांनी त्यांच्या साहित्याचे पुनर्वाचन केले. त्यांना नवे काही सुचले की ते मला फोन करून सांगत. खरेतर त्यांचे आकलन नेमाडे यांचे व्यक्तिमत्त्व व साहित्य यांचा नवा अन्वयार्थ लावणे व ज्ञानेश्वर, मर्ढेकर, जी. ए. आदि त्यांच्या आवडत्या प्रतिभावंतांच्या परंपरेत नेमाडे यांचे स्थान शोधणे व ठरवणे असा होता. तो लेख त्यांनी पूर्ण केला तेव्हा मला फोन केला. त्यांचे म्हणणे की संशोधनाला त्याची मदत होईल. त्यातील सूत्रे त्यांनी ऐकवली तेव्हा मीच पुण्याला येतो असे म्हटले. पुढे डिसेंबर अखेर कच्ची प्रत सादर करणे अनिवार्य असल्याने ते काम पूर्ण झाल्यावरच पुण्याला जायचे असे ठरवले. २९ डिसेंबरला प्रत विद्यापीठात देऊन पुण्याला जाण्याचे ठरवले. दरम्यान लेख वाचला काय, असे ते विचारायचे व अंक इथे मिळत नाही, जाखडे पाठवणार आहेत, नाहीतर मीच पुण्यात येतो आणि मग अंक वाचूनच तुमच्याकडे येतो, असे मी म्हणायचो. या भेटीत माझा प्रबंध दाखवायचा असे ठरले.

पण हाय! २० जानेवारीलाच त्यांना दवाखान्यात अॅडमिट केल्याचे बडोद्याच्या हेमा लेले यांच्याकडून २२ ला रात्री कळले. मी तडक पुण्याला गेलो. पेशंटला भेटू देत नसत. व्हिजीट पास काढून भेटायला जायचे. ‘दीनानाथ’मध्ये सर शांतपणे झोपले होते. याच दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानचा वाग्विलासिनी पुरस्कार त्यांना लताबाईंच्या हस्ते मिळाला होता आणि आता बोलायचे नाही, उठवायचे नाही असा सल्ला होता. मला खूप वाईट वाटले. सकाळी जाखडे सरांकडून मी पद्मगंधा दिवाळी अंक घेतला व ते व मी दोघेही पुन्हा हॉस्पिटलला गेलो. बाहेर थांबलो. एकटाच होतो, अंकातील सरांचा लेख मी तिथेच वाचला. मी वाक्ये अधोरेखित करत होतो, तेव्हा शेजारचा तरुण म्हणाला, ‘कोण आहे, तुमचे अॅडमिट?’. मी सांगितले तेव्हा तो म्हणाला, ‘अहो इथे पेशंटचे नाव दत्तात्रेय कुलकर्णी असे पुकारतात. तेच दभि कुलकर्णी आहेत हे माहितच नाही’. त्याला काय बऱ्याच जणांना ते माहित नव्हते हे बरेच होते. नाहीतर मिडिया, लोक यांच्या गर्दीचा हॉस्पिटलच्या व्यवस्थेला व इतर पेशंटला त्रासच झाला असता. मी दोनदा त्यांना पाहिले. व्हेंटिलेटरवर ठेवलेले व शांत झोपलेले सर. गेल्या बावीस वर्षात मी त्यांना कधी झोपलेले पहिलेच नव्हते. कसे पाहणार? ते पहाटेच उठत व वाचत लिहित. दुपारीही थोडीच विश्रांती घेत. रात्री अकरा वाजता फोन केला तरी जागेच. एक ज्ञानमग्न माणूस असा पहुडलेला मी पहिल्यांदाच पाहत होतो. त्यांना मी आल्याचे व विशेष नेमाडे वरचा लेख मी वाचल्याचे, त्यातील मुद्दे मला आवडल्याचे सांगायचे होते. पण त्यांनी मला नुसते पाहिले. त्यांना आतून पिळवटून आले असावे, कारण तसे चेहऱ्यावर भाव उमटू लागले, आता जास्त वेळ थांबलो तर बांध फुटेल की काय, असे वाटून तडक बाहेर पडायचे ठरवले. मला फार गलबलून आले. दुपारी डॉ. उषा कोटबागी व श्री. कोटबागी आलेत. ते म्हणाले, ‘सर बेशुद्ध नाहीत. मी काल त्यांना दभि म्हणून हाक मारली, त्यांनी डोळे उघडले व ओळखले. अधून मधून पेशंटला असे जागे करा. कुणी आपले वाट पाहत आहे, ही जाणीव महत्त्वाची असते तुम्ही जा. बोला. ‘पेशंट जवळ जाणे इतके शक्य नसते. एक तर पास लागतो, तसेच आतून बोलावले असेल, काही खायला मागितले असेल तर ते देण्यासाठीच आत जाता येते.’ असा हॉस्पिटलचा नियम होता. मग अभिनदादाचा पास मी गळ्यात अडकवला. अंक हातात घेतला आणि गेटवर सांगून आत गेलो. सोबत नात नेहाही आली. मी ‘सर’ अशी हाक मारली आणि त्यांनी डोळे उघडले. ओळखले. त्यांचा चेहरा कसनुसा झाला. त्यात वेदना केविलवाणेपणा नव्हता. बोलण्याची धडपड होती. मी अंक समोर धरला. लेख अप्रतिम आहे. असे सांगितले. ते पुन्हा बोलण्यासाठी धडपडू लागले. काय सांगायचे असेल? इतक्या वर्षातील हीच अशी एक भेट होती की ज्यावेळी आम्ही साहित्यावर बोललो नाही. चर्चा केली नाही. मात्र त्या मौन संवादात सारे काही आले. जो लेख वाचून खुद्द नेमाडे यांचे त्यांना पत्र आले होते, त्यात सरांच्या समीक्षेची सर्व ताकद उतरली होती. त्याच रात्री मी पांढरपूरला परतावे लागलो, कारण दुसरे दिवशी प्रजासत्ताकदिन होता.

२७ ला सोलापूर विद्यापीठात एक मिटींगला जात असतानाच नेहाकडून कळले- सर गेले. त्याच दिवशी अंत्यसंस्कार होते. ते पुण्याच्या वैकुंठ भूमीत झाले. मसाप पुणे आणि इतर दभिंच्या चाहत्यांना त्यांचे पार्थिव परिषदेच्या कक्षात ठेव्याचे होते, सर्वाना अंत्यदर्शन देण्यासाठी. पण अभिनदादांनी त्यांना थेट वैकुंठभूमीत नेण्याचे ठरवले होते. जाखडे त्यांना समजावून सांगून थकले होते. मी निघताना त्यांना फोन केला. ते म्हणाले, ‘कशाला येता, तुम्ही पोचेपर्यंत सर्व आटोपलेले असेल. मला भेटायला यायचे असेल तर या.’ त्या दिवशी मी पोहचू शकत नव्हतो. मात्र दुसऱ्या दिवशी (२८ जाने.) आळंदीला ८ वा. अस्थीविसर्जन होते. मी रात्रीची गाडी पकडून पहाटे स्वारगेटला पोचलो. कोल्हापुरातून कृष्णा गुरव हे सरांचे पहिले लेखनिक, त्यांचे मित्र, नागपुरातून श्याम धोंड, राजा नाईकवाडे आले होते. सारे एकत्रच आळंदीला आले. सर पंढरपूरला कधीच आले नव्हते. सगुण भक्तीपेक्षा त्यांना निर्गुण-ज्ञानभक्तीच महत्त्वाची वाटत होती. आपल्या आवडत्या लेखकाची स्वाक्षरी जपून ठेवण्याचा व त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा हा जमाना. दभि मात्र आपल्या आवडत्या जीएंना कधी भेटले नाही. मर्ढेकरांनाही नाही. त्यांना पत्र फोन कधी संपर्क नाही. लेखक त्याच्या चरित्रातून नव्हे तर त्याच्या साहित्यातूनच समजतो या त्यांची साहित्यशास्त्रीय भूमिकेशी हे सुसंगतच होते. मात्र ज्ञानेश्वरांच्या भेटीचा प्रश्नच नव्हता. ज्ञानेश्वरीच्या या अभ्यासकाच्या अस्थी आता इंद्रायणीत विसर्जित होत होत्या. अशी नाही तर तशी भेट. आमची भेट मात्र आता पुन्हा कधीच होणार नव्हती. हे कळले होते, पचवणे अवघड होते. अभिनदादा, नेहा, यांच्या सोबत साहित्य परिषदेतर्फे महाजन तिथे आले होते. आम्ही अस्थी व फुले इंद्रायणीत विसर्जित केली. आम्ही दहाजणांनी पसायदान म्हटले. आणि परतलो. आळंदीला समाधीच्या प्रवेशदारात नामदेवाच्या अभंगाच्या ओळी लिहिल्या आहेत, त्या आठवत आम्ही इंद्रायणी, आळंदी आणि दभिंचा निरोप घेतला.  

            बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट  | ओघ बारा वाटा मुरडताती

            बांधल्या पेंढीचा सुटलासे आळा | तृण रानोमाळा पांगलेसे

            हरिणीविण खोपी पडियेली वोस |  दशदिशा पाडसें भ्रमताती

            मायबापें आम्हा त्यागियेलें जेव्हां |  ऐसें संकट तेव्हां जालें नाही   

-----------------------------------------------------------------------------------------

( पूर्वप्रसिद्धी: अक्षर वाङ्मय, नांदेड जाने-मार्च, २०२२ पृ. ११६ ते १२८   anandsonu@gmail.com       

नव्वदोत्तर मराठी साहित्यातील आशयसूत्रे : बदलते आयाम

 ९५ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर -२०२२ स्मरणिका  

सहयोगी प्राध्यापक, पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग, डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगाव, जि. सातारा

 

नव्वदोत्तर ही संकल्पना केवळ कालसापेक्ष नाही तर ती मूल्यसापेक्ष संकल्पना आहे. याचा अर्थ, केवळ १९९० नंतरचे लेखन असले म्हणजे ते साहित्य नव्वदोत्तर साहित्य ठरणार नाही; तर या काळात समाज-संस्कृतीत ज्या प्रचंड घडामोडी घडल्या, १९९० नंतरच्या ज्या घटनांनी आपले सामाजिक-सांस्कृतिक विश्व बदलले, त्या बदलत्या विश्वाचे संवेदन ज्या साहित्यात प्रकट झाले; ते साहित्य ‘नव्वदोत्तर साहित्य संकल्पनेत बसणारे आहे. या कालखंडात घडलेल्या महत्त्वाच्या घटना आहेत : गॅट करार व त्यामुळे घडून आलेले जागतिकीकरण, मंडल आयोग आंदोलन व त्यातून ढवळून निघालेले राजकारण, बाबरी मशीद व मुंबई बॉम्बस्फोट आणि त्यानंतर झालेले हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण. या घटनांनी आपले आर्थिक व सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय, धार्मिक व मूल्यात्म संदर्भ बदलून गेले आहेत. समाजजीवनातील या घडामोडींचा परिणाम व प्रभाव साहित्यातील आशययाभिव्यक्तीवर होतोच. नव्वदनंतरच्या साहित्यातही तसाच बदल झाला आहे. त्या बदललेल्या आशयसूत्रांचा व अभिव्यक्ती-प्रयोगशीलतेचा  वेध या लेखात घेतला आहे.

नव्वदोत्तर  संकल्पना

 १९९० नंतर  जागतिकीकरण व त्या खुल्या व्यापारासाठी माहिती तंत्रज्ञान हे माणसाच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले. माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे महाजाल, जागतिक आंतरजाल, त्यातून जागतिक भांडवलदारी पॅकेज, गतिमान होत जाणारा व्यापार, व्यवहार, संवाद-संप्रेषण – हे सारे वेगाने घडून आले आहे. हे जागतिकीकरण खुली अर्थव्यवस्थाप्रधान व ग्राहककेंद्री असल्याने त्याने कल्याणकारी राज्याची संकल्पना मोडीत काढली आहे. गोवऱ्यापासून गोधड्यांपर्यंत काहीही कंपन्यांमार्फत विकल्या जात आहे; आणि लघु उद्योजक, छोटा विक्रेता त्यांच्या प्रत्यक्ष ग्राहक हरवून बसला आहे. एवढेच नव्हे, सामाजिक, राजकीय क्षेत्रात जागतिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रचंड हस्तक्षेप केले आहे. आर्थिक सोडाच, प्रत्येक सामाजिक-सांस्कृतिक व्यवहारातही कंपन्या आल्या आहेत.  मुलगी दाखवण्यापासून विवाह जोडण्यापर्यंत, वाढदिवसापासून हनिमूनपर्यंत सर्व इव्हेंट व्यवस्थापन कंपन्याच करू शकतात. हॉटेलमधील पदार्थ असो की प्रवास, खरेदी असो की विक्री - ग्राहक व विक्रेता यांच्या मध्येही झोमॅटो, ओला-उबार अशा कंपन्या आल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, विमा इतकेच काय, समाजसेवा देखील या जागतिक, तंत्रज्ञांनाधारित झाली. त्यातून घडणारे सगळे मानवी व्यवहार, माहितीचा स्फोट, व्यक्तीच्या खासगीकरणावर आलेला घाला, तिसऱ्या घटकाचे नियंत्रण -यांचेही गंभीर सामाजिक व सांस्कृतिक परिणाम झाले आहेत. त्यातून मानवी आयुष्य व मानवी नातेसंबंधातही प्रचंड बदल घडले. प्रत्यक्ष संबंधांपेक्षा आभासी संबध व प्रत्यक्ष व्यवहारापेक्षा डिजिटल व्यवहार – यांमुळे आज आपले जगणे प्रत्यक्ष किती व आभासी किती, असा प्रश्न पडतो. दोन व्यक्तींमधील बोलणे, प्रवास, सहवास, संभाषण किंवा सहकार्य देखील खाजगी राहिले नाहीत. असा हा नव्वदनंतरचा उत्तर आधुनिक काळ आहे.   

विश्राम गुप्ते यांनी या उत्तरआधुनिक काळाचे व त्यातील बदलाचे विश्लेषण केले आहे.  या जगाचे मिडिया, मार्केट, मनी, मॅनेजमेंट आणि मेडीटेशन हे पाच ‘मकार आहेत: माध्यम क्रांतीमुळे आपल्या ‘हजार-दीडहजार वर्ष रुजलेल्या स्थिर मानवी वर्तणुकीचे नवे आविष्कार जन्माला आले आहेत, नवी मूल्यव्यवस्था रुजू लागली आहे. विशेषत: मानवी जाणीव व नेणीव या दोन्हीतही मिडियाने घुसखोरी करून व्यक्तिगत व सामुहिक मनाचे स्वातंत्र्यच बाधित केले आहे. त्यातून वीस शतकांनी युक्त अशा एका पारंपरिक काळाचा आज ‘अंत’ झाला असून त्याजागी नव्या अपारंपरिक काळाचा उदय झालेला आहे...मूल्यव्यवस्थेच्या संदर्भात सांगायचं झालं तर, हे एकविसावं शतक उपटसुंभासारखं अवतरलेलं आहे. त्याचा गेलेल्या वीस शतकांशी फारसा संबंध नाही. (विश्राम गुप्ते :२०१६: ९) असा त्यांचा निष्कर्ष आहे

याचा अर्थ, आधुनिक काळ व उत्तरआधुनिक काळ यांत फार तफावत असून उत्तरआधुनिक काळातील  जीवनव्यवहार व मूल्यव्यवस्था प्रचंड बदलली आहे. त्यामुळे या काळातील साहित्य निर्मितीचा; केवळ एक साहित्यिक अभिव्यक्ती किंवा एक सांस्कृतिक गोष्ट म्हणून नाही; तर एक आर्थिक प्रॉडक्ट म्हणून विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी  आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक आणि तात्त्विक पर्यावरण विचारात घ्यावे लागणार आहे.   

या आर्थिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीचा परिणाम, बदललेली मानसिक व तात्त्विक परिमाणे; त्याबद्दलची अस्वस्थता आणि नवसंवेदन नव्वदोत्तरी लेखकांच्या लेखनात प्रकटले आहे. या बदललेल्या साहित्याच्या आशयसूत्रांबाबतची निरीक्षणे मी पुढीलप्रमाणे नोंदवली आहेत : 

स्थलांतर प्रवृत्ती :  

जागतिकिकरणामुळे शहरात रोजगाराची साधने व संधी निर्माण होतात त्यामुळे उपजीविकेसाठी खेड्यातील माणसांचे  स्थलांतर घडून येते. त्याला त्याच्या प्रदेशापासून, संस्कृती व मूल्यांपासून दूर जावे लागते. तो नव्या ठिकाणाची नवी बाजारू मूल्यव्यवस्था व जीवनशैली नाईलाजाने स्वीकारतो. त्यात त्याचा आंतरिक संघर्ष होतो. त्याच्या या अंर्तद्वंद्वाचे चित्रण नव्वदोत्तरी साहित्यात येते. उदा. भालचंद्र नेमाडे यांचा चांगदेव पाटील हा नायक कायम स्थलांतर करत असतो. ‘या स्थलांतरात मानवी अस्तित्वाची हवा होऊन जाते असे तो म्हणतो. खुद्द नेमाड्यांनीचस्थलांतर ही फार पुरातनकालापासूनची सगळ्याच मानवजातीला पडलेली, टोचून जाणारी जाणीव असते. या पृथ्वीतलावर आपलं असण्यासारखं एवढंच असतं की, आपल्याला जमीन असते आणि ती जमीनसुद्धा सोडायला लागणं याच्यातून सगळ्या मानवजातीचा इतिहास घडलेला आहे (भालचंद्र नेमाडे: २०१०: ७६) असे सांगितले आहे.

तात्पर्य, नव्वदनंतरच्या सर्व साहित्यप्रकारात ‘स्थलांतर हे एक महत्त्वाचे आशयसूत्र आहे.

चळवळी व तत्त्वज्ञान यांची परवड

जागतिकीकरणात सामाजिक व परिवर्तनवादी चळवळी खिळखिळ्या झाल्या आहेत. कारण या चळवळीने दिलेली मूल्ये, जगण्याची दिशा आणि परीघ यांचे जागतिकीकरणातील भांडवलशाही, साम्राज्यवाद, बाजार व चंगळवाद यांनी संदर्भ बदलून गेले आहेत. किंबहुना साहित्यात घेतलेल्या परिवर्तनवादी भूमिकेमुळे सामाजिक परिवर्तन घडून येते, हे साठोत्तरी लेखकांचे म्हणणे नव्वदोत्तरी लेखकांनी मनावर घेतलेले दिसत नाही. उलट या लेखकांनी हे जागतिकिकरण डोळसपणे पाहिलेले दिसते. त्यामुळे साठोत्तरी कवितांमधून येणारा रोमँटिक विद्रोहाचा- विचार नव्वदोत्तरी काळात दिसत नाही. उलट जागतिकीकरण प्रक्रिया या लेखकांच्या दृष्टीने विरोधाचा नाही, तर समजून घेण्याचा भाग झाला आहे. कारण जागतिकीकरणातून घडून आलेल्या सांस्कृतिक-माध्यम-क्रांतीचे हे लेखक लाभार्थी आहेत. ‘गावगाडा चांगला होता’ असे म्हणणारे हे लेखक शहरात राहताहेत आणि त्यांचे हे म्हणणे ते समाजमाध्यमाचा वापर करूनच सांगत आहेत. त्यामुळे परिवर्तनवादी चळवळी किंवा साहित्यातून ‘परिवर्तन’, ‘क्रांती ही भूमिका बाजूला पडली आहे.

उलट या चळवळीचे कठोर परीक्षण दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी नव्वदोत्तरी साहित्यात दिसते. अरुण काळे यांच्या कवितेत, `ही माझी चळवळ झालीय अ. भा. चिडीमार संघटना `/`कुणाच्या मागे चाललंय बौद्धिक नेतृत्व/ रातोरात क्रांतीची स्वप्न पाहणाऱ्यांना/ सकाळी व्हावं लागतं हास्यास्पद` (नंतर आलेले लोक) अशी खंत येते. राम दोतोंडे, ‘सर तुमच्या दारावर लाथांच्या/ एवढ्या निशाण्या कशा?’(गल्ली बदललेला मोर्चा)  असे विचारतात; तर लोकनाथ यशवंत, ‘ बुद्ध, मार्क्स, फुले असे किती दिवस तेच तेच सांगणार आहात सर/ स्वत:च काहीच सांगत नाही(आणि शेवटी काय झाले?) असे म्हणत आपले ढोंगी पुढारी व स्वार्थी चळवळी यांवर भाष्य केले आहे.

ग्रामजीवनाची ओढ व देशीवादी भूमिकेचे पुनरुज्जीवन

ग्रामीण -दलित साहित्यात मात्र जागतिकीकरणातून निर्माण झालेल्या विकासाच्या संकल्पनेबाबतच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोठी धरणे, सेझ, महामार्ग अशा विकासकामांसाठी जंगल आणि शेती नष्ट होत आहेत. आपले पारंपरिक उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्याने ग्रामीण-दलित व विकासाच्या दुष्परिणामामुळे स्त्रीवादी, पर्यावरणवादी लेखक हे प्रश्न उपस्थित करत असून देशीवादी जाणि‍वेचे लेखक मात्र आपल्या स्मरणातील पूर्वपरंपरेचे, गावगाड्याचे, प्रसंगी जातिव्यवस्थेचे, कृषिसमृद्धीचे गोडवे गाताना दिसताहेत. उपजीविकेसाठी स्थलांतर झाल्याने आपल्या भूमीची, प्रदेशाची, संस्कृतीची व परंपचे स्मरण; आपल्या कला, मौखिक परंपरा यांची ओढ; समर्थन व चित्रण कविता, कथा, कादंबरीतून भालचंद्र नेमाडे, श्रीकांत देशमुख, राजन गवस, प्रवीण बांदेकर इत्यादी लेखक करताना दिसताहेत.

नेमाडे व इतर देशीवादी लेखकांच्या साहित्यात, परिसर व प्रदेशनिष्ठता, देशी परंपरा, देशी संस्कृती, देशी मूल्ये नवनैतिकता, वास्तववाद, लोकभाषा, मौखिकता व देशी रूपबंध यांचा आग्रह आहे. मात्र या आग्रह धरलेल्या व कादंबरीतून साकारलेल्या; देशी संस्कृती, परंपरामूल्ये, व्यक्तिवाद विरोध, इंग्रजी शिक्षण, इंग्रजी भाषा, आंतरराष्ट्रीयता, वैश्विकता, आधुनिक व्यवस्थांविरो, प्राचीन ग्रामरचना, व जातिव्यवस्था या देशीवादी तत्त्वांचे पूर्ण समर्थन करता येत नाही. त्यामुळे, त्यांच्या कादंबऱ्यातून साकारल्या गेलेली ही तत्त्वे स्थितिशील आहेत, समाजाला भूतकाळात नेणारी आहेत, परिवर्तनाला विरोध करणारी आहेत, असा आक्षेपही (रावसाहेब कसबे, मोतीराम कटारे आदी) त्यांच्यावर घेतला जातोय.

प्रसारमाध्यमांचा व दृष्यमाध्यमांचा प्रभाव

 खुल्या अर्थव्यवस्थेला जाहिरातीसाठी विविध माध्यमे हवी होती. डिजिटल फलक, संगणक, इंटरनेट, चित्रपट पडदा अशा सर्व माध्यमातील जाहिराती, मालिका- सिनेमातील दृश्ये, फेसबूक-व्हाटस अप आदी समाजमाध्यमाच्या भिंती यांवरील दृश्यात्मकता - यांचा प्रभाव सर्व साहित्यावर झालेला दिसतो. किंबहुना ‘सांगणे’ कथन पद्धतीत आता ‘पाहणे’ आणि ‘दाखवणेयांची भर पडली आहे. अरुण कोलटकर यांच्यापासून प्रभावी झालेली ही प्रवृत्ती आज सर्वच नव्वदोत्तरी महानगरी कवितेत दिसते; मात्र श्रीकांत देशमुख, महेंद्र कदम, यांच्या कवितामधून ‘दृश्यातून कथन ही पद्धती दिसते. अजय कांडर, यांच्या ‘बाया पाण्याशीच बोलतात या कवितेत दुष्काळाचे चित्रपटासारखे दृश्यचित्रण येते. दिनकर मनवर यांच्या एका कवितासंग्रहाचे शीर्षकच मुळात, ‘दृश्य नसलेल्या दृश्यात असे आहे. राजन गवस यांची ‘ब-बळीचा’ ही कादंबरी कल्लाप्पा कोनेकरी या पटकथा लेखकाच्या डायऱ्या, नोंदी, पत्रे आणि अर्धवट लिहिलेल्या पटकथेतील दृश्यातून समोर येते. तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर केलेला प्रभाव व त्यातून त्याचे होणारे वस्तूकरण, यांत्रिकीकरण, हतबलता हेमंत दिवटे, मंगेश नारायण काळे, नितीन बोरसे, संजीव खांडेकर आदींच्या कवितांमधून येते.

आशयाच्या या दृश्यसापेक्षतेमुळे व त्यामागील आर्थिक गणितांमुळे साहित्याच्या माध्यमान्तराची प्रक्रिया - कथा- कादंबरीवरून चित्रपट, कथेवरून नाटक, नाटकावरून चित्रपट अशी घडून आलेली दिसते. उदा. ‘शाळा’-कादंबरी ते चित्रपट, ‘नटसम्राट’-नाटक ते चित्रपट, ‘बैल’-कविता ते चित्रपट, ‘नटरंग’-कादंबरी ते चित्रपट - अशी काही त्याची उदाहरणे सांगता येतील. तसेच ‘स्टोरीटेल’ सारखी माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे कथा ‘वाचणे प्रकार बाजूला पडून कथा ‘ऐकणे हा प्रकार पुन्हा लोकप्रिय होत आहे. तात्पर्य मौखिक कहाण्या ‘ऐकण्यापासून, मुद्रण काळात ‘वाचणे-पाहणे आणि आता पुन्हा ‘ऐकणे’ अशा प्रक्रियेतून मराठी कथा पुढे येताना दिसते आहे.  

बहुभाषिक- बहुसांस्कृतिक आशयाला प्राधान्य

भारत हा बहुभाषिक व सांस्कृतिक विविधता असलेला देश आहे. त्याची ही विविधताच जागतिकीकरणामुळे धोक्यात आणलेली आहे. पेहराव, पदार्थ, मूल्ये, प्रवाससाधने, आहार, व्यापार पद्धत या साऱ्यांचे सपाटीकरण झाले आहे. जग हे एक खेडे झाल्याने प्रादेशिक विविधता नष्ट झाली आहे, त्यामुळे पुन्हा आपल्या संस्कृती-मूल्यांचे, प्रथांचे व नष्ट होऊ पाहणाऱ्या भाषिक अवकाशाचे, बोलीचे पुनरुज्जीवीकरण करण्याची प्रवृत्ती पुढे आली आहे. रफिक सुरज, अजीम नवाज राही आदींच्या कादंबरी-कथा लेखनातून मुस्लीम समाजाचे प्रश्न व समस्या मांडल्या जात आहेत.

जागतिकीकरणात अल्पभूधारक व लघुउद्योगावर पोट भरणाऱ्या समूहाचे खूप हाल झाले आहेत. अशीच अवस्था भटक्या-विमुक्तांची आहे. पारधी, नंदीवाले, वंचित यांचीही परवड झाली आहे. त्यामुळे आपली सांस्कृतिकता नष्ट होत आहे, जगण्याचे प्रश्न तीव्र होत आहे, याचे चित्रण या समूहातील साहित्यात येते. अनेकदा तर त्याचे आविष्करणही त्या त्या समूहाच्या  बोलीत होत आहे. उदा. संजय बालाघाटे यांचा ‘न्हांगुळ आदार इला (आम्हाला आधार नाही) हा कवितांचा संग्रह भटक्या विमुक्तांच्या ‘खिवारी बोलीतील आहे. ‘बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्या’ हा डॉ. शेषराव मोरे यांचा कथासंग्रह उदगीरच्या प्रादेशिक बोलीचे आविष्करण करतो आहे. नाथपंथी डवरी गोसावी समाजातील डॉ.  नारायण भोसले यांचे ‘देशोधडी हे आत्मकथन; तर कुठलेही सांस्कृतिक संचित नसलेल्या अल्पभुधारक कुणबी कुटुंबात जन्मलेल्या शरद बाविस्कारांचे ‘भुराहे आत्मकथन -  वर्गीय विषमता, साधनांची कमतरता, संधीचा अभाव; जातीय विषमतेचा अनुभव, अशा उणिवांशी संघर्ष करत एक मध्यमवर्गीय, बुद्धिजीवी होण्यापर्यंतचा प्रवंचित घटकांचा प्रवास यात आहे. अशा काही नव्या भूमिका घेऊन आलेली आत्मकथने – हे सारे मराठी साहित्याचा परीघ अधिक बहुसांस्कृतिक व बहुभाषिक करणारेच आहे.

लेखक वर्गातही वाढ

इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणामुळे मुळे मराठी वाचक कमी होत असला तरी लिहिणाऱ्या लेखकांची संख्या मात्र वाढत आहे. पूर्वी कथनात्म साहित्यच जास्त वाचले जायचे. आज आरोग्य, शिक्षण, पाककला, पर्यटन, वैद्यकक्षेत्र, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील लेखन वाचले जात असल्याने डॉक्टर, शिक्षक, शेफ, उद्योजक, चळवळींचे कार्यकर्ते, स्त्रिया, पुरुष, अगदी शाळकरी मुलेही लिहू लागली आहेत. श्रुती आवटे या दहावीत शिकणाऱ्या मुलीची ‘लॉग आउट नावाची कादंबरी मॅजेस्टिकने प्रसिद्ध केली आहे. तिच्या वयाचे अनुभव तिने या कादंबरीत मांडले आहेत.  शिवाय वाचक संख्येने कमी झाला असला तरी वाचकाचे क्षेत्र केवळ मध्यमवर्गीय वा बुद्धिजीवी वर्ग इतकेच मर्यादित राहिले नाही. सर्व क्षेत्रे, सर्व वयोगट व सर्व सामाजिक स्तर असा व्यापक परिघात वाचक विस्तारला आहे.

या वाचकांची अभिरुची आणि गरजाही नव्वदनंतरच्या काळात बदलल्या आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे. फडके-खांडेकरांच्या काळात केवळ मनोरंजनासाठी कथा-कादंबऱ्या वाचल्या जायच्या. आता त्या मनोरंजनाची पूर्तता मालिका-सिनेमे ही माध्यमे करीत आहेत. उलट कविता, कथा, नाटके यांच्या माध्यमातून वाचकांना आजचे जगणे, आपला समकाल व आपले प्रश्न समजून घ्यायचे आहेत. भोवतालचे प्रत्यक्ष वास्तव व आभासी वास्तव यांचा गुंता त्याला जाणून घ्यायचा आहे.

जागतिकीकरणात बाह्य संस्कृतीच्या रेट्यामुळे आपला इतिहास, अस्मिता व संस्कृती यांच्यावर आक्रमण होते, म्हणून ते सर्व जाणून घेण्याची तीव्र इच्छा असल्याने आजच्या कादंबरीचे ‘निव्वळ मनोरंजन हे प्रयोजन नाही. आपला प्राचीन समाज-संस्कृती-इतिहास वाचकाला जाणून घ्यायचा आहे. (भालचंद्र नेमाडे-‘हिंदू’) आपल्या पूर्वजांचा इतिहास व न शोधल्या गेलेल्या अस्मिता, पूर्वजांचा न मांडला गेलेला इतिहास व पराक्रम त्याला जाणून घ्यायचा आहे. (रंगनाथ पठारे-‘सातपाटील कुलवृत्तांत’) किंवा आजवर कुठेही नोंद न झालेला दलितांचा सांस्कृतिक इतिहास (शरणकुमार लिंबाळे- ‘सनातन), याशिवाय आपापल्या जातीचा- समाजाचा अज्ञात इतिहासही (उदा. शरद गायकवाड- ‘मातंगाची शौर्यगाथा’) त्याला जाणून घ्यायचा आहे. त्यामुळे केवळ साहित्य व समाज नव्हे; तर इतिहास, संस्कृती, पर्यावरण, भूगोल, लिपी, भाषा, समाजशास्त्र व मानववंशशास्त्रही आजची कादंबरी वाचकाला ज्ञात करून देत आहे.

लोकप्रिय साहित्य व बदलती माध्यमे

वाचकसापेक्षतेने पाहता काळ कोणताही असो, लोकप्रिय साहित्याला मात्र मरण नाही. आधी कथा-कादंबऱ्या, नंतर सिनेमाच्या पटकथा यांच्या जोडीला आज दूरदर्शन, विविध वाहिन्यांच्या मालिका, वेब सिरीज, ओटीटी प्लॅटफॉर्म, शॉर्ट फिल्मस ही माध्यमे वाचकांची लोकप्रिय कथानकांची ही भूक भागवायल्या सज्ज आहेत. या सर्वांचे आशय मात्र सुखवस्तू जीवन, उपभोगवाद, नवश्रीमंती, चंगळवादी खाद्यसंस्कृती, लैंगिकता यांच्याशी निगडीत आहे. किंबहुना या सगळ्यांकडे पाहण्याचा एक खुलेपणा नव्वदनंतरच्या जागतिकीकरणामुळे आला आहे. म्हणजे एखादे लैंगिक दृश्य असलेल्या सिनेमावर बंदी घालण्यासाठी साठोत्तरी काळात मोर्चे निघायचे, त्याच महाराष्ट्रात दोन वर्षापूर्वी ‘एक चावट संध्याकाळ या नाटकाचा प्रयोग महिलांसाठी खुला ठेवावा अशी मागणी महिलांकडूनच झाली होती. कोल्हापूर - सांगली येथे आजही खास महिलांसाठीच्या लावणी ‘शो लावले जातात. तात्पर्य, लोकप्रियतेसाठी लिहिले जाणारे लेखन वाढत आहे; मात्र त्यात कथा-कादंबरी केंद्रस्थानी नाहीत; तर इतर दृश्यमाध्यमे या कामी वापरल्या जात आहे. हा फार मोठा बदल नव्वदनंतरच्या बाबतीत दिसून येतो. 

व्यक्तिस्वातंत्र्य संकोच व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला

            कधी नव्हे ते या काळात जगभर उजव्या विचारसरणीला जास्त प्राधान्य मिळालेले दिसते. वर्णवाद, जातवर्चस्व किंवा धार्मिक मूलतत्त्ववादाने डोके वर काढले असून अशी मंडळी जगभर सत्तेच्या केंद्रस्थानी दिसत आहेत; आणि समजा नसली तरी असे गट आपली सांस्कृतिक सेन्सॉरशिप राखू पाहत आहेत. त्यातून ‘लिहिणे; या प्रकारावर दबाव, नियंत्रण किंवा मुस्कटदाबी हा प्रकार नव्वदनंतर जास्त रूळलेला दिसतो. कविता असो की कादंबरी- आज स्वान्तसुखाय काही लिहिता येत नाही. जबाबदार लेखकाला काही टाळता येत नाही, कारण हा जबाबदार लेखक लोकशाही मानणाऱ्या नागरिक-वाचकांचा प्रतिनिधी आहे. मात्र एका प्रादेशिक भाषेत व विशिष्ट स्थळ-काळात लिहिले असले तरी गतिमान माध्यमांमुळे ते लेखन जगभर पसरले जाते; आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रियाही त्वरित उमटतात. आज तंत्रज्ञानामुळे कुणावरही पाळत ठेवता येते. तुम्ही प्रस्थापित व्यवस्थाच्या विरोधात लिहू नका, नाहीतर संपवले जाईल, असे समाजमाध्यामांवर ट्रोल केले जाते. किंबहुना, त्या विद्वेषातून लेखकावर हिंसक हल्लाही होऊ शकतो. नुसत्या धमक्याच नव्हे तर डाव्या विचारसरणीच्या लेखकांच्या हत्याही याच काळात घडत गेलेल्या आहेत. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्त्या ही याची उदाहरणे. प्रसिद्ध तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांनी २०१५ला त्यांच्यातील ‘लेखक मेला आहे’ असं त्यामुळेच जाहीर केलं होतं. या विषयावरही नव्वदोत्तरी लेखकांनी भाष्य केले आहे. याबाबत प्रवीण बांदेकर यांची ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या नावाची कादंबरी किंवा जयंत पवार यांच्या ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी या कथासंग्रहाचा उल्लेख करता येईल. दहशतवाद, धार्मिक उन्माद तसेच कौटुंबिक हिंसेच्या मरणांपासून बदलत्या सामाजिक अवकाशातील लेखकांची मरणरूपे पवार यांच्या कथेत आहेत.

या काळात स्वातंत्र्य नष्ट झाले आहे, खाजगीपणा नष्ट झालाय, आपल्यावर कुणाची तरी पाळत आहेत. आपले प्रत्येक व्यवहार – केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक कृती; एवढेच नव्हे तर लोकशाही व मतदान सुद्धा - यांवरही कुणी नियंत्रण ठेवून आहेत, याची जाणीव सर्वच संवेदनशील लेखक - कवींना अस्वस्थ करताना दिसते आहे.

लेखकांची दोन गटात वर्गवारी

खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर, रोजगार, उदरनिर्वाह साधने, संवाद, प्रवास, पर्यटन एकूणच जगणे व संस्कृतीतील प्रचंड बदल झाल्यामुळे त्या बाबत दोन प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. एक म्हणजे, आहे त्याचा स्वीकार करणे व त्यानुसार स्वतःत बदल करणे; दोन, जागतिकीकरणाला विरोध करणे व परंपरा संस्कृतीचे पुनरुज्जीवन करत ‘देशी संस्कृतीचा आग्रह धरणे.

नव्वदनंतरच्या मराठी साहित्याच्या आशयाचे प्रमुख वर्गीकरण या दोन गटात करता येते. त्यानुसार साहित्यातील प्रवाहांचेही या दोन गटात सामान्यत: वर्गीकरण करता येते. पहिल्या गटात स्त्रीवादी व महानगरी साहित्य; तर दुसऱ्या गटात देशीवादी व ग्रामीण साहित्य. पहिल्या गटातील आशय अभिव्यक्तीचा कल जागतिकीकरणाला तीव्र विरोधाचा नाही; तर ही प्रक्रिया समजून घेण्याचा, किंबहुना त्यात होणारी जगण्याची अस्तित्वाची कोंडी मांडण्याचा व आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्याकडे आहे. 

दुसऱ्या गटातील लेखकांचा कल- जागतिकीकरणाला नाके मुरडण्याचा, आपल्या जुन्या परंपरा व संस्कृतीत रमण्याचा व तिचे पुनरुज्जीवन करण्याचा आहे. अर्थात यातील बरेच लेखक स्वीकार-नकाराच्या गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आंबेडकरवादी लेखक मात्र स्वीकार-नकार या प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन जुन्याचा आग्रह न धरता परखड विश्लेषण करू पाहत आहेत.     

नव्या आकृतिबंधाला, प्रयोगशीलतेला, गूढता, अद्भूतता व मौखिक परंपरेला महत्त्व

आशय बदलला की तो मांडण्याची शैली बदलतेच. आपल्या प्रचलित भाषा व्यवस्थेच्या आकलनाच्या आणि आवाक्याबाहेरचा हा विषय असल्याने प्रचलित भाषेची मोडतोड करणे, नव्या भाषिक व्यवस्था व रचना निर्माण करणे, नवे आकृतिबंध तयार करणे, जुने संकेत बदलून नवे संकेत निर्माण करणे- हे दोन्ही गटातील लेखकांकडून घडत आहेत. अगदी कवींची उदाहरणे घ्यायची तर ‘नाळ तुटल्या पुरुषांचे दृष्टांत, किंवा ‘लीळा तिसऱ्याच्या’ आणि आता ‘मायाविये तहरीर या मंगेश नारायण काळे यांच्या कविता संग्राहांचे स्वरूप पाहिले तरी ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. प्रसारमाध्यमांची, संगणकांची, तंत्रज्ञानाची, आभासी वास्तवाची भाषा आपल्याला हेमंत दिवटे, संजीव खांडेकर,  नितीन बोरसे यांच्या कवितेत दिसते. दिवटे यांच्या ‘ या खोलीत आलं की लाईफ सुरू होतं नावाच्या कवितेच्या शीर्षकावरूनच बाह्य वास्तवापेक्षा आभासी वास्तवात जगण्याचा आशय व त्याची भाषिक शैली दिसते. नमुन्यादाखल नितिन कुलकर्णी यांच्या कवितेतील या ओळी पहाव्यात-

ह्या इथे आलेल्या सर्वांन्ना पेट्रोल मिळेल

ह्या इथे आलेल्या सर्वांन्ना दर्शन मिळेल

ह्या इथे आलेल्या सर्वांन्ना आशीर्वाद मिळतील

लक्षात ठेवा

जो कार देतो तोच पार्किंगही दील

जो ब्रेक देतो तोच वेगही दील

ज्यानं क्यू दिला तोच नंबरही दील

शहरातील नागरिकान्नो  

           दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे देशीवादी-ग्रामीण लेखकांनीही मौखिक शैलीचा आकृतिबंध वापरलेल्या दिसतो. उदा. ‘खेळखंडोबाच्या नावाने (प्रवीण बांदेकर) मध्ये दवंडी फॉर्म वापरला आहे; तर पिढीप्येस्तर प्यादेमात’ (संतोष पद्माकर पवार) यांत लोकसाहित्याची मौखिक शैली  (ओवी, दवंडी, खुत्बा) वापरली आहे. देशी लोकगीतांची लय, देशी शब्द, लोकसंस्कृतीतील प्रतिमा, मिथके किंवा त्यांचा नव्या संदर्भातील वापर केला जातोय.

भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांत ‘सांगणे या कथन परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे ‘हिंदू च्या सुरुवातीलाच ‘खंडेराव, तुम्ही गोष्टच सांगत जावा राव असे स्वागत म्हणतो. त्यांच्या कोसला ते ‘हिंदू’ या कादंबऱ्यात अर्पणपत्रिकेपासून देशीवादी आकृतिबंध कसा वापरला आहे हे मी माझ्या शोधप्रबंधात दाखवून दिले आहे.[1]

प्रवीण बांदेकर यांच्या ‘चाळेगत कादंबरीतही शंकासुराच्या पात्राच्या माध्यमातून कथा गुंफलेली आहे तर; त्यांच्याच ‘इंडियन ॲनिमल फार्म’ मध्ये समकालीन राजकारणाची गोष्ट सांगण्यासाठी कथासरित्सागर, इसापनीती व पंचतंत्र या प्राचीन भारतीय कथासंहितेतील प्राणीकथेच्या रूपबंधाचा वापर केला आहे. एका भासचित्राचा आधार घेत काहीतरी कल्पनारंजित असं वास्तव निर्माण करणं आणि संपूर्ण कथानक त्याभोवती फिरवणं. त्याचा वास्तव जीवनाशी संबंध जवळ जवळ नसणं - अशी प्रणव सखदेव यांची ‘96 मेट्रोमॉल’ ही कादंबरी आहे. कित्येक शतकांपूर्वी अमेझॉनच्या जंगलात गेलेल्या आपल्या पूर्वजांचा शोध निवेदकाच्या आजोबांना लागला आहे आणि त्या संबंधात ते आपल्या नातवाला म्हणजे निवेदक क्रमांक दोनला सांगत आहेत. त्याचं कुतूहल चाळवलं जातं नि तो इंटरनेटवर शोध घेतो, अमेझॉनच्या जंगलात पोचतो, अशी अद्भुतता (फँटसी) या कादंबरीत आली आहे. हृषिकेश गुप्ते यांच्या ‘दंशकाल,  ‘घनगर्दअशा कादंबऱ्यातून म्पुन्हा गूढ व अद्भूतरम्य प्रवृत्ती नव्याने रुजू पाहत आहे.          

  पर्यावरणवादी तीव्र जाणीव  

 जागतिककरणात ‘विकास’ हा शब्द परवलीचा बनला आहे. मात्र विकास कोणाचा व कोणासाठी? आणि तो करताना मानवी साधन संपत्तीचा होणारा ऱ्हास व पर्यावरणाचा विनाश, त्यातून धोक्यात आलेले सृष्टी अस्तित्व यावर दोन्ही गटातल्या लेखकांनी लिहिल्याचे दिसते. नव्वदनंतर ‘हवा, पाणी राहिले नाही सर्वांचे अशी खंत अरुण काळे व्यक्त करतात. पर्यावरण ऱ्हासासोबतच, जागतिक प्रदूषण यांमुळे- पर्यावरणवादी चळवळी, त्याबद्दलचे ग्रंथ या काळात जास्त लिहिल्या जात आहेत. अगदी प्रज्ञा दया पवार, नीरजा (स्त्रीवादी) तर कल्पना दुधाळ (देशीवादी), अनुराधा पाटील (अस्तित्ववादी) -अशा विविध प्रवृत्तीच्या कवितांतून; ‘अवकाळी पावसाची गोष्ट सारख्या आनंद विंगकर यांच्या कादंबऱ्यातून - सर्वच लेखक कवींच्या साहित्यातून ही जाणीव तीव्रपणे समोर येत आहे.

ई-साहित्याचा बोलबाला

            तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे मराठी संकेतस्थळ, ब्लॉग, समाजमाध्यमे, ई-साहित्य या आभासी माध्यमात लिहिणाऱ्या लेखकांची व तशा वाचकांची संख्या वाढत आहे. मात्र या सर्व लेखकांमध्ये ‘क्रिएट आणि ‘फॉरवर्ड प्रवृत्ती जास्त दिसते आहे.  या प्रक्रियेत समग्र अनुभव घेणे, त्याचे सर्व संदर्भ तपासणे, विविध पैलू व अंतर्विरोध समजून घेणे, या चिंतन मनन प्रक्रिया अभावी लिहिण्याची प्रचंड घाई नवलेखकामध्ये दिसते. ‘सुचले ते लिहिले आणि वाचले ते पाठवले’ अशी घाई या ‘माध्यमीलेखक-वाचकांमध्ये दिसते. ‘आम्ही लिहितो त्याला ‘साहित्य म्हणा, ज्याला आम्ही ‘साहित्य म्हणतो त्याला तुम्ही ‘चांगले म्हणा अशी ही प्रवृत्ती नावमाध्यमी लेखकांची दिसते आहे.

 साचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे आणि एकच लेखन चार-चार संकेतस्थळांवर टाकण्याची सवय, प्रसिद्धीचा सोस व स्वतःला कायम चर्चेत ठेवण्याची वृत्ती- सेल्फी, रील प्रमाणे लेखनातही दिसते. त्यातून गोळा झालेले लेखन स्वखर्चाने प्रसिद्ध करणे लेखक मान्यतेसाठी धडपडणे या वृत्तीही नव्वदनंतरच्या आर्थिक समृद्धीतून निर्माण झालेला सांस्कृतिक परिपाक आहे.  

लैंगिकता प्रधान लेखन

            १९६०च्या दरम्यान अपवादाने किंवा धाडसाने प्रकटलेली ‘लैंगिकता ही प्रवृत्ती १९९० नंतर सहजपणे व सार्वत्रिकपणे दिसते. कविता महाजन यांच्या ‘ब्रमध्ये वेश्याजीवनाचे, तर भिन्न मध्ये तृतीयपुरुषांचे जग प्रकटले. सानिया-मेघना पेठे यांच्या कथालेखनात, स्त्रीपुरुष संबंधांच्या पार्श्वभूमीवर सर्रास लैंगिक अनुभवाचे चित्रण येते. किरण येले यांच्या ‘मोराची बायकोइत्यादी, सचिन कुंडलकर यांच्या ‘नाइन्टीन नाइन्टी’ अशा कथासंग्रहांतून प्रेम आणि लैंगिकता यांचा शोध दिसतो. दिशा पिंकी शेख यांच्या कवितेतील तृतीयपंथीयांचे जगही मराठी वाचकांनी नाके न मुरडता स्वीकारले आहे, ही समाधानाची बाब आहे.  प्रणव सखदेव यांची ‘काळेकरडे स्ट्रोक्समध्ये किंवा सचिन कुंडलकर यांच्या ‘जंगलमध्ये तर पोर्नोग्राफिक वाटावी अशी वर्णने येत आहेत. पण हे लेखन अधिक वाचकप्रिय होत आहे. तात्पर्य नव्वदनंतरच्या साहित्याला स्त्री-पुरुष संबंधांसोबतच समलैंगिक संबंधही वर्ज्य नाहीत; उलट लैंगिकतेबद्दलची भूमिकाही खुली झाल्याचे दिसते आहे. 

जाता जाता

जाता जाता साहित्यप्रकारनिष्ठ काही लेखक व त्यांच्या प्रवृत्ती यांची नोंद करून हा लेख संपवतो. नव्वदनंतरचे श्याम मनोहर, जयंत पवार हे लेखक उत्तर आधुनिकतावादी असून त्यांच्या अनुक्रमे ‘शीतयुद्ध सदानंद’ (कादंबरी) व ‘काय डेंजर वारा सुटलाय’ (नाटक) या साहित्यकृती या दृष्टीने अभ्यासण्यासारख्या आहेत. याच काळात उद्योगजगतातील बेकारीचे चित्रण ‘जुगाड’ (किरण गुरव), उद्योजक, व्यवसायिकांची आत्मचरित्रे  (उदा. इडली, ऑर्किड आणि मी); अनुवादित साहित्याचे मोठे जग, सिनेसृष्टीतील अभिनेत्यांचे अनुभव, कॉर्पोरेट जगाचे अनुभव, भालचंद्र मुणगेकर, नरेंद्र जाधव अशा कुलगुरूंची आत्मचरित्रे – असे साहित्याचे मोठे दालन मराठी वाचनसंस्कृतीच्या परिघात नव्वदनंतरच्या काळाने आपल्यासमोर खुले केले आहे. वाचक, लेखक व सामान्य माणूस या तीस वर्षात साहित्याच्या मोठ्या परिघात आला आहे; पण प्रत्यक्ष जगणे आणि आशयाशी प्रामाणिक राहून लिहिणे - या  दृष्टीने पाहता ‘भयंकराच्या दारातउभा आहे, असे म्हणता येते.  

संदर्भ सूची

·      कटारे मोतीराम, २०१०: देशीवाद: रूप आणि रंग, औरंगाबाद, गोदा प्रकाशन

·      कसबे रावसाहेब, २०१६ : देशीवाद समाज आणि साहित्य, लोकवाङमय गृह, मुंबई

·      गुप्ते विश्राम, २०१६ : नवं जग, नवी कविता, संस्कृती प्रकाशन, पुणे 

ने     नेमाडे भालचंद्र, २०१० : निवडक मुलाखती, (दु.) मुंबई, लोकवाङमय गृह,



 

लेखक मराठीतील नव्या दमाचे समीक्षक असून डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव, जि. सातारा येथे मराठीचे सहयोगी प्राध्यापक आहेत.

 



[1] ‘साहित्यविचार आणि भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्या’, (प्रबंध), डॉ. देवानंद सोनटक्के, शिवाजी, विद्यापीठ कोल्हापूर, २०१७


द. भि. : सहवासाचे जंतरमन्तर : डॉ. देवानंद सोनटक्के

  दभि : सहवासाचे जंतरमंतर :    डॉ.   देवानंद सोनटक्के वर्ष १९९६. त्यावेळी मी एम . ए . साठी नागपूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये मराठी विभागात...