Monday, May 4, 2020

काय डेंजर वारा सुटलाय : वर्तमान महानगरी वास्तवाचे उत्तर आधुनिक दर्शन


‘काय डेंजर वारा सुटलाय’ हे नाटककार जयंत पवार यांचे नाटक. नव्वदनंतरचे महानगरी जीवन; जागतिकीकरणात सामान्य माणसाची झालेली कोंडी; भांडवलशाहीच्या मागे जाणाऱ्या सर्व व्यवस्था; खाजगीकरण, उदारीकरणामुळे हतबल झालेली लोकशाही; सामान्य माणसाला वजा करून बिल्डर, राजकारणी आणि पोलीस यांच्या कह्यात गेलेल्या संरक्षण, न्याय, राजकारण, आरोग्य इत्यादी व्यवस्था; न्याय, नैतिकता, समता, हक्क, कर्तव्य, कायद्याचे राज्य या मूल्यांच्या जपणुकीबाबत समाजाची उदासीनता- असे समकालीन वास्तव हे नाटक मांडत जाते. या अर्थाने १९९० नंतरचा उत्तर आधुनिक समाज, त्याचे जगणे आणि त्याची संस्कृती-मूल्ये यांचे संदर्भच कसे बदलले आहे, ते हे नाटक अधोरेखित करते. महानगरी जीवनातील सामान्य माणसाचे अस्वस्थ वर्तमान आणि असुरक्षित जगणे समोर आणते; आणि आजच्या राजकीय, सामाजिक व्यवस्थेचा बुरखाही फाडते.
-------------------------------------------------------------------------------------------
सत्यविजय नरहरी दाभाडे हे मुंबईतील कुसुमकुंज बिल्डिंगमध्ये मधील एका फ्लॅटमध्ये राहणारे मध्यमवर्गीय, सज्जन, पापभिरू, प्रामाणिक व कुटुंबवत्सल गृहस्थ. शिक्षिकेच्या पेशातून सेवानिवृत्ती घेतलेली, शुगर आणि बी. पी.ची पेशंट असलेली बायको; सिनेमा, टीव्ही सिरीयलचे आकर्षण असलेला तरुण मुलगा बंटी; आणि एम.बी.ए.ची पूर्वतयारी करणारी आणि एका तरुणाच्या प्रेमात पडलेली मुलगी- यांसह ते या इमारतीत गेली तीस वर्षे राहत आहेत. दाभाडे सेफ इंडिया इन्शुरंसमध्ये ऑफिसर आहेत. कीर्तनकार वडिलांच्या पोटी जन्मलेल्या दाभाडे यांचा सांभाळ त्यांचे आईवडील लहानपणीच गेल्यामुळे इंदूरच्या कीर्तनकार काकांनीच केला. त्यामुळे कीर्तनकाराचा गप्पीष्टपणा आणि शुचिता त्यांच्या बोलण्या-वागण्यात आहे.
            कुणाच्या अध्यात मध्यात नसणाऱ्या या सज्जन कुटुंबाच्या फ्लॅटवर बिल्डरची नजर पडते. त्यांच्या बेडरूमला सी-फेस असल्यामुळे त्याची वाट्टेल ती किंमत मोजायला तो तयार आहे. मात्र आपल्या प्रेमाचा साक्षी असलेला, मुंबईत आल्यावर जवळ घेणारा आणि त्यांच्या खिडकीतून दिसणारा हा समुद्र भाबड्या दाभाड्यांना आपला वाटतो, तर  त्यांच्या पत्नीला तो हिंस्र- सिंहासारखा आयाळ पसरलेला वाटतो. हा समुद्रच आता त्यांच्या मुळावर येतो. बिल्डरच्या मुलाला तो सी-फेस असलेलाच फ्लॅट हवा आहे. तीस वर्षापासून राहत असलेल्या घराशी भावनिक बंध जुळलेले असल्यामुळे दाभाड्यांना मात्र तो विकायचा नाही. पैशाने दाभाडे बधत नाही हे पाहून बिल्डर दुसरा मार्ग वापरतो.
            एका पहाटे दाभाडे यांच्या घरात एक वृद्ध जोडपे लिमयांचे घर विचारत त्यांच्या शिरतात. त्यांचा टॅक्सी ड्रायव्हर बिलाच्या पैशावरून वाद उकरून काढतो. दाभाडे मध्ये पडतात तेव्हा त्यांनाच घेरतात. ते प्रवासी नसून बिल्डरने पाठवलेले घुसखोर असतात. ते घर खाली करण्यासाठी दम देतात. दाभाडे पोलिसांना फोन करतात. पण तेही आधी टाळाटाळ करतात, उशिरा पोचतात. तोपर्यंत दाभाडे यांच्या घराचा पूर्ण ताबा घेतात. पुढे घडणाऱ्या अनेक घटनांतून लोकशाहीतील पोलीस, न्याय, संरक्षण, वैद्यक, प्रशासन, राजकीय व सामाजिक व्यवस्थांचा फोलपणा नाटककार आपल्या समोर मांडत जातो.
            दाभाडेंचा फ्लॅट मुळात त्यांच्या परदेशातील काकांचा आहे. त्यांच्याकडून काही लेखी कागदपत्र त्यांनी तयार करून घेतलेले नाही. फक्त सोसायटीच्या मेंटेनन्सच्या पावत्या त्यांच्याकडे असतात, त्याही ज्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये आहेत, त्यावर घुसखोरांनी सर्व समान रचून ठेवलेले असतात. उलट काकांनी फ्लॅट विकल्याचे कागदपत्र घुसखोरांजवळ असतात. त्यामुळे आतली खोली घुसखोरांना, बाहेरची दाभाडे यांना, तर संडास बाथरूम तासांच्या हिशेबाने कॉमन अशी घराची विभागणी करून इन्स्पेक्टर निघून जातो.
            बिल्डर दडपशाहीने त्यांच्या आजूबाजूचे फ्लॅट आधीच बळकावतो. त्यामुळे शेजारी दाभाड्यांना मदत करत नाही. सोसायटीचे सेक्रेटरी बाजी प्रभाकर देशपांडे त्यांच्या मदतीला येतात. ते दाभाड्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातात, तर मुख्यमंत्रीच हतबल असतात. ते म्हणतात, ‘शेवटी माणसाला किती जागा लागते? साडेतीन हात. आजच्या तारखेला तुम्हाला एक रूम आणि बाथरूम या शहरात मिळत असेल तर सफिशंट आहे...विकास दर दहा टक्क्यांवर न्यायचाय..(यासाठी) दाभाडे तुम्ही मला हवे आहात.’ (पृ. ५९-६०)
            या साऱ्यांमुळे वैतागून दाभाडे आपल्या लोकशाही व्यवस्थेवरच चिडतात. ते म्हणतात, ‘नष्ट करून टाका ती लोकशाही. ज्याला हवं ते करायची मुभा देते लोकशाही. गोंधळ घालते. मग त्यात सुमार लोकांना महत्त्व येतं आणि हुशार लोकांचा अपमान होतो...लोकशाहीतल्या निवडणुका म्हणजे मिडीऑक्रिटीचा धुडगूस...राज्यक्रांती झाली. मध्यमवर्गाला सत्तेत वाटा मिळाला. संपली क्रांती...गरिबांना स्वातंत्र्य नाही. गरिबांना समता नाही. गरिबांशी बंधुभाव?
शक्यच नाही. असा आप्पलपोटा मध्यमवर्ग बरोबर घेऊन जीडीपी दहा टक्के करायचाय आपल्याला?’ (पृ. ६०)
            जागतिकीकरणात लोकशाहीचे स्वरूप व सामान्यांना प्राप्त होणारे बकालपण ह्यावर कडवट भाष्य या संवादात येते. विकासाच्या व्याख्येबद्दलच इथे प्रश्न उपस्थित केला जात आहे. दाभाडे आधुनिक लोकशाहीची तत्त्वे आणि प्रत्यक्ष लोकशाहीचे स्वरूप यांची विसंगतीही दाखवून देतात आणि आधुनिकतेची उलटतपासणी घेतात. हे नाटक जागतिकीकरण या सामाजिक- सांस्कृतिक व्यवस्था यांवर उत्तर आधुनिक भाष्य करते.
            आधुनिकतेने समोर आणलेल्या तत्त्वज्ञानाच्या मर्यादा दाखवत नाटककार उत्तर आधुनिक मांडणी करू पाहतात. दाभाडे म्हणतात, पूर, भूकंप यांप्रमाणेच मर्डर, रायटस ह्या देखील नैसर्गिक आपत्तीच आहेत. जेव्हा बंटी अमेरिकेतील ९/११ चा दहशतवादी हल्ला निसर्गानेच घडवला का, असा उलट प्रश्न विचारतो; तेव्हा दाभाडे त्या कृतीची भावनाच कशी मूलभूत आहे ते सांगतात. ‘निसर्गानेच! माणसाच्या मेंदूतल्या नैसर्गिक भावनांनी. त्याला रेप्टाईल कॉप्लेक्स म्हणतात.’ (पृ. ११) हा रेप्टाईल कॉप्लेक्स मानवी मेंदूत उत्क्रांतीच्या टप्प्यात निर्माण होतो. अशाप्रकारे वरवर मानवी कृती वाटणारी हिंसक गोष्टही कशी नैसर्गिक आहे, ते दाभाडे सांगतात.
            जीवशास्त्र, उत्क्रांती व मनोविज्ञान यांच्या आधारे आधुनिक ज्ञान-संकल्पनाही दाभाडे नाकारत जातात. भालचंद्र नेमाडे जसे उपरोधाच्या पातळीवर आपल्या कादंबऱ्यात उत्क्रांती, मनोविज्ञान व पुरातत्वशास्त्र नाकारतात व मानववंशशास्त्राच्या आधारे मानवी वर्तन व संस्कृतीचा  शोध घेऊ पाहतात; तसेच जयंत पवारही मानवी वर्तन व संस्कृतीकडे मानववंशशास्त्राच्या नजरेतून पाहतात. दाभाडे म्हणतात, ‘तत्त्वज्ञानाचा जन्म भीतीतून होतो. त्यामुळे ज्याला मरणाची भीती वाटते त्याला मी तत्त्वज्ञान ऐकवतो.’ (पृ. ११) इथे तत्त्वज्ञानाच्या निर्मितीमागचे कारण सांगत, आपल्या संत परंपरेतील दया, क्षमा या मूल्यांचीही तपासणी केली जाते. दाभाडे म्हणतात, ‘दयामाया खरी नव्हेच. क्रोध, हिंसा, लढाया ह्याच खऱ्या. राग, लोभ, हेवा, मत्सर ह्या उपयुक्त गोष्टी आहेत. दुष्टपणा उपयुक्त नसता तर माणसाच्या उत्क्रांतीत तो नष्ट झाला नसता? नित्शे तर म्हणतो, माणूस उत्क्रांत होत जाताना हा दुष्ट्पणाच कामी येणाराय त्याच्या. (पृ.६२) उत्क्रांतीतही माणसाच्या हिंस्रता, दुष्टपणा या आदिम भावना टिकून राहिल्या, त्या मानवी सांस्कृतिक विकासात नष्ट झाल्या नाहीत; कारण त्या उपयुक्त व मूलभूत आहेत, असे दाभाडे म्हणतात.
            तेंडुलकर आणि एलकुंचवार हे नाटककार आपल्या नाटकांमधून हिंसा आणि लैंगिकता या मानवी भावनांचा शोध घेताना दिसतात. इथे जयंत पवारही हिंसा, क्रौर्य, घुसखोरी आणि आक्रमण या भावनांचे आदिमपण मानववंशशास्त्राच्या आधारे शोधू पाहत आहेत. दाभाडे म्हणतात, ‘माणूस घुसखोराय. घुसखोरीचाच इतिहासाय सगळा. घुसखोरीशिवाय प्रगती नाही...आम्हाला विकास पाहिजे. सदैव सैनिका पुढेच जायचे. गा. रेड इंडियनांच्या कत्तली करणाऱ्या कोलंबसाचे गर्वगीत गा. मला भूक लागलीय खारे शेंगदाणे द्या.’ (पृ. ७२) इथे मानवी इतिहास आणि संस्कृती यांवर भाष्य आहे. आधुनिकतेने औद्योगिक क्रांती म्हणजे हीच प्रगती असे सूत्र मांडले होते, त्याला उत्तर आधुनिकतेने छेद दिला आहे. म्हणूनच आदिवासींच्या, मूलनिवासींच्या कत्तली करून होणारा विकास उत्तर आधुनिकतेला मान्य नाही. आधुनिकतेत सामान्य माणसाला अन्न तर राहोच, साधे शेंगदाणेही मिळत नाही, हे लेखक सांगू पाहतो आहे. म्हणून आधुनिकता स्वीकारणाऱ्या कोलंबसाचे गर्वगीत गाणाऱ्या कवी कुसुमाग्रजांवर देखील इथे टीका येते. आधुनिकतेचा पुरस्कार करणाऱ्या अनेक कवी –लेखकांना आधुनिकतेच्या मर्यादा जाणवल्या नव्हत्या, त्या उत्तर आधुनिकतेमुळे पुढे आल्या आहेत.
            बंटी जेव्हा लोकशाही मार्गाने फ्लॅट मिळत नाही तेव्हा राडा करून मिळवू म्हणतो, तेव्हा दाभाडे त्याला हा मार्ग आपला नाही असे सांगतात. बंटी म्हणतो, ‘कधी उजाडणाराय पंधरा ऑगस्ट? इथे मुतायचं तरी आहे स्वातंत्र्य?’ इथे आधुनिकतेने प्रदान केलेल्या ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचीही तपासणी केली आहे. आधुनिकतेत मुठभरांना स्वातंत्र्य मिळते, समता व बंधुता तर गरिबांसाठी नाहीच, या आधुनिकतेच्या मर्यादा आहेत. तात्पर्य, उत्तर आधुनिकता मूल्यांना कमी मानत नाही, तर तिचे लाभार्थी कोण व्हावेत याची परखड चर्चा करते.
             भयामुळे दाभाडेंना थंडी वाजू लागते. तेव्हा त्यांना डॉक्टर थंडी वाजण्याचे दोन प्रकार सांगतात. ‘होमोइरेक्टस आणि होमो सेपियन. काहींचे दात कटकट. तर काहींचे टकटक वाजतात.’ ( पृ. ५१) होमो सेपियन व होमो इरेक्टस ही मानवाची आदिम अवस्था होती. या अवस्थेतील मानव शिकार करत असे. आदिम मानवाच्या काळातील ही हिंसा आणि भयाची जाणीव उत्क्रांती व सांस्कृतिक विकासातही नष्ट झाली नाही. हा जाणिवांचा शोध मानववंशशास्त्रीय आहे. ‘हिंदू’ मधील खंडेरावही, पुरातत्त्वशास्त्राच्या आधारे भौतिक संस्कृतीचा नव्हे तर तिच्यातील मानवी जाणिवांचा मानववंशशास्त्रीय शोध घेण्याचा आग्रह धरतो.     
            गुंड मुन्ना मारायची धमकी देतो तेव्हा दाभाडे म्हणतात, ‘म्हातारे कोतारे, आजारी पाजारी, लुळे पांगळे, भेकड वातड, पापभिरू, व्हाईट सेल्सची अॅक्यूट डेफिशिअन्सी असणारे, साऱ्यांची यादी तयार होतेय. सामर्थ्यवान राहिले पाहिजेत. ताकदवानांचा वंश टिकला पाहिजे, तरच मानवाची प्रगती होणाराय. कमजोरांनी मरून जावं, असा फतवा निघणाराय.’ (पृ. ६३) जागतिकीकरणाच्या लाटेत सामर्थ्यवान टिकतो, दुबळा नष्ट होतो, यावर हे भाष्य आहे. आदिम जमातीतही दुर्बलांना मारल्या जात असे, ही जाणीव आजच्या काळातही टिकून आहे. याला धर्माचाही आधार आहे. दाभाडे सांगतात, ‘दुबळ्या विस्थापितांनी बंड करून उठणं शास्त्रसंमत नाही. तसं झालंच तर सर्पसत्र आरंभून तक्षकागत त्यांना भस्मसात करण्याचा उपायही त्याच धर्मग्रंथात आहे...‘जगात दर दहा माणसांमागे एक बंदूक आहे आणि प्रत्येक माणसाला मारायला दोन गोळ्या अव्हेलेबल आहेत. (पृ. ६५) सबलांचीच सत्ता टिकवायची व त्या विरुद्ध बोलणाऱ्याला संपवायचे याचे तत्त्वज्ञान प्राचीन काळापासून कसे रूढ आहे, ते महाभारताचा संदर्भ देऊन, त्याला वर्तमान उदारीकरणाशी जोडून नाटककाराने सांगितले आहे. इथे प्राचीन संस्कृती, इतिहास व महाकाव्य यांवर उत्तर आधुनिक भाष्य केले आहे.      
            याच दृष्टीतून नाटककार भारतीय मध्यमवर्गीय माणसाचीही चिकित्सा करतो. मार्क्सने केलेल्या ‘मध्यमवर्गीय बुर्झ्वा’ या मांडणीपेक्षा वेगळा दृष्टीकोन इथे दिसतो. दाभाडे म्हणतात, ‘माणूस समोर आला की तोंड भरून हसायचं आणि निरोप घेताना हात जोडायचे. जातीय तणाव व धार्मिक तेढ ह्या बाबत न्युट्रल राहायचं. अंतर्यामी क्लीन असायचं आणि या देशाचा रिस्पेक्टेबल मिडलक्लास बनून जगायचं.’ (पृ. १२)      
            तीच वृत्ती मध्यमवर्गीय गृहिणीचीही. दाभाडेची बायको आपल्या आयुष्याबद्दल म्हणते, ‘रोज रात्री अंथरूणं घालायची आणि सकाळी काढायची. धुणी भांडी करून जाणाऱ्या बाईवर डाफरत सकाळ संध्याकाळ कुकर लावायचा नि टीव्हीवरच्या सिरीयलीत कौटुंबिक सुखाची वाफ करून टाकायची..साधी सुधी शिक्षिका नव्हते, मुख्याध्यापिका झाले असते. कुठून बुद्धी झाली नि घराच्या शाळेची शिपाईण झाले.’ (पृ.१४) इथे वृत्तीबरोबरच निवेदन-संवाद यांची शैलीही लक्षात घेण्याजोगी आहे, जी उत्तर आधुनिक आहे. ‘कौटुंबिक सुखाची वाफ’ ही प्रतिमा आधीच्या’ कुकर’प्रतिमेमुळे आली आहे.
            अशी शैली अनेक संवादात दिसते. उदा. दाभाडेची बायको म्हणते, ‘आयुष्याचं भिरभिरं झालं. ओचे वर करून लंगडी घालण्याच्या वयात चष्मा लावला. पोक काढून तांदूळ वेचले. उसने आईबाप घेऊन सख्या पोरांना जन्मास जन्माला घातलं. उसनेही गेले, सख्खेही गेले. मास्तरीण बनून ओळी आखल्या नि प्रत्येक चौकोनात विम्याचे हप्ते भरले. पण ओंजळीत कसलाच विश्वास राहिला नाही.’ (पृ. ६२-६३) आपले आयुष्य कसे वाया गेले हे सांगण्यासाठी वापरलेली शैली अन्योन्य आहे. कौटुंबिक असला तरी हा संवाद मधुसूदन कोल्हटकर-दारव्हेकर यांच्या नाटकांसारखा भावनाप्रधान नाही; किंवा गडकरी-कुसुमाग्रज यांच्या नाटकातील संवादासारखा शब्दशैलीप्रधान नाही; किंवा तेंडुलकर- एलकुंचवार यांच्यासारखा निव्वळ वास्तववादी नाही. ती काव्यात्म आहे, पण रोमँटिक नाही. ही उत्तर आधुनिक शैली आहे.
            नाटकात व्यक्तिरेखांच्या तीन पातळ्या दिसतात. एक मध्यमवर्गीय दाभाडेची. दुसरी दाभाडेच्या बायकोची- मध्यमवर्गीय स्त्रीची आणि येलमामे या गरीब माणसाची. हे तिघेही वेगवेगळ्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करताहेत. उत्तर आधुनिक काळात सुखवस्तू, प्रामाणिक, मध्यमवर्गीय माणसाचेही काही खरे नाही, हे दाभाड्यांच्या व्यक्तिरेखेतून कळते. इतरांचे लाईफ सिक्युअर करणाराच इनसिक्युअर होतो. तीच गोष्ट कशाळकर, पुसाळकर आदी निवृत्तांची. काहींनी पॉलिसी काढल्या तर त्या मॅच्युअर झाल्यावर त्यांच्या मुलांनी पैसे हडप केले. मुले परदेशात असल्यामुळे एकट्या-दुकट्या वृद्धांची गळा दाबून हत्या होण्याची भीती. त्यामुळे या माणसाना आता कशाची हमी नकोय, अशी आयुष्य असुरक्षित झाल्याची वेदना नाटकातून येते. आर्थिक उदारीकरणाच्या जगात व्हीआरएस-सेवानिवृत्ती घेतलेल्या स्त्रीचे-दाभाड्यांच्या बायकोला तर काहीच स्थान नाही. कारण तिला आर्थिक सत्ताच नाही. त्यामुळे ती मुलगी आणि मुलगा यांच्या आधारे जगू पाहते. शेवटी दाभाड्यांना सोडून भावाकडे जाते.
            बबन येलमामे हा उत्तर आधुनिक काळात जागतिकीकरणाच्या लाटेत उद्ध्वस्त झालेल्या ग्रामीण माणसाचा प्रतिनिधी आहे. बबन म्हणतो, ‘गावाकडं रोजगार हमी वं काम कराया मुकादमाच्या गांडीला सत्रांदा हात लावावा लागतू...हाय काय त्या भिकारड्या गावात? (पृ. १३) जागतिकीकरण आणि दुष्काळ अशा दोन्हीकडून होरपळलेला बबन मुंबईत आलाय तो विस्थापित म्हणूनच; तर इकडे शहरात जे प्रस्थापित मध्यमवर्गीय आहेत, ते दाभाडेही स्वत:च्याच घरात विस्थापित होताहेत. बायको - चिंगी मामाकडे निघून जाते. बंटी आता स्वत:च गुंड बनला आहे. बबनला कायम आसरा कुठेच मिळत नाही. त्याच्या झोपडपट्टीवर बुलडोझर फिरला जातो, त्याचे मूलही मरते. अशाप्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व उदारीकरणाच्या युगात सारेच कसे विस्थापित होताहेत, हे वास्तव नाटककार समोर आणतो.  
            आजची समाजव्यवस्था व राजकीय व्यवस्था बिल्डर-उद्योगपती-राजकारणी-पोलीस आणि गुंड यांच्या अभद्र युतीने कशी पोखरलेली आहे, हेही या नाटकात दिसते. दाभाडेंची सर्व माहिती बिल्डर मिळवतो, त्यांच्या उणिवा-कमजोरी हेरतो आणि घरात घुसखोरी करतो. त्यावर पोलीस काहीही करत नाही. त्यांना आधीच ‘केस काय’ हे माहित आहे. ते उलट बंटीलाच दहशतवादी ठरवतात. शेजारी-पाजारी तर बिल्डर-पोलीस यांच्या कायम दहशतीत आहेत. मुख्यामंत्र्याकडेही यावर उपाय नसतो. लोकशाही मार्गाने निवडून आलेला हा नेता देवालाच साकडे घालतो व विकासासाठी विस्थापनाचे समर्थन करतो. त्याला रुसो, आईनस्टाईन, नित्शे ही मंडळी माहित नाहीत, ती त्याला दहशतवादी वाटतात. लोकशाहीत ‘सामान्य माणसाला महत्त्व येतं आणि हुशार माणसाचा अपमान होतो’ असे म्हणतात, ते इथे खरे ठरते.  
             या व्यवस्थेत बिल्डर मात्र आपल्या यशाचे शिखर गाठत असतो. तो म्हणतो, की परप्रांतीय कामगार हेच माझ्या यशाचे रहस्य. ते युनियन करत नाही. त्यांना स्थानिक भाषा येत नाही. अत्यंत कष्ट करतात, त्यांच्या गर्भवती बायकाही बाळंत झाल्याच्या दहाव्या दिवशी कामावर हजर राहतात. ‘ऐसे णेक काम करणेवाले लोग सहर भेजानेवाला अकाल में समझता हूं के कुदरत की देण है.’ असे म्हणत तो आपला पुरस्कार ‘कुदरत’लाच अर्पण करतो. दुष्काळाच्या झळा सोसणारे कामगार; जागतिकीकरणाच्या काळात त्याच्या अस्तित्वाला काहीच किंमत नसते; त्यांच्याकडेही उपयुक्ततावादी दृष्टीनेच पहिले जातात. म्हणूनच जोपर्यंत मुन्ना दाभाडेंना धमकावत राहतो, तोपर्यंत तो कामाचा व ज्या दिवशी तो दाभाडेबद्दल सहानुभूती दाखवतो, त्यादिवशी गुंड त्याला गोळी मारतात. त्यामुळे दया-सहानुभूती मूल्यापेक्षा उपयुक्तता हेच मूल्य या बाजारू जगात महत्त्वाचे ठरते.
            या नाटकात वास्तवाच्याही चार पातळ्या आहेत. एक, लेखक-निवेदकगत वास्तव. दोन, प्रत्यक्ष सामाजिक सांस्कृतिक वास्तव आणि तीन, बिल्डर - राजकारणी यांचे वास्तव. चार, गुंडांचे वास्तव. पहिले वास्तव आदर्श आहे, किमान लेखकाला स्वातंत्र्य आहे, असे आपण आधुनिकतेत मानत होतो; उत्तर आधुनिकतेत तेही कसे नाही हे जयंत पवार दाखवून देतात. नाटकाचा निवेदक हा लेखकच आहे; बिल्डरचे बिग स्क्रीन वरील अवार्ड फंक्शनचे थेट  प्रक्षेपण पाहून इतरांना ‘हे बघू नका’ अशी त्याची विनवणी कोणी ऐकत नाही. कारण ‘फुकट मिळालं की काहीही बघायची सवय असलेला’ हा समाज; त्याला ‘दाभाडेंची सेन्सिबल स्टोरी’ नकोच आहे. टीव्हीवाल्यांनाही या स्टोरीमुळे टीआरपी खाली येईल अशी भीती वाटते, त्यामुळे तेही ही कथा नाकारतात आणि तो थेट प्रेक्षकांनाच स्टोरी सांगतो.
            प्रत्यक्ष सामाजिक वास्तवात तर डेंजर वारा सुटलाय. कोणी कुठेही घुसून कोणावरही आक्रमण करतो. कुणाच्याही झोपडपट्टीवर बुलडोझर फिरतो, कुणालाही घरातून हाकलल्या जाते. ‘जगा आणि जगू द्या’ असे म्हणणाऱ्या बुद्धाच्या भूमीत ‘मरा आणि मरू द्या’ अशी श्लोगन सोडली जाते. कुणाचाही कधीही खून होतो आणि भाईची माणसे जबरदस्तीने दुकाने बंद करून ‘शांततामय मार्गाने बंद पाळण्या’साठी धमकावतात. मग ‘सावल्या हरवलेली माणसं’ या शहरात पोरकी बेरकी’ होतात.
            तिसरे हाय क्लासवाल्यांचे वास्तव. हे बिल्डर, राजकारणी, अधिकारी यांचे कायम सेलिब्रेशनचे जग. नाटकाच्या प्रारंभीच बिल्डररत्न अवार्ड कार्यक्रम सुरू आहे. त्यात ‘झुमेंगे, नाचेंगे आणि गायेंगे और पुरस्कारोंकी बौछार करेंगे’ असे वातावरण. या सोहळ्याला कोणाची उपस्थिती? तर ‘एमिनंट पर्सनलिटीज अँड सेलिब्रिटीज फ्रॉम पोलिटिक्स, बिझनेस, कार्पोरेट वल्र्ड, अॅडमिनिस्ट्रेशन, फिल्म-टीव्ही अँड फॅशन वल्र्ड’ क्षेत्रातील. सामान्य माणसाला तर या जगात प्रवेशच नाही. जो शिरू पाहतो त्याला सिक्युरिटी ऑफिसर हाकलून लावतो. यातून नव्वदोत्तरी  भारत आणि इंडिया अशी सामजिक विभागणी पुढे येते.
            चौथे वास्तव हे गुंडांचे. महानगरात बेरोजगारीमुळे येणाऱ्या परप्रांतीय लोकांना याही जगात प्रवेश मिळतो. एक ग्रामीण भागातील विस्थापित बबन; तर दुसरे बिहार उत्तर प्रदेश मधून येणारे विस्थापित परप्रांतीय. पैशासाठी सुपारी घेणारे. पण त्यांचेही प्रश्न आहेच. ठरलेले पैसे मिळत नाही. त्यातल्या एकाला तर पैसे नको, पण मुंबईत घर हवंय. मुन्नाची बायको प्रेग्नंट असल्यामुळे त्याला आता दाभाड्यांना मारवत नाही. त्याला सेटल व्हायचे आहे; पण ज्या धंद्यात ते उतरले आहे त्यातून बाहेर पडणे शक्य नाही. शेवटी सहकारीच त्याला गोळी घालून ठार मारतात.
            शेवटी दाभाडे दु:खाला सहन करण्याचे खालील जिब्रानचे तत्त्वज्ञान स्वीकारतात- ‘दु:ख आणि आनंद ह्या अविभाज्य गोष्टी आहेत. जेव्हा त्यांच्यापैकी एकजण एकटाच तुमच्याबरोबर जेव्हा त्यांच्यापैकी एकजण एकटाच तुमच्याबरोबर जेवायला येऊन बसतो ना, तेव्हा दुसरा तुमच्या अंथरुणावर झोपलेला असतो’ (पृ. ४६) असे मानतात.
            तत्त्वज्ञान जीवनाचे आकलन करण्यास मदत करते, जीवनाचा स्वीकार कसा करावा याची दृष्टी देते, मात्र  प्रत्यक्ष जीवन जगण्यास व जगण्याचे प्रश्न सोडवण्यास कामी येत नाही याचे सूचनही हे नाटक करते. त्यामुळेच श्रेष्ठ तत्त्वज्ञान मानणाऱ्या सत्यविजय नाव असलेल्या नायकाचा नाटकाच्या शेवटी पराजय होतो. त्यांच्या मेंदूवर परिणाम होऊन त्यांचा अंत होतो. सर्व कलावंत त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात व नाटक संपते.
             हे नाटक वर्तमान जगण्याची एक अस्वस्थ जाणीव करून देते. आपल्या भोवतालचा समाज व सर्व आधुनिक व्यवस्था असून आपल्या कामाच्या नाहीत. त्या आपल्याला एकटे पडत आहेत. या उत्तर आधुनिक समाजात समूहजीवन तर जाऊ द्या, सहजीवनही जगता येत नाही. आधुनिकतेत समाजाचे व त्यातील कुटुंबाचे विघटन झाले होते, उत्तर आधुनिक्तेत व्यक्ती व तिचे व्यक्तित्व यांचे विघटन होत आहे. या काळात मूल्ये, परंपरा, तत्त्वज्ञान, वारसा, भूमिका काहींही कामी येत नाही. एकटेपणा व एकाकीपणा हेच या युगातील मानवाचे प्राक्तन आहे. सर्व व्यवस्था या बाजारू जगात आर्थिकतेच्या दावणीला बांधलेल्या आहेत. त्यामुळे प्रचलित व्यवस्था व प्रचलित मूल्ये यांच्याही विघटनाचे भयचकित करणारे उत्तर आधुनिक दर्शन हे नाटक आपल्याला घडवत जाते.   
अभ्यास साधने
§  ग्रंथ   
          गणोरकर, प्रभा, डहाके, वसंत
आबाजी आणि इतर, २००१           : संज्ञा-संकल्पना कोश, मुंबई, ग. रा. भटकळ फाउंडेशन
          जाधव, मनोहर, २००१                  : समीक्षेतील नव्या संकल्पना, (संपा) औरंगाबाद, स्वरूप प्रकाशन,
          पवार जयंत, २०११                       : काय य डेंजर वारा सुटलाय, मुंबई, मौज प्रकाशन
          मालशे, मिलिंद, जोशी अशोक, २००७ : आधुनिक समीक्षा सिद्धांत, मुंबई, मौज प्रकाशन
          रायकर सीताराम, १९९०                : वाङ्मयीन वाद: संकल्पना व स्वरूप, (संपा), पुणे, मेहता पब्लिशिंग
§  नियतकालिके
· जावरे अनिकेत, २०००, ए-मे-जून : साहित्य उत्तर आधुनिकतावाद, एक संक्षिप्त परिचय, औरंगाबाद, अभिव्यक्ती
·       जोशी, अ. कृ., २००५, फेब्रु            : उत्तर आधुनिकतावाद, वाई, नवभारत
·       डहाके, वसंत आबाजी, २०००,ए-मे-जून : उत्तर आधुनिकतावाद आणि उत्तरवसाहतवाद, औरंगाबाद, अभिव्यक्ती                                                                            
·       रंगराव, बी., २०१३, ऑनोडि  : आधुनिकता/ उत्तर आधुनिकता, अमरावती, सर्वधारा

·         डॉ. देवानंद सोनटक्के | पंढरपूर | २० ऑक्टो २०१६
--------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी : युगवाणी, २०१६, नाटक विशेषांक, (संपा) अनिल नितनवरे., विदर्भ साहित्य संघ, नागपूर
              : समीक्षेची अपरूपे, हर्मिस प्रकाशन, पुणे, २०१७

No comments:

Post a Comment

द. भि. : सहवासाचे जंतरमन्तर : डॉ. देवानंद सोनटक्के

  दभि : सहवासाचे जंतरमंतर :    डॉ.   देवानंद सोनटक्के वर्ष १९९६. त्यावेळी मी एम . ए . साठी नागपूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये मराठी विभागात...