Tuesday, May 3, 2022

नव्वदोत्तर मराठी साहित्यातील आशयसूत्रे : बदलते आयाम

 ९५ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर -२०२२ स्मरणिका  

सहयोगी प्राध्यापक, पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग, डी. पी. भोसले कॉलेज, कोरेगाव, जि. सातारा

 

नव्वदोत्तर ही संकल्पना केवळ कालसापेक्ष नाही तर ती मूल्यसापेक्ष संकल्पना आहे. याचा अर्थ, केवळ १९९० नंतरचे लेखन असले म्हणजे ते साहित्य नव्वदोत्तर साहित्य ठरणार नाही; तर या काळात समाज-संस्कृतीत ज्या प्रचंड घडामोडी घडल्या, १९९० नंतरच्या ज्या घटनांनी आपले सामाजिक-सांस्कृतिक विश्व बदलले, त्या बदलत्या विश्वाचे संवेदन ज्या साहित्यात प्रकट झाले; ते साहित्य ‘नव्वदोत्तर साहित्य संकल्पनेत बसणारे आहे. या कालखंडात घडलेल्या महत्त्वाच्या घटना आहेत : गॅट करार व त्यामुळे घडून आलेले जागतिकीकरण, मंडल आयोग आंदोलन व त्यातून ढवळून निघालेले राजकारण, बाबरी मशीद व मुंबई बॉम्बस्फोट आणि त्यानंतर झालेले हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण. या घटनांनी आपले आर्थिक व सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय, धार्मिक व मूल्यात्म संदर्भ बदलून गेले आहेत. समाजजीवनातील या घडामोडींचा परिणाम व प्रभाव साहित्यातील आशययाभिव्यक्तीवर होतोच. नव्वदनंतरच्या साहित्यातही तसाच बदल झाला आहे. त्या बदललेल्या आशयसूत्रांचा व अभिव्यक्ती-प्रयोगशीलतेचा  वेध या लेखात घेतला आहे.

नव्वदोत्तर  संकल्पना

 १९९० नंतर  जागतिकीकरण व त्या खुल्या व्यापारासाठी माहिती तंत्रज्ञान हे माणसाच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले. माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे महाजाल, जागतिक आंतरजाल, त्यातून जागतिक भांडवलदारी पॅकेज, गतिमान होत जाणारा व्यापार, व्यवहार, संवाद-संप्रेषण – हे सारे वेगाने घडून आले आहे. हे जागतिकीकरण खुली अर्थव्यवस्थाप्रधान व ग्राहककेंद्री असल्याने त्याने कल्याणकारी राज्याची संकल्पना मोडीत काढली आहे. गोवऱ्यापासून गोधड्यांपर्यंत काहीही कंपन्यांमार्फत विकल्या जात आहे; आणि लघु उद्योजक, छोटा विक्रेता त्यांच्या प्रत्यक्ष ग्राहक हरवून बसला आहे. एवढेच नव्हे, सामाजिक, राजकीय क्षेत्रात जागतिक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रचंड हस्तक्षेप केले आहे. आर्थिक सोडाच, प्रत्येक सामाजिक-सांस्कृतिक व्यवहारातही कंपन्या आल्या आहेत.  मुलगी दाखवण्यापासून विवाह जोडण्यापर्यंत, वाढदिवसापासून हनिमूनपर्यंत सर्व इव्हेंट व्यवस्थापन कंपन्याच करू शकतात. हॉटेलमधील पदार्थ असो की प्रवास, खरेदी असो की विक्री - ग्राहक व विक्रेता यांच्या मध्येही झोमॅटो, ओला-उबार अशा कंपन्या आल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, विमा इतकेच काय, समाजसेवा देखील या जागतिक, तंत्रज्ञांनाधारित झाली. त्यातून घडणारे सगळे मानवी व्यवहार, माहितीचा स्फोट, व्यक्तीच्या खासगीकरणावर आलेला घाला, तिसऱ्या घटकाचे नियंत्रण -यांचेही गंभीर सामाजिक व सांस्कृतिक परिणाम झाले आहेत. त्यातून मानवी आयुष्य व मानवी नातेसंबंधातही प्रचंड बदल घडले. प्रत्यक्ष संबंधांपेक्षा आभासी संबध व प्रत्यक्ष व्यवहारापेक्षा डिजिटल व्यवहार – यांमुळे आज आपले जगणे प्रत्यक्ष किती व आभासी किती, असा प्रश्न पडतो. दोन व्यक्तींमधील बोलणे, प्रवास, सहवास, संभाषण किंवा सहकार्य देखील खाजगी राहिले नाहीत. असा हा नव्वदनंतरचा उत्तर आधुनिक काळ आहे.   

विश्राम गुप्ते यांनी या उत्तरआधुनिक काळाचे व त्यातील बदलाचे विश्लेषण केले आहे.  या जगाचे मिडिया, मार्केट, मनी, मॅनेजमेंट आणि मेडीटेशन हे पाच ‘मकार आहेत: माध्यम क्रांतीमुळे आपल्या ‘हजार-दीडहजार वर्ष रुजलेल्या स्थिर मानवी वर्तणुकीचे नवे आविष्कार जन्माला आले आहेत, नवी मूल्यव्यवस्था रुजू लागली आहे. विशेषत: मानवी जाणीव व नेणीव या दोन्हीतही मिडियाने घुसखोरी करून व्यक्तिगत व सामुहिक मनाचे स्वातंत्र्यच बाधित केले आहे. त्यातून वीस शतकांनी युक्त अशा एका पारंपरिक काळाचा आज ‘अंत’ झाला असून त्याजागी नव्या अपारंपरिक काळाचा उदय झालेला आहे...मूल्यव्यवस्थेच्या संदर्भात सांगायचं झालं तर, हे एकविसावं शतक उपटसुंभासारखं अवतरलेलं आहे. त्याचा गेलेल्या वीस शतकांशी फारसा संबंध नाही. (विश्राम गुप्ते :२०१६: ९) असा त्यांचा निष्कर्ष आहे

याचा अर्थ, आधुनिक काळ व उत्तरआधुनिक काळ यांत फार तफावत असून उत्तरआधुनिक काळातील  जीवनव्यवहार व मूल्यव्यवस्था प्रचंड बदलली आहे. त्यामुळे या काळातील साहित्य निर्मितीचा; केवळ एक साहित्यिक अभिव्यक्ती किंवा एक सांस्कृतिक गोष्ट म्हणून नाही; तर एक आर्थिक प्रॉडक्ट म्हणून विचार करण्याची गरज आहे. त्यासाठी  आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक आणि तात्त्विक पर्यावरण विचारात घ्यावे लागणार आहे.   

या आर्थिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीचा परिणाम, बदललेली मानसिक व तात्त्विक परिमाणे; त्याबद्दलची अस्वस्थता आणि नवसंवेदन नव्वदोत्तरी लेखकांच्या लेखनात प्रकटले आहे. या बदललेल्या साहित्याच्या आशयसूत्रांबाबतची निरीक्षणे मी पुढीलप्रमाणे नोंदवली आहेत : 

स्थलांतर प्रवृत्ती :  

जागतिकिकरणामुळे शहरात रोजगाराची साधने व संधी निर्माण होतात त्यामुळे उपजीविकेसाठी खेड्यातील माणसांचे  स्थलांतर घडून येते. त्याला त्याच्या प्रदेशापासून, संस्कृती व मूल्यांपासून दूर जावे लागते. तो नव्या ठिकाणाची नवी बाजारू मूल्यव्यवस्था व जीवनशैली नाईलाजाने स्वीकारतो. त्यात त्याचा आंतरिक संघर्ष होतो. त्याच्या या अंर्तद्वंद्वाचे चित्रण नव्वदोत्तरी साहित्यात येते. उदा. भालचंद्र नेमाडे यांचा चांगदेव पाटील हा नायक कायम स्थलांतर करत असतो. ‘या स्थलांतरात मानवी अस्तित्वाची हवा होऊन जाते असे तो म्हणतो. खुद्द नेमाड्यांनीचस्थलांतर ही फार पुरातनकालापासूनची सगळ्याच मानवजातीला पडलेली, टोचून जाणारी जाणीव असते. या पृथ्वीतलावर आपलं असण्यासारखं एवढंच असतं की, आपल्याला जमीन असते आणि ती जमीनसुद्धा सोडायला लागणं याच्यातून सगळ्या मानवजातीचा इतिहास घडलेला आहे (भालचंद्र नेमाडे: २०१०: ७६) असे सांगितले आहे.

तात्पर्य, नव्वदनंतरच्या सर्व साहित्यप्रकारात ‘स्थलांतर हे एक महत्त्वाचे आशयसूत्र आहे.

चळवळी व तत्त्वज्ञान यांची परवड

जागतिकीकरणात सामाजिक व परिवर्तनवादी चळवळी खिळखिळ्या झाल्या आहेत. कारण या चळवळीने दिलेली मूल्ये, जगण्याची दिशा आणि परीघ यांचे जागतिकीकरणातील भांडवलशाही, साम्राज्यवाद, बाजार व चंगळवाद यांनी संदर्भ बदलून गेले आहेत. किंबहुना साहित्यात घेतलेल्या परिवर्तनवादी भूमिकेमुळे सामाजिक परिवर्तन घडून येते, हे साठोत्तरी लेखकांचे म्हणणे नव्वदोत्तरी लेखकांनी मनावर घेतलेले दिसत नाही. उलट या लेखकांनी हे जागतिकिकरण डोळसपणे पाहिलेले दिसते. त्यामुळे साठोत्तरी कवितांमधून येणारा रोमँटिक विद्रोहाचा- विचार नव्वदोत्तरी काळात दिसत नाही. उलट जागतिकीकरण प्रक्रिया या लेखकांच्या दृष्टीने विरोधाचा नाही, तर समजून घेण्याचा भाग झाला आहे. कारण जागतिकीकरणातून घडून आलेल्या सांस्कृतिक-माध्यम-क्रांतीचे हे लेखक लाभार्थी आहेत. ‘गावगाडा चांगला होता’ असे म्हणणारे हे लेखक शहरात राहताहेत आणि त्यांचे हे म्हणणे ते समाजमाध्यमाचा वापर करूनच सांगत आहेत. त्यामुळे परिवर्तनवादी चळवळी किंवा साहित्यातून ‘परिवर्तन’, ‘क्रांती ही भूमिका बाजूला पडली आहे.

उलट या चळवळीचे कठोर परीक्षण दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी नव्वदोत्तरी साहित्यात दिसते. अरुण काळे यांच्या कवितेत, `ही माझी चळवळ झालीय अ. भा. चिडीमार संघटना `/`कुणाच्या मागे चाललंय बौद्धिक नेतृत्व/ रातोरात क्रांतीची स्वप्न पाहणाऱ्यांना/ सकाळी व्हावं लागतं हास्यास्पद` (नंतर आलेले लोक) अशी खंत येते. राम दोतोंडे, ‘सर तुमच्या दारावर लाथांच्या/ एवढ्या निशाण्या कशा?’(गल्ली बदललेला मोर्चा)  असे विचारतात; तर लोकनाथ यशवंत, ‘ बुद्ध, मार्क्स, फुले असे किती दिवस तेच तेच सांगणार आहात सर/ स्वत:च काहीच सांगत नाही(आणि शेवटी काय झाले?) असे म्हणत आपले ढोंगी पुढारी व स्वार्थी चळवळी यांवर भाष्य केले आहे.

ग्रामजीवनाची ओढ व देशीवादी भूमिकेचे पुनरुज्जीवन

ग्रामीण -दलित साहित्यात मात्र जागतिकीकरणातून निर्माण झालेल्या विकासाच्या संकल्पनेबाबतच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोठी धरणे, सेझ, महामार्ग अशा विकासकामांसाठी जंगल आणि शेती नष्ट होत आहेत. आपले पारंपरिक उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाल्याने ग्रामीण-दलित व विकासाच्या दुष्परिणामामुळे स्त्रीवादी, पर्यावरणवादी लेखक हे प्रश्न उपस्थित करत असून देशीवादी जाणि‍वेचे लेखक मात्र आपल्या स्मरणातील पूर्वपरंपरेचे, गावगाड्याचे, प्रसंगी जातिव्यवस्थेचे, कृषिसमृद्धीचे गोडवे गाताना दिसताहेत. उपजीविकेसाठी स्थलांतर झाल्याने आपल्या भूमीची, प्रदेशाची, संस्कृतीची व परंपचे स्मरण; आपल्या कला, मौखिक परंपरा यांची ओढ; समर्थन व चित्रण कविता, कथा, कादंबरीतून भालचंद्र नेमाडे, श्रीकांत देशमुख, राजन गवस, प्रवीण बांदेकर इत्यादी लेखक करताना दिसताहेत.

नेमाडे व इतर देशीवादी लेखकांच्या साहित्यात, परिसर व प्रदेशनिष्ठता, देशी परंपरा, देशी संस्कृती, देशी मूल्ये नवनैतिकता, वास्तववाद, लोकभाषा, मौखिकता व देशी रूपबंध यांचा आग्रह आहे. मात्र या आग्रह धरलेल्या व कादंबरीतून साकारलेल्या; देशी संस्कृती, परंपरामूल्ये, व्यक्तिवाद विरोध, इंग्रजी शिक्षण, इंग्रजी भाषा, आंतरराष्ट्रीयता, वैश्विकता, आधुनिक व्यवस्थांविरो, प्राचीन ग्रामरचना, व जातिव्यवस्था या देशीवादी तत्त्वांचे पूर्ण समर्थन करता येत नाही. त्यामुळे, त्यांच्या कादंबऱ्यातून साकारल्या गेलेली ही तत्त्वे स्थितिशील आहेत, समाजाला भूतकाळात नेणारी आहेत, परिवर्तनाला विरोध करणारी आहेत, असा आक्षेपही (रावसाहेब कसबे, मोतीराम कटारे आदी) त्यांच्यावर घेतला जातोय.

प्रसारमाध्यमांचा व दृष्यमाध्यमांचा प्रभाव

 खुल्या अर्थव्यवस्थेला जाहिरातीसाठी विविध माध्यमे हवी होती. डिजिटल फलक, संगणक, इंटरनेट, चित्रपट पडदा अशा सर्व माध्यमातील जाहिराती, मालिका- सिनेमातील दृश्ये, फेसबूक-व्हाटस अप आदी समाजमाध्यमाच्या भिंती यांवरील दृश्यात्मकता - यांचा प्रभाव सर्व साहित्यावर झालेला दिसतो. किंबहुना ‘सांगणे’ कथन पद्धतीत आता ‘पाहणे’ आणि ‘दाखवणेयांची भर पडली आहे. अरुण कोलटकर यांच्यापासून प्रभावी झालेली ही प्रवृत्ती आज सर्वच नव्वदोत्तरी महानगरी कवितेत दिसते; मात्र श्रीकांत देशमुख, महेंद्र कदम, यांच्या कवितामधून ‘दृश्यातून कथन ही पद्धती दिसते. अजय कांडर, यांच्या ‘बाया पाण्याशीच बोलतात या कवितेत दुष्काळाचे चित्रपटासारखे दृश्यचित्रण येते. दिनकर मनवर यांच्या एका कवितासंग्रहाचे शीर्षकच मुळात, ‘दृश्य नसलेल्या दृश्यात असे आहे. राजन गवस यांची ‘ब-बळीचा’ ही कादंबरी कल्लाप्पा कोनेकरी या पटकथा लेखकाच्या डायऱ्या, नोंदी, पत्रे आणि अर्धवट लिहिलेल्या पटकथेतील दृश्यातून समोर येते. तंत्रज्ञानाने मानवी जीवनावर केलेला प्रभाव व त्यातून त्याचे होणारे वस्तूकरण, यांत्रिकीकरण, हतबलता हेमंत दिवटे, मंगेश नारायण काळे, नितीन बोरसे, संजीव खांडेकर आदींच्या कवितांमधून येते.

आशयाच्या या दृश्यसापेक्षतेमुळे व त्यामागील आर्थिक गणितांमुळे साहित्याच्या माध्यमान्तराची प्रक्रिया - कथा- कादंबरीवरून चित्रपट, कथेवरून नाटक, नाटकावरून चित्रपट अशी घडून आलेली दिसते. उदा. ‘शाळा’-कादंबरी ते चित्रपट, ‘नटसम्राट’-नाटक ते चित्रपट, ‘बैल’-कविता ते चित्रपट, ‘नटरंग’-कादंबरी ते चित्रपट - अशी काही त्याची उदाहरणे सांगता येतील. तसेच ‘स्टोरीटेल’ सारखी माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे कथा ‘वाचणे प्रकार बाजूला पडून कथा ‘ऐकणे हा प्रकार पुन्हा लोकप्रिय होत आहे. तात्पर्य मौखिक कहाण्या ‘ऐकण्यापासून, मुद्रण काळात ‘वाचणे-पाहणे आणि आता पुन्हा ‘ऐकणे’ अशा प्रक्रियेतून मराठी कथा पुढे येताना दिसते आहे.  

बहुभाषिक- बहुसांस्कृतिक आशयाला प्राधान्य

भारत हा बहुभाषिक व सांस्कृतिक विविधता असलेला देश आहे. त्याची ही विविधताच जागतिकीकरणामुळे धोक्यात आणलेली आहे. पेहराव, पदार्थ, मूल्ये, प्रवाससाधने, आहार, व्यापार पद्धत या साऱ्यांचे सपाटीकरण झाले आहे. जग हे एक खेडे झाल्याने प्रादेशिक विविधता नष्ट झाली आहे, त्यामुळे पुन्हा आपल्या संस्कृती-मूल्यांचे, प्रथांचे व नष्ट होऊ पाहणाऱ्या भाषिक अवकाशाचे, बोलीचे पुनरुज्जीवीकरण करण्याची प्रवृत्ती पुढे आली आहे. रफिक सुरज, अजीम नवाज राही आदींच्या कादंबरी-कथा लेखनातून मुस्लीम समाजाचे प्रश्न व समस्या मांडल्या जात आहेत.

जागतिकीकरणात अल्पभूधारक व लघुउद्योगावर पोट भरणाऱ्या समूहाचे खूप हाल झाले आहेत. अशीच अवस्था भटक्या-विमुक्तांची आहे. पारधी, नंदीवाले, वंचित यांचीही परवड झाली आहे. त्यामुळे आपली सांस्कृतिकता नष्ट होत आहे, जगण्याचे प्रश्न तीव्र होत आहे, याचे चित्रण या समूहातील साहित्यात येते. अनेकदा तर त्याचे आविष्करणही त्या त्या समूहाच्या  बोलीत होत आहे. उदा. संजय बालाघाटे यांचा ‘न्हांगुळ आदार इला (आम्हाला आधार नाही) हा कवितांचा संग्रह भटक्या विमुक्तांच्या ‘खिवारी बोलीतील आहे. ‘बारकुल्या बारकुल्या स्टोऱ्या’ हा डॉ. शेषराव मोरे यांचा कथासंग्रह उदगीरच्या प्रादेशिक बोलीचे आविष्करण करतो आहे. नाथपंथी डवरी गोसावी समाजातील डॉ.  नारायण भोसले यांचे ‘देशोधडी हे आत्मकथन; तर कुठलेही सांस्कृतिक संचित नसलेल्या अल्पभुधारक कुणबी कुटुंबात जन्मलेल्या शरद बाविस्कारांचे ‘भुराहे आत्मकथन -  वर्गीय विषमता, साधनांची कमतरता, संधीचा अभाव; जातीय विषमतेचा अनुभव, अशा उणिवांशी संघर्ष करत एक मध्यमवर्गीय, बुद्धिजीवी होण्यापर्यंतचा प्रवंचित घटकांचा प्रवास यात आहे. अशा काही नव्या भूमिका घेऊन आलेली आत्मकथने – हे सारे मराठी साहित्याचा परीघ अधिक बहुसांस्कृतिक व बहुभाषिक करणारेच आहे.

लेखक वर्गातही वाढ

इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणामुळे मुळे मराठी वाचक कमी होत असला तरी लिहिणाऱ्या लेखकांची संख्या मात्र वाढत आहे. पूर्वी कथनात्म साहित्यच जास्त वाचले जायचे. आज आरोग्य, शिक्षण, पाककला, पर्यटन, वैद्यकक्षेत्र, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील लेखन वाचले जात असल्याने डॉक्टर, शिक्षक, शेफ, उद्योजक, चळवळींचे कार्यकर्ते, स्त्रिया, पुरुष, अगदी शाळकरी मुलेही लिहू लागली आहेत. श्रुती आवटे या दहावीत शिकणाऱ्या मुलीची ‘लॉग आउट नावाची कादंबरी मॅजेस्टिकने प्रसिद्ध केली आहे. तिच्या वयाचे अनुभव तिने या कादंबरीत मांडले आहेत.  शिवाय वाचक संख्येने कमी झाला असला तरी वाचकाचे क्षेत्र केवळ मध्यमवर्गीय वा बुद्धिजीवी वर्ग इतकेच मर्यादित राहिले नाही. सर्व क्षेत्रे, सर्व वयोगट व सर्व सामाजिक स्तर असा व्यापक परिघात वाचक विस्तारला आहे.

या वाचकांची अभिरुची आणि गरजाही नव्वदनंतरच्या काळात बदलल्या आहेत हेही लक्षात घेतले पाहिजे. फडके-खांडेकरांच्या काळात केवळ मनोरंजनासाठी कथा-कादंबऱ्या वाचल्या जायच्या. आता त्या मनोरंजनाची पूर्तता मालिका-सिनेमे ही माध्यमे करीत आहेत. उलट कविता, कथा, नाटके यांच्या माध्यमातून वाचकांना आजचे जगणे, आपला समकाल व आपले प्रश्न समजून घ्यायचे आहेत. भोवतालचे प्रत्यक्ष वास्तव व आभासी वास्तव यांचा गुंता त्याला जाणून घ्यायचा आहे.

जागतिकीकरणात बाह्य संस्कृतीच्या रेट्यामुळे आपला इतिहास, अस्मिता व संस्कृती यांच्यावर आक्रमण होते, म्हणून ते सर्व जाणून घेण्याची तीव्र इच्छा असल्याने आजच्या कादंबरीचे ‘निव्वळ मनोरंजन हे प्रयोजन नाही. आपला प्राचीन समाज-संस्कृती-इतिहास वाचकाला जाणून घ्यायचा आहे. (भालचंद्र नेमाडे-‘हिंदू’) आपल्या पूर्वजांचा इतिहास व न शोधल्या गेलेल्या अस्मिता, पूर्वजांचा न मांडला गेलेला इतिहास व पराक्रम त्याला जाणून घ्यायचा आहे. (रंगनाथ पठारे-‘सातपाटील कुलवृत्तांत’) किंवा आजवर कुठेही नोंद न झालेला दलितांचा सांस्कृतिक इतिहास (शरणकुमार लिंबाळे- ‘सनातन), याशिवाय आपापल्या जातीचा- समाजाचा अज्ञात इतिहासही (उदा. शरद गायकवाड- ‘मातंगाची शौर्यगाथा’) त्याला जाणून घ्यायचा आहे. त्यामुळे केवळ साहित्य व समाज नव्हे; तर इतिहास, संस्कृती, पर्यावरण, भूगोल, लिपी, भाषा, समाजशास्त्र व मानववंशशास्त्रही आजची कादंबरी वाचकाला ज्ञात करून देत आहे.

लोकप्रिय साहित्य व बदलती माध्यमे

वाचकसापेक्षतेने पाहता काळ कोणताही असो, लोकप्रिय साहित्याला मात्र मरण नाही. आधी कथा-कादंबऱ्या, नंतर सिनेमाच्या पटकथा यांच्या जोडीला आज दूरदर्शन, विविध वाहिन्यांच्या मालिका, वेब सिरीज, ओटीटी प्लॅटफॉर्म, शॉर्ट फिल्मस ही माध्यमे वाचकांची लोकप्रिय कथानकांची ही भूक भागवायल्या सज्ज आहेत. या सर्वांचे आशय मात्र सुखवस्तू जीवन, उपभोगवाद, नवश्रीमंती, चंगळवादी खाद्यसंस्कृती, लैंगिकता यांच्याशी निगडीत आहे. किंबहुना या सगळ्यांकडे पाहण्याचा एक खुलेपणा नव्वदनंतरच्या जागतिकीकरणामुळे आला आहे. म्हणजे एखादे लैंगिक दृश्य असलेल्या सिनेमावर बंदी घालण्यासाठी साठोत्तरी काळात मोर्चे निघायचे, त्याच महाराष्ट्रात दोन वर्षापूर्वी ‘एक चावट संध्याकाळ या नाटकाचा प्रयोग महिलांसाठी खुला ठेवावा अशी मागणी महिलांकडूनच झाली होती. कोल्हापूर - सांगली येथे आजही खास महिलांसाठीच्या लावणी ‘शो लावले जातात. तात्पर्य, लोकप्रियतेसाठी लिहिले जाणारे लेखन वाढत आहे; मात्र त्यात कथा-कादंबरी केंद्रस्थानी नाहीत; तर इतर दृश्यमाध्यमे या कामी वापरल्या जात आहे. हा फार मोठा बदल नव्वदनंतरच्या बाबतीत दिसून येतो. 

व्यक्तिस्वातंत्र्य संकोच व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला

            कधी नव्हे ते या काळात जगभर उजव्या विचारसरणीला जास्त प्राधान्य मिळालेले दिसते. वर्णवाद, जातवर्चस्व किंवा धार्मिक मूलतत्त्ववादाने डोके वर काढले असून अशी मंडळी जगभर सत्तेच्या केंद्रस्थानी दिसत आहेत; आणि समजा नसली तरी असे गट आपली सांस्कृतिक सेन्सॉरशिप राखू पाहत आहेत. त्यातून ‘लिहिणे; या प्रकारावर दबाव, नियंत्रण किंवा मुस्कटदाबी हा प्रकार नव्वदनंतर जास्त रूळलेला दिसतो. कविता असो की कादंबरी- आज स्वान्तसुखाय काही लिहिता येत नाही. जबाबदार लेखकाला काही टाळता येत नाही, कारण हा जबाबदार लेखक लोकशाही मानणाऱ्या नागरिक-वाचकांचा प्रतिनिधी आहे. मात्र एका प्रादेशिक भाषेत व विशिष्ट स्थळ-काळात लिहिले असले तरी गतिमान माध्यमांमुळे ते लेखन जगभर पसरले जाते; आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रियाही त्वरित उमटतात. आज तंत्रज्ञानामुळे कुणावरही पाळत ठेवता येते. तुम्ही प्रस्थापित व्यवस्थाच्या विरोधात लिहू नका, नाहीतर संपवले जाईल, असे समाजमाध्यामांवर ट्रोल केले जाते. किंबहुना, त्या विद्वेषातून लेखकावर हिंसक हल्लाही होऊ शकतो. नुसत्या धमक्याच नव्हे तर डाव्या विचारसरणीच्या लेखकांच्या हत्याही याच काळात घडत गेलेल्या आहेत. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्त्या ही याची उदाहरणे. प्रसिद्ध तमिळ लेखक पेरुमल मुरुगन यांनी २०१५ला त्यांच्यातील ‘लेखक मेला आहे’ असं त्यामुळेच जाहीर केलं होतं. या विषयावरही नव्वदोत्तरी लेखकांनी भाष्य केले आहे. याबाबत प्रवीण बांदेकर यांची ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या नावाची कादंबरी किंवा जयंत पवार यांच्या ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी या कथासंग्रहाचा उल्लेख करता येईल. दहशतवाद, धार्मिक उन्माद तसेच कौटुंबिक हिंसेच्या मरणांपासून बदलत्या सामाजिक अवकाशातील लेखकांची मरणरूपे पवार यांच्या कथेत आहेत.

या काळात स्वातंत्र्य नष्ट झाले आहे, खाजगीपणा नष्ट झालाय, आपल्यावर कुणाची तरी पाळत आहेत. आपले प्रत्येक व्यवहार – केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक कृती; एवढेच नव्हे तर लोकशाही व मतदान सुद्धा - यांवरही कुणी नियंत्रण ठेवून आहेत, याची जाणीव सर्वच संवेदनशील लेखक - कवींना अस्वस्थ करताना दिसते आहे.

लेखकांची दोन गटात वर्गवारी

खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर, रोजगार, उदरनिर्वाह साधने, संवाद, प्रवास, पर्यटन एकूणच जगणे व संस्कृतीतील प्रचंड बदल झाल्यामुळे त्या बाबत दोन प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. एक म्हणजे, आहे त्याचा स्वीकार करणे व त्यानुसार स्वतःत बदल करणे; दोन, जागतिकीकरणाला विरोध करणे व परंपरा संस्कृतीचे पुनरुज्जीवन करत ‘देशी संस्कृतीचा आग्रह धरणे.

नव्वदनंतरच्या मराठी साहित्याच्या आशयाचे प्रमुख वर्गीकरण या दोन गटात करता येते. त्यानुसार साहित्यातील प्रवाहांचेही या दोन गटात सामान्यत: वर्गीकरण करता येते. पहिल्या गटात स्त्रीवादी व महानगरी साहित्य; तर दुसऱ्या गटात देशीवादी व ग्रामीण साहित्य. पहिल्या गटातील आशय अभिव्यक्तीचा कल जागतिकीकरणाला तीव्र विरोधाचा नाही; तर ही प्रक्रिया समजून घेण्याचा, किंबहुना त्यात होणारी जगण्याची अस्तित्वाची कोंडी मांडण्याचा व आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्याकडे आहे. 

दुसऱ्या गटातील लेखकांचा कल- जागतिकीकरणाला नाके मुरडण्याचा, आपल्या जुन्या परंपरा व संस्कृतीत रमण्याचा व तिचे पुनरुज्जीवन करण्याचा आहे. अर्थात यातील बरेच लेखक स्वीकार-नकाराच्या गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. आंबेडकरवादी लेखक मात्र स्वीकार-नकार या प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन जुन्याचा आग्रह न धरता परखड विश्लेषण करू पाहत आहेत.     

नव्या आकृतिबंधाला, प्रयोगशीलतेला, गूढता, अद्भूतता व मौखिक परंपरेला महत्त्व

आशय बदलला की तो मांडण्याची शैली बदलतेच. आपल्या प्रचलित भाषा व्यवस्थेच्या आकलनाच्या आणि आवाक्याबाहेरचा हा विषय असल्याने प्रचलित भाषेची मोडतोड करणे, नव्या भाषिक व्यवस्था व रचना निर्माण करणे, नवे आकृतिबंध तयार करणे, जुने संकेत बदलून नवे संकेत निर्माण करणे- हे दोन्ही गटातील लेखकांकडून घडत आहेत. अगदी कवींची उदाहरणे घ्यायची तर ‘नाळ तुटल्या पुरुषांचे दृष्टांत, किंवा ‘लीळा तिसऱ्याच्या’ आणि आता ‘मायाविये तहरीर या मंगेश नारायण काळे यांच्या कविता संग्राहांचे स्वरूप पाहिले तरी ही गोष्ट आपल्या लक्षात येईल. प्रसारमाध्यमांची, संगणकांची, तंत्रज्ञानाची, आभासी वास्तवाची भाषा आपल्याला हेमंत दिवटे, संजीव खांडेकर,  नितीन बोरसे यांच्या कवितेत दिसते. दिवटे यांच्या ‘ या खोलीत आलं की लाईफ सुरू होतं नावाच्या कवितेच्या शीर्षकावरूनच बाह्य वास्तवापेक्षा आभासी वास्तवात जगण्याचा आशय व त्याची भाषिक शैली दिसते. नमुन्यादाखल नितिन कुलकर्णी यांच्या कवितेतील या ओळी पहाव्यात-

ह्या इथे आलेल्या सर्वांन्ना पेट्रोल मिळेल

ह्या इथे आलेल्या सर्वांन्ना दर्शन मिळेल

ह्या इथे आलेल्या सर्वांन्ना आशीर्वाद मिळतील

लक्षात ठेवा

जो कार देतो तोच पार्किंगही दील

जो ब्रेक देतो तोच वेगही दील

ज्यानं क्यू दिला तोच नंबरही दील

शहरातील नागरिकान्नो  

           दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे देशीवादी-ग्रामीण लेखकांनीही मौखिक शैलीचा आकृतिबंध वापरलेल्या दिसतो. उदा. ‘खेळखंडोबाच्या नावाने (प्रवीण बांदेकर) मध्ये दवंडी फॉर्म वापरला आहे; तर पिढीप्येस्तर प्यादेमात’ (संतोष पद्माकर पवार) यांत लोकसाहित्याची मौखिक शैली  (ओवी, दवंडी, खुत्बा) वापरली आहे. देशी लोकगीतांची लय, देशी शब्द, लोकसंस्कृतीतील प्रतिमा, मिथके किंवा त्यांचा नव्या संदर्भातील वापर केला जातोय.

भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांत ‘सांगणे या कथन परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे ‘हिंदू च्या सुरुवातीलाच ‘खंडेराव, तुम्ही गोष्टच सांगत जावा राव असे स्वागत म्हणतो. त्यांच्या कोसला ते ‘हिंदू’ या कादंबऱ्यात अर्पणपत्रिकेपासून देशीवादी आकृतिबंध कसा वापरला आहे हे मी माझ्या शोधप्रबंधात दाखवून दिले आहे.[1]

प्रवीण बांदेकर यांच्या ‘चाळेगत कादंबरीतही शंकासुराच्या पात्राच्या माध्यमातून कथा गुंफलेली आहे तर; त्यांच्याच ‘इंडियन ॲनिमल फार्म’ मध्ये समकालीन राजकारणाची गोष्ट सांगण्यासाठी कथासरित्सागर, इसापनीती व पंचतंत्र या प्राचीन भारतीय कथासंहितेतील प्राणीकथेच्या रूपबंधाचा वापर केला आहे. एका भासचित्राचा आधार घेत काहीतरी कल्पनारंजित असं वास्तव निर्माण करणं आणि संपूर्ण कथानक त्याभोवती फिरवणं. त्याचा वास्तव जीवनाशी संबंध जवळ जवळ नसणं - अशी प्रणव सखदेव यांची ‘96 मेट्रोमॉल’ ही कादंबरी आहे. कित्येक शतकांपूर्वी अमेझॉनच्या जंगलात गेलेल्या आपल्या पूर्वजांचा शोध निवेदकाच्या आजोबांना लागला आहे आणि त्या संबंधात ते आपल्या नातवाला म्हणजे निवेदक क्रमांक दोनला सांगत आहेत. त्याचं कुतूहल चाळवलं जातं नि तो इंटरनेटवर शोध घेतो, अमेझॉनच्या जंगलात पोचतो, अशी अद्भुतता (फँटसी) या कादंबरीत आली आहे. हृषिकेश गुप्ते यांच्या ‘दंशकाल,  ‘घनगर्दअशा कादंबऱ्यातून म्पुन्हा गूढ व अद्भूतरम्य प्रवृत्ती नव्याने रुजू पाहत आहे.          

  पर्यावरणवादी तीव्र जाणीव  

 जागतिककरणात ‘विकास’ हा शब्द परवलीचा बनला आहे. मात्र विकास कोणाचा व कोणासाठी? आणि तो करताना मानवी साधन संपत्तीचा होणारा ऱ्हास व पर्यावरणाचा विनाश, त्यातून धोक्यात आलेले सृष्टी अस्तित्व यावर दोन्ही गटातल्या लेखकांनी लिहिल्याचे दिसते. नव्वदनंतर ‘हवा, पाणी राहिले नाही सर्वांचे अशी खंत अरुण काळे व्यक्त करतात. पर्यावरण ऱ्हासासोबतच, जागतिक प्रदूषण यांमुळे- पर्यावरणवादी चळवळी, त्याबद्दलचे ग्रंथ या काळात जास्त लिहिल्या जात आहेत. अगदी प्रज्ञा दया पवार, नीरजा (स्त्रीवादी) तर कल्पना दुधाळ (देशीवादी), अनुराधा पाटील (अस्तित्ववादी) -अशा विविध प्रवृत्तीच्या कवितांतून; ‘अवकाळी पावसाची गोष्ट सारख्या आनंद विंगकर यांच्या कादंबऱ्यातून - सर्वच लेखक कवींच्या साहित्यातून ही जाणीव तीव्रपणे समोर येत आहे.

ई-साहित्याचा बोलबाला

            तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे मराठी संकेतस्थळ, ब्लॉग, समाजमाध्यमे, ई-साहित्य या आभासी माध्यमात लिहिणाऱ्या लेखकांची व तशा वाचकांची संख्या वाढत आहे. मात्र या सर्व लेखकांमध्ये ‘क्रिएट आणि ‘फॉरवर्ड प्रवृत्ती जास्त दिसते आहे.  या प्रक्रियेत समग्र अनुभव घेणे, त्याचे सर्व संदर्भ तपासणे, विविध पैलू व अंतर्विरोध समजून घेणे, या चिंतन मनन प्रक्रिया अभावी लिहिण्याची प्रचंड घाई नवलेखकामध्ये दिसते. ‘सुचले ते लिहिले आणि वाचले ते पाठवले’ अशी घाई या ‘माध्यमीलेखक-वाचकांमध्ये दिसते. ‘आम्ही लिहितो त्याला ‘साहित्य म्हणा, ज्याला आम्ही ‘साहित्य म्हणतो त्याला तुम्ही ‘चांगले म्हणा अशी ही प्रवृत्ती नावमाध्यमी लेखकांची दिसते आहे.

 साचेबद्ध, एकसुरी, कंटाळवाणे आणि एकच लेखन चार-चार संकेतस्थळांवर टाकण्याची सवय, प्रसिद्धीचा सोस व स्वतःला कायम चर्चेत ठेवण्याची वृत्ती- सेल्फी, रील प्रमाणे लेखनातही दिसते. त्यातून गोळा झालेले लेखन स्वखर्चाने प्रसिद्ध करणे लेखक मान्यतेसाठी धडपडणे या वृत्तीही नव्वदनंतरच्या आर्थिक समृद्धीतून निर्माण झालेला सांस्कृतिक परिपाक आहे.  

लैंगिकता प्रधान लेखन

            १९६०च्या दरम्यान अपवादाने किंवा धाडसाने प्रकटलेली ‘लैंगिकता ही प्रवृत्ती १९९० नंतर सहजपणे व सार्वत्रिकपणे दिसते. कविता महाजन यांच्या ‘ब्रमध्ये वेश्याजीवनाचे, तर भिन्न मध्ये तृतीयपुरुषांचे जग प्रकटले. सानिया-मेघना पेठे यांच्या कथालेखनात, स्त्रीपुरुष संबंधांच्या पार्श्वभूमीवर सर्रास लैंगिक अनुभवाचे चित्रण येते. किरण येले यांच्या ‘मोराची बायकोइत्यादी, सचिन कुंडलकर यांच्या ‘नाइन्टीन नाइन्टी’ अशा कथासंग्रहांतून प्रेम आणि लैंगिकता यांचा शोध दिसतो. दिशा पिंकी शेख यांच्या कवितेतील तृतीयपंथीयांचे जगही मराठी वाचकांनी नाके न मुरडता स्वीकारले आहे, ही समाधानाची बाब आहे.  प्रणव सखदेव यांची ‘काळेकरडे स्ट्रोक्समध्ये किंवा सचिन कुंडलकर यांच्या ‘जंगलमध्ये तर पोर्नोग्राफिक वाटावी अशी वर्णने येत आहेत. पण हे लेखन अधिक वाचकप्रिय होत आहे. तात्पर्य नव्वदनंतरच्या साहित्याला स्त्री-पुरुष संबंधांसोबतच समलैंगिक संबंधही वर्ज्य नाहीत; उलट लैंगिकतेबद्दलची भूमिकाही खुली झाल्याचे दिसते आहे. 

जाता जाता

जाता जाता साहित्यप्रकारनिष्ठ काही लेखक व त्यांच्या प्रवृत्ती यांची नोंद करून हा लेख संपवतो. नव्वदनंतरचे श्याम मनोहर, जयंत पवार हे लेखक उत्तर आधुनिकतावादी असून त्यांच्या अनुक्रमे ‘शीतयुद्ध सदानंद’ (कादंबरी) व ‘काय डेंजर वारा सुटलाय’ (नाटक) या साहित्यकृती या दृष्टीने अभ्यासण्यासारख्या आहेत. याच काळात उद्योगजगतातील बेकारीचे चित्रण ‘जुगाड’ (किरण गुरव), उद्योजक, व्यवसायिकांची आत्मचरित्रे  (उदा. इडली, ऑर्किड आणि मी); अनुवादित साहित्याचे मोठे जग, सिनेसृष्टीतील अभिनेत्यांचे अनुभव, कॉर्पोरेट जगाचे अनुभव, भालचंद्र मुणगेकर, नरेंद्र जाधव अशा कुलगुरूंची आत्मचरित्रे – असे साहित्याचे मोठे दालन मराठी वाचनसंस्कृतीच्या परिघात नव्वदनंतरच्या काळाने आपल्यासमोर खुले केले आहे. वाचक, लेखक व सामान्य माणूस या तीस वर्षात साहित्याच्या मोठ्या परिघात आला आहे; पण प्रत्यक्ष जगणे आणि आशयाशी प्रामाणिक राहून लिहिणे - या  दृष्टीने पाहता ‘भयंकराच्या दारातउभा आहे, असे म्हणता येते.  

संदर्भ सूची

·      कटारे मोतीराम, २०१०: देशीवाद: रूप आणि रंग, औरंगाबाद, गोदा प्रकाशन

·      कसबे रावसाहेब, २०१६ : देशीवाद समाज आणि साहित्य, लोकवाङमय गृह, मुंबई

·      गुप्ते विश्राम, २०१६ : नवं जग, नवी कविता, संस्कृती प्रकाशन, पुणे 

ने     नेमाडे भालचंद्र, २०१० : निवडक मुलाखती, (दु.) मुंबई, लोकवाङमय गृह,



 

लेखक मराठीतील नव्या दमाचे समीक्षक असून डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव, जि. सातारा येथे मराठीचे सहयोगी प्राध्यापक आहेत.

 



[1] ‘साहित्यविचार आणि भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्या’, (प्रबंध), डॉ. देवानंद सोनटक्के, शिवाजी, विद्यापीठ कोल्हापूर, २०१७


3 comments:

  1. हेतुपुरस्सर लेखन करत असताना अनेक चुकां होतं स्वाभाविक आहे.याची प्रचिती जीथं ग्रामीण साहित्य हा शब्द येईल तिथं देशीचं लोढणं कारण नसताना बांधुन लेखकाने देशीचा देशी... प्रमाणे अतिरेक केला आहे.
    तुताऀस एवढं पुरेसं आहे....

    ReplyDelete
  2. उत्तम

    ReplyDelete

द. भि. : सहवासाचे जंतरमन्तर : डॉ. देवानंद सोनटक्के

  दभि : सहवासाचे जंतरमंतर :    डॉ.   देवानंद सोनटक्के वर्ष १९९६. त्यावेळी मी एम . ए . साठी नागपूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये मराठी विभागात...