Tuesday, May 5, 2020

भावकवी तुकाराम



संत तुकाराम हा मराठीतील एक श्रेष्ठ संतकवी आहे. ज्ञानेश्वर हे अपार्थिव कवी आहे तर तुकारामाची कविता ही पार्थिव-अपार्थिवाचा सेतू आहे. ज्ञानेश्वरांनंतर पाच शतके उलटून गेल्यावर संपन्न मराठी भावकविता पोहोचवणारा हा एक संतकवी. त्यामुळेच की काय, ‘ग्यानबा-तुकाराम’ हा गजर गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात गुंजत आहे. एक श्रेष्ठ भावकवी म्हणूनही तुकाराम हा श्रेष्ठ कवी आहे.
            आत्मनिष्ठा, आत्माविष्कार, उत्कटता, गेयता, स्फुटता, एकपिंडात्मकता ही भावकाव्याची वैशिष्ट्ये असतात. ती आपल्याला संत तुकारामाच्या कवितेत दिसतात. आपल्या अनुभूतीशी प्रामाणिक राहणे म्हणजे ‘आत्मनिष्ठा’. असा प्रामाणिकपणा आपल्या काव्यात व्यक्त करणे म्हणजे ‘आत्माविष्कार’. अशा आत्मनिष्ठेचा आणि आत्माविष्काराचा स्थायिभाव म्हणजे ‘उत्कटता’. हे तिन्ही घटक कवीच्या व्यक्तित्वाशी निगडित असातेत. त्याच्या लौकिक जीवनाशी संबद्ध असतात. त्यामुळेच रसिकाला भावकाव्य अधिक मोहवते. तुकारामाचेही काव्य मोहवते, त्याचेही कारण हेच- त्याचे व्यक्तिमत्त्व आणि त्यातील आत्मनिष्ठा, आत्माविष्कार, उत्कटता हे घटक.
            उत्कटतेला एक लय असते. ही लय त्या काव्याला ‘गेयता’ प्रदान करीत असते. कवीच्या जीवनानुभावातून साकारलेल्या भावानुभावातील अंतर्नादातून ही ‘गेयता’ आकारास असते. या गेयतेमुळेच तर रसिकाला भावकविता गुणगुणावीशी वाटते.
            भावकाव्यात अनुभवाच्या निवेदनाला स्थान नसते. अनुभवाचा शोध असतो. म्हणूनच भावकाव्य हे कथाकाव्य, खंडकाव्य, विचारकाव्य वा महाकाव्य यांच्याप्रमाणे अनुभवांची क्रमवार मांडणी करीत नाही. ते अनुभवाचे स्फुट म्हणजे सुटे प्रकटीकरण असते. म्हणूनच ‘स्फुटता’ हे भावकाव्याचे एक वैशिष्ट्य असते.
असा स्फुट, प्रासंगिक उद्गार असे भावकाव्याचे स्वरूप असले, तरी चारोळीसारखे ते अगदीच स्वतंत्र नसते. बाह्यतः सुटे वाटत असले तरी, जीवनानुभवाचा आवाका त्यात पेललेला असतो. असा आवाका तुकोबांच्या काव्यातही पेलेलेला दिसतो. त्यामुळे तुकोबांच्या काव्यात जीवनानुभवाचा व्यापक परीघ दिसतो.
            हे भावकाव्य एक पिंडात्मक असते. म्हणजे एक केन्द्री असते. अनेककेंद्री काव्य हे विचारकाव्य असते. कारण विचारकाव्यात विचारांना अधिक प्राधान्य असते व विचारांची विविध केद्रे काव्यात येतात; तर भावकाव्यात भावनेला अधिक प्राधान्य असते. त्यामुळे ते एकपिंडात्मक असते.
            ही भावकाव्याची सारी वैशिष्ट्ये तुकारामाच्या काव्यात आढळतात. म्हणूनच एकेकाळी भाविक तर तुकारामाचा गौरव करीत होतेच; पण आता दिलिप चित्रे, भालचंद्र नेमाडे असे प्रतिभावंत कवीही तुकोबांचा गौरव करीत आहेत.
                                                                        : २ :
            आधुनिक कविता आणि तुकोबांची कविता यांत एक भेद आहे : आधुनिक कविता ही पुस्तकात असते, तशी तुकोबांची कविता नाही; ती अज्ञ, भोळ्या-भाबड्या भाविकांपासून तर गुरुदेव रानडे, गं. बा. सरदार इत्यादी बुद्धिवंतांच्या मनात आहे. महाराष्ट्राच्या अंतरंगात आहे.
याचे कारण, तुकोबांच्या काव्याला लाभलेले अमरत्व होय. हे अमरत्व सहजासहजी प्राप्त झाले नाही. अस्सल नैतिकतेने जीवनाचा अनुभव घेणे, आलेल्या अनुभवाला सत्याच्या कसोटीवर पारखून घेणे, अनुभवाचे निष्कर्ष परखडपणे मांडणे आणि हा सारा भाषिक अवकाश आपल्या अव्वल प्रतिभेतून आविष्कृत करणे, या प्रक्रियेतून हे अमरत्व तुकोबांच्या काव्याला लाभले आहे.  तसेच हे अमरत्व ते तुकोबांनी काढलेल्या जीवनाबद्दलच्या निष्कर्षात आहे. त्यांनी काव्यातून केलेल्या समाजचिंतनात आहे. या चिंतनाचे प्रकट भाषिक रूप म्हणजे आपल्याला दीर्घकाळ लक्षात राहिलेली तुकोबांची सुभाषिते, म्हणीवजा काव्योद्गार होय. पाहा :
-          जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुले
-          ‘तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात
-          जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळचे कोणी नाही
-          साधूसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा
अशा अनेक रचना वारकरी ते सामान्य जन यांच्यापर्यंत साऱ्यांना पाठ आहेत. हेच ते अमरत्व. पण एवढ्यामुळेच त्यांचे काव्य श्रेष्ठ ठरले नाही. तुकोबांच्या काव्याचे अनेक विशेष आहेत.
लोकभाषा हा तुकोबांच्या  काव्याला श्रेष्ठ आणि लोकप्रिय करणारा एक विशेष आहे. वा. ल. कुलकर्णी यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘तुकाराम मूर्त अनुभवाला शब्दरूप देत असतानाच अमूर्त विचार तरंगानाही व्यक्तता देत असतो...त्यामुळे ज्या लोकभाषेचा तो त्यासाठी आश्रय घेतो, तिचे प्रतिमाश्रायी सामर्थ्य तर तो शतगुणित करतोच. पण, अमूर्त विचार व्यक्त करण्याच्या तिच्या प्रकृतिसिध्द मर्यादांवरही तो मात करतो’. (मराठी कविता : जुनी आणि नवी) म्हणजे  अमूर्त विचार, लोकभाषा, प्रतिमाव्यंजकता व भाषिक क्षमतावृद्धीतून तुकोबांची काव्यात्म भाषा जन्मास येते.  या काव्यात्म स्वरूप धारण केलेल्या लोकभाषेमुळेच तुकोबांचे काव्य अज्ञ अशा लोकांनाही आपले वाटते, तसेच अभ्यासक व अज्ञ जनांसही.
मिताक्षरी अभिव्यक्ती हा तुकोबांच्या भावकाव्याचा आणखी एक विशेष. तुकाराम काव्यातून फार बोलत नाही, त्यामुळेच तिच्यात मोठी गर्भित उर्जा आहे आणि अभिव्यक्तीची धार आहे.
-          डोई वाढवोनी केश | भुते आणशी अंगास
-          बोल बोलता सोपे वाटे, करणी करता टीर कापे
-          नवसे जर का पुत्र होती, तर मग कां करणे लागे पती
 अशी अनेक उदाहरणे पहिली की कवितेतील या अल्पाक्षारात असलेली गर्भित ऊर्जा आंनी तिची धार कालालते. इथे कमी शब्दात अनुक्रमे, सामाजिक आशय, व्यक्तीवर्तन आणि सत्यकथन ही ऊर्जा दडलेली आहे.
अनुभव व अभिव्यक्तीला असलेला पीळ हा  तुकोबांच्या काव्याचा आणखी एक विशेष होय. तो जेव्हा जाणवतो, तेव्हा वाचकाचे मन हेलावून टाकतो, वाचक अंतर्मुख होतो. तुकोबांच्या व्यक्तिमत्त्वातील अंतर्मुखता, अनुभवशोधवृत्ती, ईश्वरदर्शन, समाजदर्शन, अंत:संघर्ष इत्यादी घटक या अभिव्यक्तीच्या पीळाला कारणीभूत ठरले आहेत. उदा. ईश्वराच्या दर्शनाची आस: ‘जशी जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी’, यातून व्यक्त होते. तर कधी ईश्वरदर्शन न झाल्याने हा पीळ, ‘निलाजरा तुज नाही याती नाही कुळ, चोरटा शिंदळ ठावा मज’ अशा संतापाच्या माध्यमातून व्यक्त होतो. कधी तुकाराम अंतर्मुख होऊन आपल्याच अनुभवाचा शोध घेतो, तर कधी समाजदर्शन घडवतो. आत्मसंघर्ष आणि समाजसंघर्ष असे दोन्ही पैलू त्याच्या कवितेला आहेत.
समाजनिरीक्षण व जीवनचिंतन हा तुकोबांच्या भावकाव्याचा आणखी एक विशेष. तुकोबांच्या काव्याची प्रेरणा व प्रयोजन भक्ती हे असूनही नामदेव-जनाबाईप्रमाणे तो केवळ भक्तीची आळवणी करीत नाही. कारण तुकोबाच्या आध्यात्मिक प्रवासाचाच समाजनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण हा एक भाग आहे. या निरीक्षणाचे निष्कर्ष कसे काव्यातून प्रकटले आहे पाहा:
-          जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळचे कोणी नाही
-          भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळांच्या काठी देऊ माथा
-          मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
या चिंतनशील वृत्तीने तुकोबांनी स्वत:लाही सोडले नाही. आपली मर्यादा, आपली योग्यता तुकाराम नम्रभावाने व्यक्त करतात.
लाज वाटे मज मानिती हे लोक
हे तो नाही एक माझ्या अंगी
म्हणूनच डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी, आत्मशोध, ईश्वरशोध आणि समाजसंघर्ष यांच्या त्रिवेणीवर तुकोबाच्या काव्याची प्रयागनगरी वसलेली आहे, असे म्हटले आहे. (दै. लोकमत, नागपूर)
पार्थिव-अपार्थिवाची सांगड तुकोबा नेहमी आपल्या काव्यातून घालत असतो. अपार्थिवाकडे जाताना तुकोबा पार्थिवावरचे ध्यान सोडत नाही.
‘मायेविण बाळ क्षणभरी न राहे’,
कन्या सासूऱ्याशी जाये मागे परतोनि पाहे
येथे अपार्थिव असा आध्यात्मिक अनुभव, पार्थिव-लौकिक निरीक्षणे आणि प्रतिमाने यांच्या माध्यमातून साकारला आहे. ज्ञानेश्वर अपार्थिवा पार्थिवाचे उपासक आहेत तर तुकोबा पार्थिव-अपार्थिवाचे उपासक. म्हणूनच वारकरी ‘ग्यानबा –तुकाराम’ म्हणत असतो म्हणजे तो श्रद्धेचा लंबक पार्थिवाकडून अपार्थिवाकडे आणत असतो.             तुकोबांची कविता विविध संवेदनांचाही एकत्र प्रत्यय आणून देत असते. उदा. संत श्रेष्ठ आहे हे सांगत असतानाचा हा अभंग पाहा :
चंदनाचे हात पायाही चंदन
पररीसा नाही हीन कोणी अंग
दीपा नाही पाठी पोटी अंध:कार
सर्वांगी साखर अवघी गोड
या अभंगात ‘तैसे सज्जनाचे चित्त’  सांगताना एकच अश्यासाठी वेगवेगळे दृष्टांत विविध संवेदनादर्शनसाठी वापरलेली आहेत. इथे ‘चंदन’ दृष्टांताने ‘गंध’, परीस दृष्टांताने स्पर्श, दीप- दृष्टांताने दृक तर साखर दृष्टांताने रस या संवेदनांचा प्रत्यय आपणास येतो.
विविध प्रतिमाने हाही तुकोबांच्या काव्याचा एक विशेष आहे. प्रतिमांचा खच त्यांच्या काव्यातून तर जाणवतोच; पण त्याची सूक्ष्म मांडणी व उपयोजनही आपल्याला मोहवते. उदा. चंदन हे एकच प्रतिमान केवळ योजनेने काव्यात काव्यात सौंदर्य येत नाही. खरे सौंदर्य त्या प्रतिमाबांधत असते. याही वैशिष्ट्याला तुकोबाने आपल्या काव्यात सामावून घेतले आहे. डॉ. मालती पाटील यांनी ‘तुकारामाची प्रतिमासृष्टी’ या विषयावर प्रबंधच लिहिला आहे. याशिवाय मधुराभक्ती, विनोदाचे अंग, सूक्ष्म प्रच्छन्न सौंदर्यदृष्टी, उपदेश, संतसंग, इत्यादी वैशिष्ट्येही त्यांच्या काव्यात आहेत. ते सांगण्यासाठी स्वतंत्र लेख लिहायला हवा.
मात्र आधुनिक भावकवितेची सारी वैशिष्ट्ये आपल्या अभंगातून साकारणारा साकारणारा कवी म्हणून तुकाराम येथेही कळस झाले आहेत हे खरे.
--------------------------------------------------------------------------------------------------------  
संदर्भ ग्रंथ  
वा. ल. कुलकर्णी,  मराठी कविता : जुनी आणि नवी, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
दिलिप चित्रे, पुन्हा तुकाराम
भालचंद्र नेमाडे, तुकाराम, (संपा.), साहित्य अकादेमी, दिल्ली
दै. लोकमत, द. भि. कुलकर्णी, १९९७
तुकारामाची प्रतिमासृष्टी : मालती पाटील, प्रबंध, नागपूर विद्यापीठ, नागपूर 
 ------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी : समीक्षेची अपरूपे, हर्मिस प्प्ररकाशन, पुणे, २०१७
  


No comments:

Post a Comment

द. भि. : सहवासाचे जंतरमन्तर : डॉ. देवानंद सोनटक्के

  दभि : सहवासाचे जंतरमंतर :    डॉ.   देवानंद सोनटक्के वर्ष १९९६. त्यावेळी मी एम . ए . साठी नागपूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये मराठी विभागात...