Tuesday, May 5, 2020

शरश्चंद्र मुक्तिबोधांचा लौकिकतावादी साहित्यविचार



शरश्चंद्र मुक्तिबोध हे मराठीतील नवकवी व कादंबरीकर असून समीक्षेच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. ‘काही निबंध’ (१९६३), ‘जीवन आणि साहित्य’ (१९७२) आणि ‘सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य’(१९७८) हे त्यांचे समीक्षाग्रंथ प्रसिद्ध आहेत. यातून त्यांची प्रतिभावंत साहित्यचिंतक  अशी ओळख आपल्या समोर येते. 

----------------------------------------------------
शरश्चंद्र मुक्तिबोधांसारख्या तत्त्वचिंतक प्रतिभावंताचा साहित्यविचार त्यांच्या ‘सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य’ या ग्रंथामधून प्राधान्याने समोर येतो. या ग्रंथात त्यांनी ‘रससिद्धांत’ (अभिनवगुप्त) आणि ‘लयसिद्धांत’ (मर्ढेकर) या सिद्धांताची परखड चिकित्सा करून आपला ‘मानुषतेचा सिद्धांत’ मांडला आहे. साहित्यकृतीचा निकष म्हणून या दोन्ही सिद्धांतावर टीकाही केली आहे. हे करताना त्यांनी त्यातील काही परिभाषा मान्य केली आहे आणि काही भाग आत्मसातही केला आहे.
रससिद्धांतावरील आक्षेप
             ‘रससिद्धांत’ हा इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात भरतमुनीने त्याच्या ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथात नाट्यप्रकारासंदर्भात प्रथम मांडला असून पुढे इ. स. च्या ११ व्या शतकात अभिनवगुप्ताने तो नाट्याखेरीज काव्यप्रकारालाही लावून दाखविला आहे.
या सिद्धांतावर दि. के. बेडेकर तसेच गंगाधर गाडगीळ यांसारख्या आधुनिक अभ्यासकांनी या पूर्वीही आक्षेप घेतले आहेत. मुक्तिबोधांनी मात्र नुसते आक्षेप न घेता त्यासाठी पर्यायी असा ‘मानुषतेचा सिद्धांत’ही सांगितला आहे. मुक्तिबोधांचे या रससिद्धांतावरील आक्षेप पाहण्याआधी रससिद्धांताचे थोडक्यात स्वरूप पाहू.
रससिद्धांत हा निर्मितिप्रक्रिया व आस्वादप्रक्रिया यांचे स्वरूप स्पष्ट करणारा सिद्धांत आहे. ‘साधारणीकरण’ हा त्याचा आधार आहे. या सिद्धांतानुसार, निर्माता, साहित्यकृती व आस्वादक-रसिक या तिघांचेही जेव्हा ‘साधारणीकरण’ म्हणजे सामान्यीकरण होते; म्हणजे हे तिघेही लौकिकभिन्न पातळीवर येतात, तेव्हाच रसप्रक्रिया शुद्ध स्वरूपात प्रकटते. ही लौकिकभिन्न पातळी म्हणजे कलावंत व रसिक दोघेही आप-पर-तटस्थभावातून मुक्त होऊन, साहित्यकृतीच्या आस्वाद-जातिरूप अशा पातळीवर येतात, ती होय. तिलाच ‘साधारणीकरण’ अशी संज्ञा आहे. साहित्यकृतीच्या आशयाचे साधारणीकरण होत असते, म्हणजे लौकिकपातळीवरून आस्वादाच्या  लौकिकभिन्न पातळीवर जातानाही  आशय मात्र मूल्यरहित होत नाही; तर तो मूल्यभावासह प्रकटत असतो; आणि ही मूल्ये कोणती याचा विचारही भारतीय साहित्यशास्त्राने केला आहे.
भारतीय साहित्यशास्त्रानुसार ही मूल्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही होत. यालाच चार ‘पुरुषार्थ’ असे म्हणतात. साहित्याच्या या मूल्यनिष्ठेलाच ‘पुरुषार्थनिष्ठा’ किंवा ‘पुमर्थनिष्ठा’ असे नाव आहे. मुळात ही मूल्ये म्हणजे त्या त्या समाजाचे त्या त्या काळातील मानदंड होते, जे आज चुकीचेच आहे. पण त्यांचा मूल्यांचा आग्रह मात्र साहित्यातून धरला गेला. रससिद्धांतात याच मूल्यभावाचा आग्रह धरला आहे. त्यानुसारच रसाची विभागणी झाल्याचे दिसते. म्हणजे या मूल्यांच्या बाजूचे ते नायक-देव व विरुद्ध बाजूचे ते प्रतिनायक-दानव. म्हणून पहिले चार रस - वीर, हास्य, शृंगार, अद्भूत हे नायकगत, म्हणजे देवांचे; तर करुण, बीभत्स, रौद्र, भयानक हे रस प्रतिनायकगत, म्हणजे दानवांचे ठरले आहेत.
अशा मूल्याग्रह व रसविभागणीमुळेच मुक्तिबोधांनी रससिद्धांतावर आक्षेप घेतले आहेत. मुक्तिबोधांच्या मते, आर्ष महाकाव्ये, प्राचीन ग्रीक महाकाव्ये, आधुनिक साहित्य यांना हे रसतत्त्व लागू होत नाही. कारण रस ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे, असे जरी भारतीय साहित्यशास्त्र म्हणत असले तरी, आजच्या रसिकाला ती प्रतीती येत नाही.
मुक्तिबोधांच्या मते, आजचे श्रेष्ठ साहित्य मानवी जीवनाच्या वेगळ्या, व्यापक, विशाल अनुभवाची प्रतीती देते. मानवाच्या आशा, आकांक्षा, त्याचे हेतू, त्याच्या प्रेरणा याचे वेगळेच दर्शन घडवते; रसाची प्रतीती देत नाही. त्यामुळे आजच्या श्रेष्ठ कलाकृती, मानवी जीवनाचे गतिशील रूप, त्याच्या ज्ञात-अज्ञात नियती, स्थिती-गतीचे चित्रण करीत असते. त्याला रसाची परिभाषा वापरून न्याय देता येत नाही. ललितकृतीच्या लेखकाने विभावादींच्या प्रभावी चित्रणाबरोबरच श्रेष्ठ अजूनही काही विशेष दाखविलेले असते. अशा ललितकृतीच्या अनुभवांना ‘रसानुभव’ हे नाव देता येत नाही, असे मुक्तिबोधांचे म्हणणे आहे.
भारतीय साहित्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. ग. त्र्यं. देशपांडे यांनी त्यांच्या ‘भारतीय साहित्यशास्त्र’ या ग्रंथात म्हटले आहे की, ‘कवीने नाट्यात वा काव्यात कोणतीही कृती वर्णावयास घेतली तरी ती पुरुषार्थनिष्ठ असल्याशिवाय तिला अर्थपूर्णताही येत नाही आणि ती आस्वाद्यही होत नाही’.
मुक्तिबोधांनी या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले आहेत. त्यांच्या मते, भारतीय साहित्यशास्त्रानुसार, विदग्ध कलाकृतीचे नायक या पुमर्थनिष्ठेनुसार अनुकूल व प्रतिनायक प्रतिकूल वागतात. म्हणजे नायकगत व प्रतिनायकगत रस ठरलेले आहेत. याचा अर्थ कलाकृतीच्या आकलनाचे असे सामान्य नियम ठरून गेले आहेत.
मुक्तिबोधांच्या मते, या सिद्धांतानुसार आदर्श नायकाची कल्पना समाजसापेक्ष आहे. उदा. दुष्यंत हा आदर्श नायक, पुमर्थनिष्ठा पाळणारा. शिवाय हे आदर्श समाजाने घालून दिलेले आणि नाटककाराने मुकाट्याने मान्य केलेले. म्हणजे ते वर्गसापेक्ष आणि कालसापेक्ष आहेत. ही रसशास्त्राची मूल्यनिष्ठाच चुकीची व कालबाह्य आहे.
मुक्तिबोधांचा आक्षेप असा की, रससिद्धांतानुसार विभावानुभवांना एक साहित्यशास्त्रीय म्हणजे जातिरूप पातळीवर; आणि दुसरे समाजशास्त्रीय म्हणजे पुमर्थनिष्ठेला संवादी राहणे, अशी कामे करावी लागतात. परिणामी साहित्यशास्त्र केवळ उच्चवर्णीय व उच्चवर्गीय विचारांचेच आदर्श नाटकात आणते. त्यामुळे कलावंतांचे स्वातंत्र्य बाधित होते. त्याला केवळ भाषा-अलंकार व भावदर्शन यांच्यापुरतेच स्वातंत्र्य मिळते. या बंधनामुळे नायक-नायिका संकल्पनेत कोणत्याही क्रांतिकारी बदलाची अपेक्षा नष्ट होते. मुक्तिबोध म्हणतात, भारतीय साहित्यशास्त्राने कलावंतासमोर  समाजाची  परंपरागत मूल्ये कायम ठेवणारा आदर्श ठेवला व रसानुभव त्यावर अवलंबून ठेवला. परिणामी संस्कृत कवीची दृष्टी पुमर्थनिष्ठेला मानणारी ठरली. यामुळे स्वतंत्र निरीक्षण, स्वतंत्र मूल्यभाव, संघर्ष, रूढ न्याय व खरा मानवी न्याय यातील अंतर जाणवणे, ते प्रकट करणे, या गोष्टी कलावंतासमोर आल्या नाहीत. हे प्राचीन लेखक अभिजातवादी होते. त्यांना पुमर्थनिष्ठेचे बाळकडू मिळाले. तसेच रसानुभव ब्रह्मास्वाद असल्याने त्यांना अध्यात्मवादी तत्त्वज्ञानही मान्य करावे लागले.
तात्पर्य, मुक्तिबोधांच्या रससिद्धांताबद्दलचे एकूण निष्कर्ष असे की, संस्कृत काव्ये आणि त्याच्या पठडीतली काव्ये सोडली तर इतर ललित वाङ्मयाला हे तत्त्व लागू पडत नाही. आजच्या रसिकाला रसाची प्रतीती येत नाही. रससिद्धांतामुळे आधुनिक ललितकृतीच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश पडत नाही. रसास्वाद हा ब्रह्मास्वाद सहोदर मानल्यामुळे आध्यात्मिक तत्त्वज्ञान व पुरुषार्थनिष्ठा स्वीकारूनच रसतत्त्व स्वीकारावे लागते. त्यामुळे आजच्या साहित्याच्या संदर्भात रसतत्त्व स्वीकारता येत नाही.
म्हणूनच रसाला ललितकृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मान्यता देता येत नाही.
लयसिद्धांतावरील आक्षेप
            रसाला ललितकृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मान्यता देता येत नाही, या निष्कर्षापर्यंत मुक्तिबोध आले आहेत. मात्र आधुनिक काळातील बा. सी. मर्ढेकरांनी प्रतिपादलेल्या लयतत्त्वाला ललितकृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मान्यता देता येते काय, याचीही सविस्तर चर्चा मुक्तिबोध करतात. ती समजून घेण्याआधी मुळात लयतत्त्वकिंवा लयसिद्धांतकाय आहे, ते समजून घेऊ. 
मर्ढेकरांचे लयतत्त्व
लयतत्त्वकिंवा लयसिद्धांतहा प्रसिद्ध कवी व सौंदर्यशास्त्रज्ञ  बा. सी. मर्ढेकर यांनी मांडलेला सौंदर्यसिद्धांत होय. मर्ढेकरांच्या सिद्धांतानुसार, कलाकृती ही अनुभवनिष्ठ घटकांची सौंदर्यनिष्ठ संघटना असते. तिच्यातील घटक परस्परांशी सौंदर्यतत्त्वाच्या अपरिहार्यतेने निगडित झालेले असतात. हे सौंदर्यतत्त्व म्हणजे लयतत्त्व असून; लयतत्त्व म्हणजे, अनुभवातील सौंदर्यनिष्ठ संघटनेतील संवाद-विरोध-समतोल यांचे तत्त्व होय. शब्दांव्दारे साकारलेल्या भावार्थाची लयनिष्ठ रचना म्हणजे ललितकृती होय.
मर्ढेकरांच्या मते, ललितकृती कोणतीही असो, तिचे व्यवच्छेदक तत्त्व लयतत्त्व असते. प्रत्येक ललितकृतीला एक घाट असतो, जो सुंदर असतो, कारण तो लयनिष्ठ असतो. मात्र सौंदर्यभावना ज्यांच्या जवळ असते; तेच या ललितकृतीचा, सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो. या ललित वाङ्मयाचे साधन भाषा असते. तिच्या आधारेच भावार्थ अनुभव साकार होतात. त्याला भावार्थ म्हणतात. या भावार्थाचे कलाकृतीतील साकार घटक हेच ललितकृतीचे माध्यम होय; आणि भावार्थाच्या घटकांची संवाद-विरोध-समतोल या तत्त्वांनी रचना केली की, ती वाङ्मयीन कृती होते. म्हणजे भाषा-अनुभव-भावार्थ-मध्यम असा हा क्रम असून लयतत्त्व हे त्या रचनेचे तत्त्व आहे. म्हणून ते वस्तुनिष्ठ तत्त्व आहे. हेच लयतत्त्व ललित ललित वाङ्मयाला लागू होते.
लयतत्त्वाबद्दल मर्ढेकरांनी एक उदाहरण दिले आहे. एक भिकारी रस्त्यावर कण्हत आहे. एक श्रीमंत माणूस त्याकडे कानाडोळा करतो आहे, तर एक गरीब माणूस त्याला मदत करतो आहे आणि हे दृश्य एक तिऱ्हाईत पाहतो आहे. मर्ढेकरांच्या मते, हे दृश्य पाहून त्यात तिऱ्हाईताने तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न केल्यास जीवशास्त्रीय भावना (लौकिक राग, लोभ आदी) निर्माण होतात; तर त्या अर्थपूर्ण वागणुकीतील विरोधलय पहिल्यास सौंदर्यभावना निर्माण होईल. अशा सौंदर्यभावनांची म्हणजे भावार्थाच्या घटकांची संवाद-विरोध-समतोल या तत्त्वांनी रचना केली की, ती वाङ्मयीन सौंदर्याकृती होते.
तात्पर्य, जीवनानुभवाची तर्कसंगती लावणे म्हणजे जीवशास्त्रीय भावना व लौकिक जीवनानुभव होय, तर जीवनानुभवाची सौंदर्यसंगती लावणे म्हणजे सौंदर्यशास्त्रीय भावना व अलौकिक कलानुभव होय. इथे मर्ढेकर कलानिर्मित्ती व आस्वाद ही अलौकिक गोष्ट मानतात; तर मुक्तिबोध लौकिक.
            लयतत्त्वावरील मुक्तिबोधाचे आक्षेप
            मर्ढेकरांनी दिलेल्या या उदाहरणावर मुक्तिबोधांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, ज्याप्रमाणे काळा व पांढरा यांत मधील विरोध जसा ठळक जाणवतो, तसा अशा अनुभवात जाणवत नसतो. उदा. लांडग्याच्या कळपातून सुटून आलेला मुलगा, आदिवासी जमातीतून नुकताच आलेला किंवा बंगालच्या फैटणवाला अशा तिन्ही वेगवेगळ्या वर्गातील माणसांना त्या भिकाऱ्याच्या दृश्यातील विरोधसंबंध जाणवणार नाही. कारण, अर्थातील विरोध संबंध जाणवण्यासाठी तिऱ्हाईत हा वर्गीय संबंधातीलच हवा. म्हणजे तिऱ्हाइताच्या जाणिवासुद्धा वर्गीय असतात, लौकिक असतात, असे त्यांना म्हणावयाचे आहे. मार्धेकारणी मात्र तिऱ्हाईत हा कवी-सौंदर्यभावना संपन्न मनाला आहे.  मुक्तिबोधांच्या मते, व्यवहारात अनुभव असा तटस्थतेच्या पातळीवर येत नाही आणि मर्ढेकरांची सक्त ताकीद अशी की, तिऱ्हाईताने तर्कसंगती लावू नये, गरिबाबद्दल दया किंवा श्रीमंतांबद्दल तिरस्कार वाटू देऊ नये, हे शक्य नसते. इथे मुक्तिबोध कलास्वाद ही लौकिक व्यावहारिक गोष्ट आहे असे मानत आहेत. कारण ते स्वत: लौकिकतावादी आहेत.
            मुक्तिबोधांचा आक्षेप असा की, मर्ढेकरांना व्यावहारिक अनुभव व कलात्म अनुभव यातील नेमका भेद माहित नाही. सौंदर्य हे रचनेत असते, आशयात नसते असे त्यांचे म्हणणे असल्यामुळे त्यांनी या अनुभव भेदाकडे लक्ष दिले नाही.  ते राग, लोभ या भावना येऊ न देता ते तिऱ्हाईतपणे नुसती भावनासंगती लावावी, अर्थ नव्हे असे म्हणतात. पण मुळात ललितकृतीच्या घटकातच मूल्यात्म संघर्ष असतो, याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. 
            ललितकृतीच्या घटकातच मूल्यात्म संघर्ष 
          ललितकृतीच्या घटकात मुळातच मूल्यात्म संघर्ष असतो, या गृहितकाच्या आधारे मुक्तिबोध मर्ढेकरांच्या उदाहरणाचे विश्लेषण करतात. त्यांच्या मते, भिकाऱ्याच्या उदाहरणात, श्रीमंताच्या कृतीत भौतिक संपन्नता व नैतिक विपन्नता आहे, तर गरिबाच्या कृतीत नैतिक संपन्नता व भौतिक विपन्नता आहे. हा विरोध संबंध आहे. तो नुसता सौंदर्यात्म भावनायुक्त नाही, तर अर्थपूर्ण घटकातील आहे. तसेच तो काळ्या पांढऱ्या रंगातील आपोआप जाणवणाऱ्या विरोधासारखा नाही, तर मूल्यात्म आहे. त्यात भौतिक व नैतिक असे दोन परस्परविरोधी घटक आहेत. तात्पर्य, ललितकृतीतील घटकांमध्ये संवाद-विरोध संबंध निर्माण होतात, ते त्या मागील मूल्यात्म संघर्षामधूनच, नुसत्या विरोध लयातून नव्हे.
            मर्ढेकरांच्या सौंदर्यविचारांच्या मर्यादा
            पुढे मुक्तिबोधांनी लयसिद्धांताबरोबरच मर्ढेकरांच्या सौंदर्यविचारांच्याही मर्यादा सांगितल्या आहेत. त्यांच्या मते, मर्ढेकरांना ललित साहित्यातील भावना-आकृती भूमितीय स्वरूपाची म्हणजे आकारिक वाटते. ते चित्र आणि शिल्प यांच्या पातळीवर ललित साहित्याला आणून बसवतात. त्या कलांतील लयतत्त्वाला साहित्यकलेत महत्त्व देतात. ललित कलाकृतीचे घटक व त्यातील त्यांचे परस्पर संबंध यांचा ते यांत्रिकपणे विचार करतात, त्यातील मूल्यात्मक भावार्थाकडे लक्ष देत नाहीत.
             दुसरे असे की, मर्ढेकर भावनांचे सूक्ष्म घटक व त्यांचे सूक्ष्मतर परस्पर संबंध यांची विविध लयबद्धता फक्त कवीच्या-लेखकाच्या अनुभवातच साकार होते आणि भावनांच्या या लयबद्धतेची श्रेष्ठता त्यातील जाणिवांच्या व्यापकतेनेच प्रवर्तित केलेली असतात, असे मानतात. हेही मुक्तिबोधांना चुकीचे वाटते. कारण या भावनांच्या व भावनासंबंधांच्या सूक्ष्मतर स्वरूपाची प्रचिती मूल्यार्थ व्यापकतेनेच येते; नुसत्या संवेदनेने नाही. म्हणजे अधिकाधिक संवेदानांपेक्षा अधिकाधिक मूल्यार्थ याला मुक्तिबोध महत्त्वाचे मानतात. म्हणजे मुक्तिबोध अर्थाला तर मर्ढेकर सौंदर्यभावनेला महत्त्व देतात. मर्ढेकरांच्या वाङ्मयीन महात्मतेत लक्ष्य असलेला कैवल्यपूर्ण मूल्यभावम्हणजेच लयबद्धतेतून लक्ष्य होणारे सौंदर्य होय. मात्र या व्यापक जाणिवा किंवा अनुभव साफल्य मूल्यात्म असते, हे मर्ढेकर कबूल करत नाहीत, असा आक्षेप मुक्तिबोध घेतात.
            तिसरे म्हणजे, रसिकांनी लयबद्धतेचा आस्वाद घ्यावा, आशयाचा मूल्यात्म आस्वाद नको, हे जे मर्ढेकरांना अभिप्रेत आहे; जे मुळात साहित्यकलेत शक्य नसते. ते फक्त चित्रकलेतच शक्य असते. कारण चित्र-शिल्प यांत रूपरचनेचे चिंतन असते, तसे साहित्यकलेत शक्य नसते. मुक्तिबोधांच्या मते, तुकोबांच्या कवितेचा आस्वाद म्हणजे फक्त लयबद्धतेचा आस्वाद नव्हे. त्या कवितेचे आपण आकृतिबंध म्हणून चिंतन करीत नाही, भावार्थाचे, मूल्यार्थाचे करतो.
            मुक्तिबोध म्हणतात, साहित्याच्या निर्मिती व आस्वाद प्रक्रियेचा विचार केल्यास, संवाद-विरोध अनुभव घटकांच्या साह्याने जे भावार्थ प्रतीत होतात, त्यामागे एक व्यापक एकात्म जाणीव असते. कलाकृतीच्या संवाद- विरोधी घटकांच्या प्रत्ययामधून रसिकांना त्या एकात्म जाणिवेची प्रतीती येते. परंतु असा निष्कर्ष मर्ढेकर काढत नाहीत, ते संघटनेच्या म्हणजे रचनेच्या संदर्भातील घटकांच्या संवाद-विरोध-समतोलावरच भर देतात. ही मर्ढेकरांच्या सौंदर्यविचारांची मोठीच मर्यादा होय.  
ललित कला व ललित वाङ्मयात भेद
            मुक्तिबोधांच्या मते, मुळात इतर ललित कलेत लक्ष्य असलेला संवेदनानुभव आणि ललित वाङ्मयातील भावार्थाचे घटक यांच्यात गुणात्म भेद आहे. ललित कलांमध्ये विशुद्ध संवेदनांची संवाद-विरोधी रचना ही जशी संवाद-विरोध-समतोलावरच आपली चित्तवृत्ती खिळवून ठेऊ शकते, तसे साहित्यकृतीत भावार्थाच्या घटकांबाबत कधीच होत नाही. कारण ललित वाङ्मयाबाबत संवाद-विरोधी आकलन करणारी वाचकाची जी चित्तवृत्ती असते, ती या वाङ्मयातील संवाद-विरोधावरच स्थिर न राहता, वाचकाला तात्काळ एकात्म अर्थाची प्रतीती करून देत राहते. अशा संवाद-विरोधी संबंधांच्या अनेक स्तरावरील अनेक भावार्थव्यूहांच्या मागील एकार्थ आकलन करीत ती त्या अनेक एकार्थामधून ललित कलाकृतीतील जीवनसत्याचा साक्षात्कार करून देते.  म्हणजे साहित्यकृतीत अर्थ पातळीवरील संवाद-विरोध वाचकाला एकार्थ व त्या आधारे जीवनसत्य सांगतो, सौंदर्य नव्हे, असे मुक्तिबोधांना म्हणावयाचे आहे.
         तात्पर्य, मर्ढेकरांना साहित्यात प्रकटणाऱ्या जीवनानुभवाचा तर्कापलीकडील संवेदनात्मक संवाद-विरोध-समतोलयुक्त अनुभव अभिप्रेत आहे; तर मुक्तिबोधांना साहित्यात प्रकटणाऱ्या जीवनानुभवाचा तर्कसापेक्ष मूल्यार्थगर्भ अनुभव अभिप्रेत आहे. एक आकृतिसापेक्ष विचार आहे, दुसरा अर्थसापेक्षविचार आहे. मर्ढेकरांचा भर रचनातत्त्वववर आहे, मुक्तिबोधांचा आशयावर. मर्ढेकरांना अनुभवातील संवाद-विरोधी लयातील सौंदर्य महत्त्वाचे वाटते, तर मुक्तिबोधांना अनुभवातील संवाद-विरोधी लयातील सत्य महत्त्वाचे वाटते. एक भावना-संवेदनांच्या लयप्रतीतीला महत्त्व देतोय, तर दुसरा आशयातील मूल्यात्म अर्थाला. असे होण्याचे कारण मर्ढेकर हे निखळ सौंदर्यवादी-कलावादी होते; तर मुक्तिबोध हे जीवनवादी-लौकिकतावादी सौंदर्यमीमांसक आहेत. त्यामुळे दोघांच्या सौंदर्यविचारात मूल्यात्म भेद आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
            त्यामुळेच मुक्तिबोध म्हणतात, मर्ढेकरांनी, संवेदनानुभवाच्या घटकांची संघटना व त्यामधील परस्पर संबंधांचा अनुभव आणि भावार्थाची संघटना व त्यामधील परस्पर संबंधांचा अनुभव, यामधील गुणात्म भेद लक्षात न घेतल्यामुळे मर्ढेकरांचा सौंदर्यविचार चुकीच्या वळणावर गेला.
            लयसिद्धांत : वाङ्मयीन महात्मतेचा निकष नव्हे
            मर्ढेकरांनी वाङ्मयीन महात्मतेचा निकष लयहाच मानला आहे. त्यांच्या मते, लेखकाच्या अंत:करणातील भावना-सौंदर्याची संगती लेखकाच्या विश्वरचना सौंदर्याशी अधिकाधिक सम्यकतेने सांगड घालणे यातच महात्मतेचा प्रकर्ष आहे. यावरही मुक्तिबोधांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, ‘विश्वरचना सौंदर्यहा शब्द वापरताना मर्ढेकरांनी हे विश्व एक आणि एकच वस्तू आहे, असे गृहीत धरले आहे, हेच चुकीचे आहे. कारण हे विश्व मानवाला संपूर्ण दिसू शकत नाही. त्यामुळे विश्वरचना सुंदर असल्याचे गृहीत धरणे चुकीचे आहे. विश्वाच्या रूपाची माहिती असल्याशिवाय भावनासंगतीमध्ये विश्वव्यवस्थेचे प्रतिबिंब पडले आहे, हे कसे कळणार?
            मर्ढेकर मानतात की, ज्या ललितकृतीत संवाद-विरोध-समतोलात्मक अशा लयनिष्ठ संबंधाचे अधिकाधिक घटक असतील ती श्रेष्ठ. मुक्तिबोधांच्या मते, हा निकषही गृहीत धरता येत नाही. कारण श्रेष्ठ वाङ्मय हे कमीत कमी घटकांचेही असू शकते. तेव्हा घटकांचा म्हणजे लयसंबंधांचा कमीजास्तपणा हा ललितकृतीच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेचा निकष योग्य नाही.
            तात्पर्य, लयतत्त्व हा वाङ्मयीन महात्मतेचा निकष होऊ शकत नाही. मुळात लयतत्त्व ही कलेतील रचनेने निर्माण करावयाची गोष्ट नाही, तर लय ही मुळातच असते. कारण ते कलातत्त्वीय सत्य नसून निसर्गतत्त्वीय गोष्ट आहे. हे म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांनी एंट्रोपीचा सिद्धांतसमजावून सांगितला आहे.
            एंट्रोपीचा सिद्धांत
            मुक्तिबोधांच्या मते, लयतत्त्व हे निसर्गशास्त्रीय तत्त्व आहे. लयतत्त्व ही ललित वाङ्मयाची अवश्योपाधी आहे. लयतत्त्व ही एक भाषिक संघटना आहे. तिथे रूपव्यवस्थिती आहे; आणि रूपव्यवस्थिती आहे, म्हणून तिथे समांगता’ (Symentry) आहे. ही गोष्ट पदार्थविज्ञान, गतिशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र व मानसशास्त्र यांच्या आधारे सिद्ध करता येते. या सर्वांच्या मुळाशी एंट्रोपीचा सिद्धांतआहे.  
            या सिद्धांतानुसार, हे विश्व स्थिर नसून गतिमान आहे. ऊर्जा’ (Energy) नित्यनवी रूपे धारण करत असते व ते करताना अधिक वैविध्याकडे जाण्याची तिची प्रवृत्ती असते. गर्भित ऊर्जा’ (Potential Energy) ही किमान पातळीवर येऊनच आपला समतोल साधत असते; हा थर्मोडायनॉमिक्सचा पहिला नियम आहे. ही गर्भित ऊर्जा तिच्या सामर्थ्याच्या पातळीवर स्थिर रूप धारण करते व ते कमीत कमी जागेत द्रव्याच्या सर्वत्र समान वितरणामधून सिद्ध होते. रूपदृष्ट्या हीच समांगताहोय. 
            मुक्तिबोधांच्या मते, जगाच्या सर्व पातळ्यांवरील रूपपरिवर्तनात्मक गतिशीलताही एंट्रोपीच्या सिद्धांतानुसार असते; तर त्याची स्थितिशीलताही थर्मोडायनॉमिक्सचा पहिल्या नियमानुसार असते. या गोष्टी जैविकच आहेत. या नियमानुसार चित्रशिल्पादींची रूपव्यवस्थिती ही जैविक प्रक्रिया असून ती रूपविकास व्यापारातून सिद्ध झालेली असतात.
            हेच तत्त्व ते आता साहित्याच्या भाषेलाही लावून दाखवतात. मुक्तिबोध म्हणतात, भाषेची उच्चारशैली ही मानव निसर्ग यांच्या संघर्षातूनच निर्माण झाली आहे. तिच्यातील लयबद्धता ही प्रत्यक्ष कृतिसंबद्ध अवस्थेतील शरीर, म्हणजे श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, हालचाल यांच्याशी संबंधित असते. कोण मला वठणीला आणू शकतो मी पाहे’, हा केशवसुतांचा काव्यातील उद्गार युद्धसज्ज प्रतिमेला सुचवतो.  कारण तो त्या अवस्थेतील शरीर मानस प्रक्रियांच्या विशिष्ट आरोह अवरोह प्रक्रियांचा व्यूह तयार करतो. उच्च्चारांची व हालचालींची लयबध्दता ही एखाद्या कृतीच्या सफलतेची अट असते. तात्पर्य, कलाकृतीतील लयबद्ध भाषिक आकृती ही सुद्धा शरीर मानस प्रक्रियातून आलेली स्वाभाविक लयबध्द भाषिक प्रक्रिया आहे. त्यामुळे भाषिक लय पण निर्माण करता येत नाही, तर ती आपोआपच निर्माण होत असते. असे त्यांना म्हणावयाचे आहे.
द्वंद्वात्मक मानवी जीवनातच संवाद- विरोध
            मुक्तिबोधांच्या मते, मानवी व अमानवी जीवन संघर्षरूप, द्वंद्वरूप आहे. त्यामुळे त्याचे शब्दरूप घटक हेही द्वंद्वरूपात्मक समतोल राखाणारे असते. त्यामुळे अशा जीवनाच्या शब्दरूप संघटनेमध्ये संवाद- विरोध-समतोलाचे तत्त्व निर्माण होणे स्वाभाविकच आहे. असा शब्दरूप अनुभव एक प्रकारे भाषिक सुरावलीच असते. या भाषिक सुरावलीत लयींची प्रतिमाव्यंजकता (क्षमता) व प्रतीकात्मकता असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे अशा सुरावलीयुक्त भाषिक वृत्तीगर्भतेतून जे अनुभव साकार होतील तेव्हा आपोआपच लयतत्त्वाचे स्वरूप त्या संघटनेला प्राप्त होईल. म्हणजे भाषिक सुरावलीमुळे साहित्यकृतीत आपोआपच लयतत्त्व प्राप्त होत असते. त्यासाठी मुद्दाम लेखकाला काही करावे लागत नाही. अशा तऱ्हेने साहित्यकृतीतील भाषिक लय सेंद्रिय गोष्ट असते, असे मुक्तिबोध मानतात. मात्र मुळात मर्ढेकरांना लय भाषिक नव्हे तर, अनुभव व संवेदना-भावना यांत अभिप्रेत आहे, याकडे मुक्तिबोधांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
            मुक्तिबोधांच्या म्हणण्यानुसार, व्यवहारातील अनुकूल-प्रतिकूल वृत्ती प्रकट करणाऱ्या साहित्याच्या व्यवस्थेतून  ललित लेखक जो एकार्थाचा प्रत्यय देतो; तो एकार्थच ललितकृतीमध्ये संवाद-विरोधी अनुभवाचे घटक एकत्र करून प्रकटतो. अशाप्रकारे ललितकृती एक चांगली भाषिक संघटना असते. त्यामुळे ती एका बाजूला एकार्थ प्रकट करते. दुसरीकडे संवाद विरोध समतोल ही रचनामूल्ये प्रकट करते.
            मुक्तिबोध म्हणतात, मर्ढेकरांनी लयबध्दता ही ललित वाङ्मयीन कलाकृतीची अपरिहार्य उपाधी मानली आहे.  मात्र ती संपूर्ण निसर्गाच्या रूपायन प्रक्रियेचाच तो विशिष्ट स्तरांवरील अविष्कार असतो. म्हणूनच लयतत्त्व हे निसर्गशास्त्रीय तत्त्व असून ते कलाशास्त्रीय तत्त्व नाही. ललितकलाकृतीचा आस्वाद म्हणजे लयतत्त्वाचा आस्वाद नव्हे तर ते एक सखोल साक्षात्कारी रूप असते. ते रूप म्हणजे त्या अनुभवाचेच स्वरूप असते. मर्ढेकर चित्र-शिल्पादी संवाद-विरोधी संबंधांचा अनुभव व ललित कलाकृतीतील घटकांचा संवाद-विरोधी-समतोलाचा अनुभव यातील मूल्यात्म भेद पाहू शकले नाही. त्यामुळे त्यांनी लयतत्त्व हे वाङ्मयीनकृतीचे सौंदर्यतत्त्व मानले. तथापि, ललित वाङ्मयीन कलाकृतीत एकार्थ-प्रतीतीलाच महत्त्व असते. पर्यायाने लयतत्त्वाला ललित वाङ्मयीन कृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मान्यता देता येत नाही.
मानुषतेचा सिद्धांत  
            मुक्तिबोधांनी अशाप्रकारे रससिद्धांत व लय सिद्धांत हे ललित वाङ्मयीन कृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून नाकारल्यानंतर त्याला पर्यायी असे मानुषताहे सौंदर्यतत्त्व सांगितले आहे. मानुषताम्हटल्यावर कुणाच्याही मनात माणुसकीआणि मानवताअसे अर्थ जागे होतात. परंतु हे अर्थ मुक्तिबोधांना अभिप्रेत नाहीत. मुक्तिबोधांनी केलेल्या विवेचनाचा सारभूत अर्थ असा आहे:
            मुक्तिबोधांच्या मते, मनुष्य हा इतर पशुपक्ष्यांप्रमाणे एक नैसर्गिक प्राणी आहे. परंतु, मानवेतर प्राण्यांप्रमाणे त्याचे जीवन निव्वळ निसर्गस्तरीय नाही. निसर्गाशी संघर्ष करूनच त्याने विवाहसंस्था, कुटुंबसंस्था, शिक्षणसंस्था, न्यायसंस्था, राज्यसंस्था इत्यादी संस्था उभारल्या आहेत. निसर्गाशी त्याचे हे जे द्वंद्व आहे, ते त्याच्या भौतिक विकासास कारणीभूत ठरले आहे.
            मात्र, या द्वंद्व प्रक्रियेमुळेच माणसाच्या मनात निसर्गापासून तुटलेपणाची जाणीव निर्माण होते. या तुटलेपणास परात्मभावअसे नाव आहे. हा परात्मभाव मानवाच्या मनात व्याकुळता निर्माण करतो. या व्याकुळतेचे मूळ माणसाच्या नैसर्गिक असण्यामध्ये, त्या असतेपणाच्या जाणिवेमध्ये असते. या जाणिवेसच बीईंग’ (Being) आणि द्वंद्वनिष्ठ विकासास बिकमिंग’ (Becoming) असे म्हणतात. यापैकी बीईंगमागील मूल्यभाव कालातीत, तर बिकमिंगमागील मूल्यभाव कालसापेक्ष म्हणजे समाजसापेक्ष असतो. आश्चर्य म्हणजे बीईंगमागील समाजनिरपेक्ष मूल्यभावास कालपरत्वे दया- क्षमा- अहिंसा, स्वातंत्र्य- समता- बंधुता अशी नावे मिळतात. उलट बिकमिंगमागील समाजसापेक्ष मूल्यभाव संयम-शिस्त-विवेक, मुक्ती, न्याय, पुरोगामित्व इत्यादी शब्दांनी ओळखला जातो.
            मुक्तिबोधांच्या मते, हे मानुषतामूल्य जीवनतत्त्वही आहे, साहित्यतत्त्वही आहे आणि साहित्यकृतीच्या प्रतवारीचा तो निकषही आहे. सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्यया ग्रंथाच्या ८ व्या आणि ९ व्या प्रकरणामध्ये मुक्तिबोधांनी मानुषतेचे विस्तृत स्पष्टीकरण केले असून अखेरीस एडीपस रेक्स’ (सोफोक्लीज), ‘हॅम्लेट’ (शेक्सपिअर) आणि मेटामॉर्फोसिस’ (काफ्का) या जगप्रसिद्ध कलाकृतींना सूचकपणे लावूनही दाखवले आहे.
            शरश्चंद्र मुक्तिबोध हे नागपूरच्या नागपूर महाविद्यालयामध्ये मराठीच्या पदव्युत्तर वर्गास दीर्घकाळ साहित्यशास्त्राचे अध्यापन करीत असत. नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन वैशिष्ट्य म्हणजे, साहित्यशास्त्राच्या पत्रिकेत घटक न नेमता पूर्ण बीजग्रंथ नेमण्याची पद्धत होती. त्यामुळे भारतीय साहित्यशास्त्र’ (ग. त्र्यं. देशपांडे), ‘अॅरिस्टॉलचे काव्यशास्त्र’ (गो. वि. करंदीकर), ‘सौंदर्य आणि साहित्य’ (बा. सी. मर्ढेकर) हे ग्रंथ संपूर्ण अभ्यासास नेमलेले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे  साहित्यशास्त्रीय आकलनही कसदार झाले; तसेच सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य’, (शरश्चंद्र मुक्तिबोध), ‘मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना’, (द. भि. कुलकर्णी ), ‘बाळ सीताराम मर्ढेकर’ (डॉ. यशवंत मनोहर), ‘रसचर्चा’ (डॉ. पद्माकर दादेगावकर) इत्यादी मोलाचे साहित्यशास्त्रीय व सौंदर्यशास्त्रीय ग्रंथही निर्माण झाले.
            मुक्तिबोधांच्या सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्यया ग्रंथावरही ग. त्र्यं. देशपांडे यांच्या भारतीय साहित्यशास्त्रआणि बा. सी. मर्ढेकर यांच्या सौंदर्य आणि साहित्यया ग्रंथाची छाप स्पष्ट आहे. म्हणजे या ग्रंथाचे त्यांनी अनुकरण केले नसून त्यातील अनुकूल अशा तत्त्वाचे आत्मसातीकरण केले आहे. मुक्तिबोधानी वापरलेल्या अभिधा’, ‘लक्षणा’, ‘व्यंजना’, ‘एकार्थ’, ‘साधारणीकरण’, ‘स्व-गत’, ‘पर-गत’, ‘तटस्थ’, ‘रस ही परिभाषा किंवा ‘संवाद-विरोध’, ‘लय’, ‘संवेदना’, ‘संघटना’, ‘सौंदर्य’, ‘आत्मसंरक्षण’, ‘वंशसंवर्धन’ या संज्ञा-संकल्पना पाहिले की हे लक्षात  येते.
            केवळ ग्रंथच नव्हे काही तत्त्वज्ञानांचाही प्रभाव मुक्तिबोधांच्या या सिद्धांतावर आहे. उदा. अस्तित्ववाद’. या तत्त्वज्ञानातील, ‘अस्तित्व’ (Existence), ‘परात्मता’, ‘अस्तित्व-वेदना’, ‘सारतत्त्व’ (Essence) इत्यादी परिभाषा व संकल्पना त्यांनी मानुषतेच्या सिद्धांतासाठी आत्मसात केल्या.
            मात्र हे करताना त्यांनी आपला मार्क्सवादी पिंड कायम ठेवला आहे. तो विकसितही केला आहे. कालसापेक्ष भौतिक परिवर्तनआणि भौतिक परिवर्तनही त्यांची संकल्पना मार्क्सवादाशी सुसंगत आहे. तर कालनिरपेक्ष सनातन मानुषताही त्यातून उत्क्रांत झालेली पण त्याहून भिन्न अशी संकल्पना आहे.
            ललित वाङ्मयकृती ही एक वास्तुनिष्ठ भाषिक संघटना असते, तिच्यात सृष्टीमध्ये सार्वत्रिक असलेले लयतत्त्व असते. ती सुंदर असते, (मर्ढेकर), किंवा निर्मात्याचे व आस्वादाकाचे साधारणीकरण होत असते, त्यामागे आप-पर-तटस्थतारहित भूमिका असते. ललितसाहित्याच्या भाषेमध्ये एकार्थ (व्यंग्यार्थ) असतो (अभिनवगुप्त). ललित वाङ्मयकृती प्रतिमापूर्ण असते. तिला भावनासूचक सुरावली असते (आधुनिक समीक्षा) इत्यादी विवेचन पाहिल्यास मुक्तिबोधांच्या व्यासंगाचा परिचय होतो.
            सैद्धांतिक अभिनिवेश वा वैचारिक चलाखी यांच्या आहारी न जाता सत्यशोधकाच्या तळमळीने मुक्तीबोधांनी स्वत:चे व इतरांचे विचार तपासत मानुषतेचा व्यामिश्र व सूक्ष्म सिद्धांत मांडला आहे. हे करताना त्यांनी त्यांच्याही नकळत प्रतीपक्षीयांच्या परिभाषेचे आणि सिद्धांताचे ज्यादा सुलभीकरण केले आहे. स्वत:चा विचार व विशेषत; त्याचे उपयोजन पुरेशा विस्ताराने केले नाही. अर्थात भावी अभ्यासकांनी ते करणे गरजेचे आहे.
            अशाप्रकारे मुक्तिबोधांनी अभिनवगुप्ताचे रसतत्त्व, भारतीय साहित्यशास्त्रातील पुरुषार्थनिष्ठा, मर्ढेकरांचे लयतत्त्व आणि सौंदर्यविचार नाकारला आहे, आणि मानुषतेचा आपला सिद्धांत मांडून त्याचे उपयोजनही करून दाखवले आहे. त्यांनी दिलेला हा समीक्षेचा निकष आता पुढील अभ्यासकांनी तपासायचा आहे.
नागपूर, १४ एप्रिल, १९९८

§  अभ्याससाधने :            
         अरुणा देशमुख, मराठीतील लौकिकतावादी साहित्यविचार, साहित्य प्रसार केंद्र, नागपूर,  १९९५
         . ना.  पेडणेकर, साहित्यमूल्यांची समीक्षा, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००४
         ग. त्र्यं. देशपांडे, भारतीय साहित्यशास्त्र, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८० (ति. आ.)
         बा. सी. मर्ढेकर, सौंदर्य आणि साहित्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९६० (दु. आ.)
         द. भि कुलकर्णी, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना, (दु. आ.) पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००९
         रा. भा पाटणकर., मुक्तिबोधांचे साहित्य, मौज प्रकाशन, मुंबई, १९८६
          शरश्चंद्र मुक्तिबोध,   सृष्टीसौंदर्य आणि साहित्यमूल्य (दु. आ.), लोकवाङमय गृह, मुंबई, १९८७ :
डॉ. देवानंद सोनटक्के, पंढरपूर
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी 
१. अक्षरवाङ्मय, नांदेड, ऑक्टो-नोव्हे-डिसे. २०१३
२. ‘समीक्षेची अपरूपे’,हर्मिस प्रकाशन, पुणे, २०१७



             
  

  

 
             


No comments:

Post a Comment

द. भि. : सहवासाचे जंतरमन्तर : डॉ. देवानंद सोनटक्के

  दभि : सहवासाचे जंतरमंतर :    डॉ.   देवानंद सोनटक्के वर्ष १९९६. त्यावेळी मी एम . ए . साठी नागपूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये मराठी विभागात...