Wednesday, May 6, 2020

नव्वदोत्तरी कविता : समकालीन सामाजिक- सांस्कृतिक वास्तवाचा वाङ्मयीन लेखालोखा


नव्वदोत्तरी कवितेत मात्र या बांधिलकी आणि व्यक्तित्व यांना टाळून कविता समोर आल्याचे दिसते. त्याचे कारण उत्तरआधुनिकतेत या दोन्ही मूल्यांना महत्त्व राहिले नाही. उत्तरआधुनिक तत्वज्ञान आधीच्या सर्व तत्त्वज्ञानाचा आणि मूल्यांचा अंत (death) घडवून आणते आहे. त्यामुळे आधुनिकतेत समाजाचे विघटन घडून आले तर उत्तरआधुनिकतेत व्यक्तित्त्वाचे विघटन घडून आले आहे. 

---------------------------------------------------------------
एक नागरिक म्हणून कवी व सामान्य माणूस यात काही भेद नसतोच. सुख-दु:खे, समस्या, व्यथा वेदना, प्रपंच हे नागरिक व कवी दोघांनाही लागू असते. नागरिक म्हणून दोघांचे अनुभवही सारखेच असतात. मात्र कवीजवळ दोन गोष्टी सामान्य माणसांपेक्षा जास्त असतात : संवेदनशीलता आणि प्रतिभा. 
या दोन शक्तीमुळे त्याची जाणीव वेगळी ठरते आणि त्याच्या अनुभवाची प्रतही बदलते. ज्ञानेंद्रिये व त्यांच्या संवेदना आणि मन व भावना यांच्या तीव्रतेमुळे कवीला जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची क्षमता  प्राप्त होते. त्याला विचारसरणीची, तात्त्विक भूमिकेची, चिंतनाची जेव्हा जोड लाभते. त्तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा एक असामान्य दृष्टिकोन कवीला प्राप्त होतो. तात्पर्य, संवेदना-भावना व विचार यांच्यामुळे कवीला येणाऱ्या अनुभवाचे स्वरूप सामान्य नागरिकांना येणाऱ्या अनुभवापेक्षा भिन्न असते.
कवीच्या बाबतीत नुसता अनुभवच नव्हे, तर त्या अनुभवाचे भाषिक प्रकटीकरण देखील भिन्न असते. कारण कवीजवळ असलेली दुसरी शक्ती, प्रतिभा; ही त्याच्या या आविष्काराला अन्योन्य रूप देत असते. ही प्रतिभा सर्जनशील भाषिक प्रकटीकरण करत असल्यामुळे कवीचा अनुभव व त्याचा भाषिक आविष्कार हा सामान्य नागरिकापेक्षा भिन्न असतो. त्याच्या भाषिक सर्जनाची नोंद घ्यावी लागते ते यामुळेच. म्हणजे कवी आपली सभोवतालच्या वास्तवाकडे भावना-संवेदनशीलतेने पाहत असतो. त्याचे आपल्या मूल्यदृष्टीने विश्लेषण करत असतो. प्रातिभ शक्तीने सर्जनशील भाष्य करतो. याच्या जोडीला कवीचेही अनन्य व्यक्तिमत्त्व असल्याने, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंबही कवितेत पडत असते.           
कवितापूर्व स्थिती अशी असते.
कवितेची निर्मितीसुद्धा एक जिवंत व सेंद्रिय प्रक्रिया असते. म्हणून तिचे रूप स्थिर नसते व   आस्वाद एकच एक नसतो. त्याला कारण तिची ही निर्मितिप्रक्रिया असते. तिच्यामुळे कवितेच्या आशयात नावीन्य  व रूपात सौंदर्य प्रकटत असते. यामुळे कवितेतील समाजाचे दर्शन असे अन्योन्य असते.
कवितेचे स्वरूप असे असते.
वाचक वास्तवाच्या अशा अन्योन्य आकलनासाठीच कविता वाचत असतो. त्याचवेळी तो कवितेच्या या निर्मितिप्रक्रियेतही कळत-नकळत सहभागी होत असतो. त्याचेही जीवनभान, आकलन व व्यक्तिमत्त्व या आस्वादाच्या प्रकियेत सहभागी होत असते; म्हणून त्याचा आस्वादही अन्योन्य होत जातो. वाचक, त्याचे व्यक्तिमत्त्व, त्याची रसिकता, त्याची अभिरुची, त्याच्यावरील वाङ्मयीन संस्कार यांसह कवितेला सामोरा जात असल्याने त्याचा काव्यानुभव मुळातील कवितेला अधिक समृद्ध आणि अधिक व्यापक करीत असतो.
कवितेचा आस्वाद असा असतो.
अशाप्रकारे निर्मिती, अस्तित्व आणि आस्वाद अशा तीन प्रक्रियांतून कविता जात असल्यामुळे दरवेळी तिचे रूप बदलत, विकसित होत असते; ती वाचकाला दरवेळी भिन्न भिन्न आस्वाद देत असते.
समीक्षा अशा आस्वादोत्तर अनुभवाचे विश्लेषण करीत असते. समीक्षेचे वाचन करणाऱ्या तटस्थ वाचकाला; त्या विवेचनातून कवीचे व्यक्तिमत्त्व, कवितेचे स्वरूप, आस्वादकाची अभिरुची; कवितेच्या  सामाजिक आशयातून समाज-संस्कृती, तिच्यातील मानवी क्रिया-प्रतिक्रिया, घटना व मानवी इतिहास-- यांचा अर्क गवसत असतो. त्यालाच समीक्षेच्या परिभाषेत ‘आशयसूत्रे’ म्हणतात. ही आशयसूत्रे समाजाचा वाङ्मयीन लेखाजोखाच असतो. म्हणून साहित्यप्रकाराचा कालखंडनिष्ठ व साहित्यप्रकारनिष्ठ आढावा घेणे गरजेचे असते.  
‘सर्वधारा’चा ‘नव्वदोत्तरी काव्य विशेषांक’ हा असाच कालखंडनिष्ठ व साहित्यप्रकारनिष्ठ आढावा होय. त्यातीलआशयसूत्रांच्या आधारे आपण समकालाविषयी, कवी आणि कवितांविषयी काही अंदाज बंधू शकतो. त्यातून आपल्या सामाजिक- सांस्कृतिक आकलनात भरच पडते.
या अंकात ‘नव्वदोत्तर कवितेची सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी’ (प्रवीण बांदेकर), ‘नव्वदोत्तरी मराठी कविता : बदलत्या वास्तवाची वाङ्मयीन प्रतिक्रिया’ (सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत), ‘नव्वदोत्तर महानगरी कविता’ (दा. गो. काळे ), ‘नव्वदोत्तरी ग्रामीण कविता’ (केशव सखाराम देशमुख), ‘नव्वदोत्तरी स्त्रीवादी काव्य’ (नीलिमा गुंडी), ‘नव्वदोत्तरी मराठी आदिवासी कविता’ ( विनोद कुमरे), ‘नव्वदोत्तरी आंबेडकरवादी कविता’ (भूषण रामटेके) असे सात लेख अत्यंत मौलिक निरीक्षणे नोंदवणारे व विश्लेषण करणारे आहेत.
हे सर्व लेखक वेगवेगळ्या वाङ्मयीन प्रवाहाशी संबंधित असलेले, वेगवेगळ्या प्रादेशिक गटातील व वयोगटातील, वेगवेगळ्या सामाजिक-सांस्कृतिक प्रांतातील अभ्यासू, व्यासंगी आणि स्वत: कवीही आहेत. तरीही ते ज्या साहित्यप्रवाहाशी व साहित्यप्रकाराशी (कविता) संबंधित आहेत, त्याची भलावण न करता अत्यंत तटस्थपणे, मार्मिक निरीक्षणे आणि परखड मते नोंदवत; या काव्यातील आशयसूत्रे, त्यांची भाषिक वैशिष्ट्ये आणि प्रवाहाच्या-कवीच्या मर्यादासुद्धा त्यांनी सांगितल्या आहेत. त्या मर्यादांमागील कविनिर्मित, सामाजिक-सांस्कृतिक व वाङ्मयीन अशा कारणांची मीमांसाही केली आहे.
१९९० नंतरच्या काव्याविषयी अशी एकत्रित व मौलिक नोंद उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे व प्रमुख संपादक सुखदेव ढाणके यांचे विशेष आभार मानतो. या लेखांमधील निरीक्षणे नुसते वाचक, नागरिक यांनाच नव्हे तर समकाळात लिहिते असणाऱ्या कवींनाही नवे भान देणारे आणि त्यांची जबाबदारी अधोरेखित करणारे आहेत. आपल्या समकालाविषयी भांबावलेल्या नागरिकांनाही यांतून आपला समकाल व त्याचे सामाजिक-सांस्कृतिक स्वरूप, पेच व त्यामागील कारणे यांचा वेध घेता येणार आहे. आपल्या भोवताल समाजात काय घडते आहे, का घडते आहे ही माहिती वाचकाला; तर अशा घडत्या इतिहासाची वाळू कशी घट्टपणे पकडून आपल्या कवितेतून साकारायची याची कवींना प्रेरणा मिळणार आहे.
कविता ही एका वाङ्मयीन परंपरेत जशी निर्माण होते, तशी ती एका सामाजिक-सांस्कृतिक परंपरेतही निर्माण होत असते. त्यामुळे ती एका बाजूने वाङ्मयीन परंपरेचा वारसदार असते आणि या अर्थाने तिचा शोध म्हणजे कवितेचा उभा छेद असतो; तर दुसऱ्या बाजूने ही समकालावरचे भाष्य असते आणि या अर्थाने तिचा शोध म्हणजे कवितेचा आडवा छेद असते. समीक्षेला हे दोन्ही ताणेबाणे समजून घ्यावे लागते. जे या लेखांमधून नीटपणे उलगडल्या गेले आहे.
             कवी प्रवीण बांदेकर यांनी आपल्या लेखातून नव्वदोत्तरी कवितेची सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी मांडली आहे. ही पार्श्वभूमी जागतिकीकरणाची असून जागतिकीकरणामुळे सांस्कृतिक सपाटीकरण होण्याची प्रक्रिया कशी घडते आहे; त्यावर खास आपल्या सांस्कृतिक घटिते, मूल्यव्यवस्था, भाषा, कवितेची रचनातंत्रे यांची गरज (देशीयता) बोलून दाखवली आहे. त्यांना जागतिकीकरण आपल्या सांस्कृतिक जीवनावरील आक्रमण वाटत असून त्याच्यामुळे सत्ताकांक्षा, न-नैतिक राजकारण, त्यातून निर्माण होणारे अराजक, मूलतत्त्ववाद, आपल्या भूप्रदेशाची भाषा-संस्कृती इत्यादी अस्तित्वाची अनिश्चितता वाढत गेली आहे. या पार्श्वभूमीवर नव्वदोत्तरी कविता सामोरे आली आहे. ऐंशीच्या दशकातील कवींना क्वचितच असणारे ‘राजकीय भान’ मात्र या नव्वदोत्तरी कवींना असल्याचे आणि हे भान विशिष्ट विचारसरणीशी बांधिलकी न जोपासल्यामुळे अधिक व्यापक झाल्याचे सूचनही त्यांनी केले आहे.
            साठोत्तरी कवींना हे भान तुलनेने कमी आहे. ही कविता बांधिलकीबाबत जास्त बोलत होती. याचा अर्थ या कवींनी ‘आंधळी बांधिलकी’ जोपासल्यामुळे त्यांच्या कवितेतील राजकीय भान धूसर झाले असे मानण्यास जागा आहे. मराठीत १९६०च्या दशकाच्या उत्तरार्धात सामाजिक बांधिलकीचा विषय पुढे आला. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती; साहित्यप्रवाह आणि साहित्यनिर्मिती यात प्रचंड उलथापालथ होत होती. त्याचे वर्णन रा. ग. जाधव यांनी केले आहे: “आर्थिक विषमता, सामाजिक अन्याय, आंधळे व एकांगी कायदेकानू व त्यांचे तशाच जातीचे न्यायालयीन निष्कर्ष, नवजागृत सामाजिक वर्गाची सांस्कृतिक अस्मिता, विविध आर्थिक गटांच्या विषम आर्थिक सत्ता, विद्रोहाच्या जाणिवा, परंपरागत संस्था व रितीरिवाजांचे वांझोटे अस्तित्व, यांसारख्या कारणांनी रूढ सामाजिक व्यवस्था बाद करून समग्र क्रांतीची आवश्यकता निर्माण झाली.” (रा. ग. जाधव: १९८५ :७४) या समग्र क्रांतीच्या गरजेपोटी ही बांधिलकीचा आग्रह धरण्यात आला होता. ती तत्कालीन महाराष्ट्राची गरज होती.
            मात्र, बांधिलकीच्या विशिष्ट विचारप्रणालीशी बद्ध झाल्यामुळे, ‘कवीला ‘माणूस’ तत्त्वापेक्षा कामगार, दलित, शेतकरी अशी आवरणे महत्वाची वाटू लागतात. त्याची निष्ठा कर्मठ होत जाते. व्यक्तिमत्त्वाचा लवचिकपणा कमी होतो. तो विशिष्ट ज्या पंथ व पक्षाला बांधील असतो त्या विचारसरणीच्या साच्यातच त्याला आपले अनुभव बसवावे लागतात. कालांतराने त्याची अनुभवसरिता आटून जाते. आंधळ्या बांधिलकीचा असा धोका असतो. अशा बांधिलकीमुळे विषयाला महत्त्व प्राप्त होते, अनुभव व त्याची अर्थपूर्णता विचारात घेतली जात नाही.(म. सु. पाटील:२००१: ७६) हा धोकाही असतो. ही साठोत्तरी कवितेची  मर्यादा होती, जी नव्वदोत्तरी कवितेने ओलांडली आहे असे दिसते.
            साठच्या दशकात चळवळीच्या कप्प्यातच आपली प्रतिभा आणि निर्मिती कोंबावी लागत होती. आता चळवळी व विचारसरणी यांचा प्रभाव ओसरल्याने त्यांच्या बाबतचे तटस्थ भान आले आहे. उदा. लोकनाथ यशवंत, राम दुतोंडे, अरुण काळे आदी कवींनी दलित चळवळीचा ओसरलेला बहर याबद्दल भाष्य आणि त्यातील वाढता राजकीय स्वार्थ यांवर प्रहार केल्याचे दिसते. त्यामुळे म. सु. पाटील यांनी सांगितलेल्या आंधळ्या बांधिलकीच्या मर्यादातून हे नवे कवी मुक्त झाल्याची नोंद बांदेकरांनी केली आहे.
            बांदेकरांच्या लेखात ‘कवीचे व्यक्तिमत्त्व’ या महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार येतो. नव्वदोत्तरी काळात ‘कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा लोप’ झाल्याचे त्यांना जाणवते. परिणामी ‘एकेका कवीचा, त्याच्या आशयाचा, शैलीचा विचार’ स्वतंत्रपणे करता येत नाही; उलट ‘संपूर्ण पिढीच्या कवितेचा, पिढीच्या युगशैलीचा विचार करावा लागतो’. अनेक नव्वदोत्तरी कविता सारख्याच वाटतात, त्याचेही कारण हेच होय.
            असेच निरीक्षण दा. गो. काळे यांनीही नोंदवले आहे. नव्वदोत्तरी महानगरी कविता ‘वेगवेगळ्या संचितातून आलेल्या विविध मानवी समूहाचा कोलाज’ आहे, असे ते म्हणतात. त्याचेही कारण कवीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व कवितेतून उमटत नाही, हेच होय. ‘जागतिकीकरणातून आलेल्या एकसुरी, एकखिडकी चकचकाटामुळे मानवी अस्तित्त्वाचा, त्याच्या असण्याचा लोप होतो.’ हे कारण त्यांनी सांगितले आहे. मुळात हे कवीच्या व्यक्तित्त्वाचे विघटन होय.
            व्यक्तित्त्वाचे विघटन ही खरे तर उत्तर आधुनिकतेची प्रक्रिया आहे. ‘जीवन हे अस्थिर, सतत बदलणारे, प्रवाहाच्या स्वरूपाचे, तुकड्यातुकड्यांनी बनलेले आणि विरोधाभासांनी युक्त आहे; वास्तव हे बुद्धिगम्य नसून व्यक्तिनिष्ठ, मनोनिष्ठ, अंतर्गत, सापेक्ष स्वरूपाचे आहे,’ या जाणिवेला दुसऱ्या महायुद्धामुळे या अधिक वेग आला. युरोपात सामाजिक व सांस्कृतिक जीवनात आधुनिकतावादामुळे अस्थिरता, दुभंगलेपणा निर्माण होऊन ‘स्व’ विघटन घडून आले आहे. (मिलिंद मालशे- अशोक जोशी: २००७: २६)
            आपल्याकडे आधुनिकतेची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कवीच्या व्यक्तित्त्वाचा आग्रह पहिल्यांदा केशवसुतांनी आपल्या काव्यात धरला. कवीचे स्वातंत्र्य, कवीचे व्यक्तिमत्व, कवीचे सामाजिक उत्तरदायित्व आणि सामाजिक बांधिलकी हे केशवसुत संप्रदायाचे वैशिष्ट्य डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी नोंदवले होते. (दोन परंपरा, विजय प्रकाशन, नागपूर) तात्पर्य आधुनिक कवितेत बांधिलकी आणि कवीच्या व्यक्तित्त्वाचा आग्रह होता. तो साठ्पर्यंतच्या मराठी कवितेपर्यंत दिसून येतो. कवीच्या व्यक्तित्वाला महत्त्व देणारा गोविंदाग्रज-बालकवी-मर्ढेकर-चित्रे-कोलटकर असा एक; तर बांधिलकी मानणारा केशवसुत-मुक्तिबोध-सुर्वे-ढसाळ असा दुसरा प्रवाह मराठीत दिसतो. त्यांना मुक्तिबोधांनी व्यक्तिवादी-संरचनाप्रधान, निराशावादी परंपरा व दुसरी आशयवादी परंपरा असे संबोधले होते. (प्रस्तावना, नवी मळवाट)
            नव्वदोत्तरी कवितेत मात्र या बांधिलकी आणि व्यक्तित्व यांना टाळून कविता समोर आल्याचे दिसते. त्याचे कारण उत्तरआधुनिकतेत या दोन्ही मूल्यांना महत्त्व राहिले नाही. उत्तरआधुनिक तत्वज्ञान आधीच्या सर्व तत्त्वज्ञानाचा आणि मूल्यांचा अंत (death) घडवून आणते आहे. त्यामुळे आधुनिकतेत समाजाचे विघटन घडून आले तर उत्तरआधुनिकतेत व्यक्तित्त्वाचे विघटन घडून आले आहे.
            फ्रेंच लेखक रोलाँ बार्थ याने ‘लेखकाचा अंत’ ही संज्ञा मांडली आहे. आधुनिक काळात, लेखक हा पिता व लेखन त्याचे अपत्य मानले जात होते. साहित्याच्या केंद्रस्थानी लेखक व त्याचे व्यक्तित्व असायचे. फ्रेंच कवी मलार्मे याने लेखकाच्या जागी भाषेला केंद्रस्थानी आणले. बार्थने लेखकाची सर्वसाक्षी व सर्वव्यापी उपस्थिती नाकारत वाचकाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. वाचकाने संहितेचे सर्व धागेदोरे धरून ठेवलेले असतात, वाचकाचा जन्मच मुळी लेखकाच्या अंतातून होतो, अशी त्याची संकल्पना आहे. (संज्ञा –संकल्पना कोश, २८६)
            तात्पर्य कवीच्या व्यक्तित्वाचे विघटन म्हणजे लेखकाचा अंत ही प्रक्रिया नव्वदोत्तरी कवितेत प्रकटली असून ती उत्तरआधुनिक आहे. या मराठी कवितेची वाटचाल उत्तरआधुनिकतेकडे होऊ लागली आहे. मात्र मराठी समीक्षा अजूनही त्या अर्थाने काव्याकडे पाहताना दिसत नाही. मिलिंद मालशे- अशोक जोशी, हरिश्चंद्र थोरात, वसंत आबाजी डहाके यांनी सैद्धांतिक तर वसंत आबाजी डहाके, दा. गो. काळे, विश्राम गुप्ते, इत्यादी मोजके समीक्षक काव्याची उत्तरआधुनिक समीक्षा करत आहेत.
             बांधिलकी आणि व्यकित्वाचे विघटन ही गोष्ट चांगली की वाईट हा प्रश्नदेखील सापेक्ष ठरेल इतकी वेगाने ती प्रक्रिया घडत आहे. कारण जग हे मोठे खेडे मानले की प्रदेशनिष्ठ व विशिष्ट काही उरत नाही. तसे विशिष्ट शिल्लक राहिल्यास एकच वस्तू सर्वत्र कशी विकता येईल? प्रत्येक प्रदेशाचा पेहराव व खानपान यांत विविधता राहिली तर कंपन्यांना जगभर पिझ्झा-बर्गर आणि जीन्स व टी-शर्ट कसे विकता येतील? म्हणून या सपाटीकरणाच्या प्रक्रियेला सारेच बळी पडत आहेत. ही विशिष्टतेच्या लोपाची प्रक्रिया आधी आर्थिक मग सामाजिक- सांस्कृतिक आणि आता वाङ्मयीन बनली आहे. बांधिलकी आणि व्यकित्वाचे विघटन हा त्याचाच परिणाम आहे.
            या विघटनाच्या व सपाटीकरणाच्या विरुद्धची प्रतिक्रिया म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व जोपासण्याची तीव्र धडपड समाजात दिसते आहे. त्याला अस्मितेच्या राजकारणाचे स्वरूप देण्यात येऊन आपली जुनी मूल्ये जोरकसपणे पुढे आणण्याचा प्रयत्न काहीजण करताहेत. हे निरीक्षणही बांदेकर यांनी नोंदवले आहे. या पुनरुज्जीवनाचे दुष्परिणाम हे सत्यपालसिंग राजपूत यांच्या लेखात दिसतात. आपल्या सांस्कृतिक अस्मितेच्या नावाखाली हा पुनरुज्जीवनवाद, मूलतत्त्ववाद समोर येतो आहे. संभ्रमित समाज पुन्हा बाबा-धार्मिक गुरु त्यांचे हायटेक पंथ याकडे वळताना दिसतो. मंदिर बांधण्यासाठी आक्रमक होतो आहे. जातवार संमेलने व मोर्चे हे त्याचेच निदर्शक होय. याचीही दखल नव्वदोत्तरी कवी घेताना दिसत आहेत, असे निरीक्षण राजपूत यांनी मांडले आहे.  
          सामाजिक मूल्यविहिनता या नव्वदोत्तरी कवितेच्या विशेषाकडे बांदेकरांनी लक्ष वेधले आहे. बाजारकेंद्री व्यवस्थेमुळे जगण्याचा प्रचंड संभ्रम आणि त्यातून कसलीही सामाजिक भूमिका नसणे ही प्रक्रिया घडून आली आली आहे. मात्र बांदेकरांच्या मते, ‘कसलीही भूमिका न घेता सुद्धा’ ही कविता सामाजिक व सांस्कृतिक संदर्भाला सामोरे जाते. याचा दुसरा अर्थ असा की, प्रचारी व घोषवाक्यात्मक बांधिलकीपेक्षा सामाजिक संवेदना व सामाजिक जाणीवच काव्यासाठी अधिक गरजेची आहे असे दिसते.
          सत्यपालसिंग राजपूत यांच्या लेखातून, ‘नव्वदोत्तर’ (Post- Ninety) ही संकल्पना जगभरातील ज्ञानशाखांत बदलती आर्थिक व्यवस्था म्हणून ‘कालिक विभाजनाची रेषा’ मानल्याचे व  ही जागतिकीकरणाची आर्थिक व्यवस्था बाजारू मूल्यांमुळे उत्तम नागरिकाचे रूपांतर चंगळवादी ग्राहकात करत आहे. हा कालखंड माणसाचे वस्तूकरण (commodification) घडवून आणणारा असून, त्यामुळे आपले सांस्कृतिक संचित नष्ट झाल्याची भावना या नव्वदोत्तरी कवितेतून तीव्रतेने येते. विशेष म्हणजे या कवितेने निसर्गाशी सहवेदना जपली असून जंगलतोड, प्रदूषण व पर्यावरण ऱ्हास याबद्दल ती बोलते आहे. तसेच ही कविता प्रेम, द्वेष, सुख, समाधान, अश्वस्थता, परात्मता, आत्मशोध, स्व-विश्व संबंधाचा शोध, वासना, भ्रमनिरास अशा सनातन मानवी जाणिवांचे पुन:प्रकटीकरण करते, असे निरीक्षण नोंदवले आहे.
          ‘नव्वदोत्तर महानगरी कविता’ या लेखातून दा. गो काळे यांनी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील महानगरी कवितेचा शोध घेतला आहे. बाजाराचे केंद्र महानगर आणि बाजार क्रांतीचा पहिला ग्राहक महानगरी माणूस, त्याचे उत्तरआधुनिक जग ओलांडून बाजारशरण होणे, त्यातून मूल्यहीनता आणि भयाचे सावट, संचारक्रांती अशा पार्श्वभूमीची चर्चा केली आहे. या महानगरी कवितेने भाषिक आविष्कारासाठी शहरी व बोली भाषा यांचे रिमिक्स केले आहे. व्यक्तिकेंद्री वास्तवामुळे सामाजिक अस्मिता लोप पावली आहे. सुट्या सुट्या विखंडातून समाजाला आलेलं भय, त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता, स्थिर जीवनमूल्याचा अभाव या आशयसूत्रांची चर्चा केली आहे.
           काळे यांनी या कवितेच्या मर्यादाही सांगितल्या आहेत. महानगराचा अवकाश व्यापक असून मध्यमवर्गीय माणसांव्यतिरिक्तचे कामगार, भिकारी, गुन्हेगारी, वेश्या, हिजडे, अंडरवर्ल्ड, श्रीमंत असे बहुविध जग अजून महानगरी कवितेने कवेत घेतले नाही. भाषिक पातळीवर केवळ चिन्हव्यवस्था (शब्द-प्रतिमा) म्हणजेच कविता असा समज आहे. ही या कवितेची मर्यादाही सांगितली आहे.
          केशव सखाराम देशमुख यांनी ग्रामीण कवितेची अत्यंत परखडपणे पण मौलिक चिकित्सा केली आहे. इतर सर्व प्रवाहाची कविता तिच्या समकालाला भिडताना दिसते, मात्र ग्रामीण कविता अजूनही या बाबतीत असमाधानकारक असल्याचा निष्कर्ष देशमुख यांनी मांडला आहे. खरे तर स्वत: ग्रामीण कवी असूनही त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व विविध कवींचा अभ्यास करून हे निष्कर्ष मांडले आहे, या बद्दल भावी अभ्यासक त्यांचे आभारच मानतील.
           त्यांच्या मते, ग्रामीण कवितेत ‘ग्रामीण’ असे नावालाच राहिले आहे. या कवितेला राजकीय भान नाही. सत्ताकारणाची गंभीर गणिते, शेतकरी आंदोलनामागची सूत्रे, म. फुले यांचे तत्त्वज्ञान, राजेंद्रसिंग राणा, अण्णा हजारे किंवा पोपटराव पवार यांचे शेतिविषयक व सामाजिक कार्य; समाज, सत्ता, धर्म, शिक्षण, उद्योग, बाजार यांचा रोख समजण्याची उणीव, या कवितेत आहे. आज ग्रामीण चळवळ संपली तरी लोकप्रिय ग्रामीण कवितेची व्यासपीठे अजूनही आहेत. गावोगाव ग्रामीण संमेलनातल्या मिरवणारी भावूक कविता निर्माण होते आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
          ही कविता ‘माती, दगड, पाणी, शेत, घर’ यातच गुरफटलेली आहे. ‘भूतकाळ कुरवाळणारी, आई-वडिलांची कृतज्ञता पुन: पुन्हा सांगणारी, ‘माहितीवर बेतलेली आणि भावनांना हात घालणारी धोपट’ कविता असून ‘साहित्य संमेलनाच्या विविध मंचानी कवींना अफूची गोळी दिलेली’ जाणवते. ग्रामीण व्यासपीठे कवींना ‘प्रसिद्धीचे क्षणभंगुर हव्यास हातांवर गुळाचा खडा ठेवून’ संपवतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी रोज अश्रू पुसणाऱ्या कविता येतात, पण वाङ्मयीन मेरीट सिद्ध करणारी कविता निर्माण होत नाही असे मत नोंदवले आहे. रा. ग. जाधव यांनी व्यक्त केलेली केलेली नव्वदच्या दशकातील ‘नव्या भानाची’ अपेक्षा फोल ठरली. त्याऐवजी आज ‘सपाट अर्थाची, पुष्कळ शाब्दिक, निरास गद्यप्रा:य, स्वखुशीत रमणारी’ कविता निर्माण होत असून, ‘जगण्यातील कंगोरे समजून घेण्यात, वर्तमानाची नोंद घेण्यात ही कविता अपुरी’ पडते असे निरीक्षण देशमुख यांनी नोंदवले आहे.
          ग्रामीण कवितेच्या अशा अध:पतनाची कारणे कवींजवळ असलेल्या तत्त्वज्ञानाच्या अभावात आहे. ग्रामीण कवितेला निश्चित अशा प्रेरणा व तात्त्विक भूमिका नाही. उलट इतर साहित्य प्रवाहापेक्षा सामान्य कवीलाही प्रसिद्धी व सन्मान मिळू शकेल इतकी संमेलने आणि पुरस्कारांची व्यवस्था (सहकारी तत्त्वांमुळे) उपलब्ध झाली असून त्यामुळे ही कविता फक्त माती, गाव व शिवार यांविषयी गळे काढत बसली. दु:खाच्या मुळाशी कारण असते, त्याचा शोधच तिने घेतला नाही, असा त्यांचा आक्षेप आहे.
           याचे उत्तर शोधल्यास असे जाणवते की, बहुतेक ग्रामीण कवी हे समृद्ध शेतकरी कुटुंबातील होते. त्यामुळे वाडा व शिवार ही सरंजामी व सुखावह व्यवस्था नष्ट झाल्याचे दुख: त्यांना आहे. या सुखवस्तू कवींचे ग्रामीण जीवनात बलुतेदार व वेसकर यांच्याप्रमाणे शोषण होत नाही. उलट ग्रामीण जीवनातील बहुतेक शोषणाचा केंद्रबिंदू हा  सुखवस्तू बागायतदारच असतो. त्यामुळे ग्रामीण सामाजिक शोषण हा त्यांच्या चिंतनाचा विषय होऊ शकत नाही. शिवाय विठ्ठल वाघ व ना. धों. महानोर आदी कवींनी ग्रामीण सामाजिक जीवनापेक्षा निसर्गाकडेच रोमँटिक दृष्टीने पाहिले; फारतर शहरी कवितेत रोमान्ससाठी आवश्यक असलेला असलेला निसर्ग व बगिच्या त्यांनी शेतातील निवडला इतकेच. त्यामुळे ग्रामीण कविता यांचे अनुकरण करणारी, रोमँटिक; व ग्रामीण कथा द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांचे अनुकरण करणारी विनोदीच जास्त निर्माण झाली. या दोन्हींमुळे कविताच नव्हे तर ग्रामीण कथाही ती वास्तवापासून दूर गेली.
          शिवाय केशव देशमुख म्हणतात त्याप्रमाणे, आकाशवाणी, पाठ्यपुस्तक मंडळे, अभ्यासमंडळे (यावर असेच लोक असल्याने) ‘काव्यलाभाच्या गोष्टी व समीक्षामाऊलीचे प्रेम’ यांमुळे ‘कवितेचे बहुजनीकरण होऊनही’, ‘जी चिन्हे नियतकालिकातील कवींना कळली ती ग्रामीण कवितेला कळली नाही. (मुख्य म्हणजे नियतकालिकातील कवितेला व्यक्तिवादी म्हणून ग्रामीण कवी हिणवतात) यामुळे ग्रामीण कवितेचा नव्वदोत्तरी काळात काही सन्माननीय कवींचा अपवाद वगळता आलेख इतर प्रवाहातील कवितेपेक्षा घसरल्याचेच निरीक्षण या लेखात दिसते. आणखी एक मार्मिक निरीक्षण देशमुख यांनी या लेखात नोंदवले आहे ते असे की अनेक ग्रामीण कथा-कादंबरी आदी लेखनप्रकार सशक्त आहे, तितके काव्य-नाट्य प्रकार का नाही? त्याचेही कारण ही वरील ‘व्यासपीठे’च होत.
          अशी विपुल व्यासपीठे स्त्रीवादी कवितेला लाभली नाही. ती मंचीय व टाळी मिळवणारी नाही. त्यामुळे ती इतर साहित्यप्रवातील कवितेपेक्षा या दशकात अधिक सशक्त झाल्याचे निरीक्षण डॉ. नीलिमा गुंडी यांनी नोंदवले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कविता तिच्या स्त्रीवादी तत्त्वज्ञानाशी एकनिष्ठ आहे. स्त्रीच्या जगण्याचा शोध, विद्रोह, स्त्री-पुरुष नातेसंबंधांच्या प्रचलित कल्पना नाकारणे, पुरुषसत्ताक व समाजाचे पुरुषप्रधान डावपेच या विरुद्ध ती बोलते आहे आणि परिवर्तनाचा दृढ निर्धार ती व्यक्त करते आहे. ही वैशिष्ट्ये डॉ. गुंडी यांनी नोंदवली आहेत.
          स्त्रीवादी अभ्यासक एलेन शो-वॉल्टरने सांगितलेले खास स्त्री-अनुभवाचे क्षेत्र म्हणजे ‘वाइल्ड झोन’ या कवितेत गुंडी यांना दिसते. ऋतूप्राप्ती, स्त्रीच्या शारीरिक, मानसिक अवस्था, गर्भधारणेचा अनुभव, अपत्य संगोपनातील स्तनपानाचा शारीरिक व मानसिक देवाणघेवाणीचा अनुभव असे स्त्रियांच्या अनुभवसृष्टीचे शरीरनिष्ठ वैविध्य, हे ते ‘वाइल्ड झोन’ असून ते कवितेत प्रकटल्याने ही कविता इतर साहित्यप्रवाहातील कवितेपेक्षा अनन्य ठरली आहे. 
          ही कविता काव्य, साहित्य, धर्म व संस्कृतीशी असलेले नाते तपासते. सांकेतिक अभिरुचीच्या मर्यादा ओलांडते. पुराकथांना नवा अर्थ देते. लिंगभावाधारित विषमता दूर करू इच्छिते. आपल्या सहसंवेदनेने ती अधिक समाजाभिमुख होते आणि बलात्कार, हिंसा, दंगली, चंगळवाद, स्त्रीचे वस्तूकरण, स्त्रीभृण हत्या, पर्यावरणविनाश अशा संवेदनशील सामाजिक समस्येवर बोलत राहते.
          स्त्रीच्या जगण्यातच असलेल्या हा सहानुभाव आणि इतरांना आपल्या पोटात वाढू देण्याची जैविक व मानसिक क्षमता ही तिला स्व:पासून समष्टीपर्यंत नेते, तेही प्रचारी व बोधपर नव्हे तर आंतरिकतेने. ही आंतरिकता आपल्याला ग्रामीण कवितेत तर दिसत नाहीच; पण इतर समूहनिष्ठा मानणाऱ्या काव्यापेक्षा स्त्रीवादी काव्यात अधिक दिसते. तात्पर्य स्त्रीवादी कविता आधुनिक व साठोत्तरी काळापेक्षा या काळात अधिक समृद्ध झाल्याचे दिसते.
          याच सामाजिक भूमिकेतून व्यक्त होणारी कविता म्हणजे आदिवासी कविता होय. डॉ. विनोद कुमरे यांनी या कवितांतील आशयसूत्रांचा शोध घेतला आहे. आदिवासी कवितेत आतले आणि बाहेरचे असे दु:खाचे दोन स्तर प्रकटतात. त्यातून आदिवासींचा अजून स्वत:शी असलेला संघर्षही अजून संपला नाही हे अधोरेखित होते. बाहेरच्या लोकांनी केलेली लुडबुड, सुधारणा व विकासाच्या नावाखाली आदिवासींचे केलेले शोषण हा बाहेरचा; तर अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, कुपोषण असा हा आंतरिक संघर्ष आहे. आदिवासी जीवन चित्र-शिल्पकलेत मोठ्या प्रमाणात आले, मात्र त्यांचे वास्तविक जीवन आले नाही अशी खंत व्यक्त केली आहे.
          सहा हजार आदिवासींचे एक मंत्र्याने घडवलेलेले झारखंडमधील हत्याकांड, ओरिसाच्या कलिंगानगरात एका नामांकित उद्योगसमूहानेच केलेली तेरा आदिवासींची हत्या किंवा नक्षलवाद्यांच्या बिमोड या नावाखाली आदिवासींचे रोज होणारे मृत्यू- ही हिंसा- क्रौर्य पाहून थेट लोकशाहीबद्दलच ही कविता प्रश्न विचारते आहे.
          आदिवासी समाजात स्त्रीला कुटुंबप्रमुख ते जोडीदार निवडण्याचे व लैंगिकतेचे स्वातंत्र्य या स्त्रीला होते; मात्र आधुनिक जगाशी आलेल्या संपर्कामुळे याही समाजात पुरुषप्रधानता येऊन स्त्रीला गौण स्थान प्राप्त झाले. जोडीला अज्ञान व अंधश्रध्दा यामुळे होणारे अत्याचार, याविरुद्धचा उद्गारही आदिवासी कवितेत येतो. स्वातंत्र्यसाठी इतर मानवी समूह भविष्याकडे व बाह्य तत्त्वज्ञानाकडे आशेने पाहत असताना आदिवासी मात्र भूतकाळातील त्यांनी उपभोगलेल्या सामाजिक, राजकीय व आर्थिक स्वातंत्र्याकडे तोंड वळवतो आहे. कारण त्याचा भूतकाळ अधिक वैभवी आहे. या वैभवामुळे व इतिहासातील त्याने दिलेल्या लढ्यामुळेच त्याची प्रेरणा भूतकाळ आहे. हे नवेच निरीक्षण समोर येते. या दृष्टीने त्यांनी ‘रानआसवांचे तळे’या कवितेकडे लक्ष वेधले आहे.
          विशेष म्हणजे मुक्ती व स्वातंत्र्यासाठी जात हा अडसर आहे हे भानही या कवितेत असून कवीच आता लोकांचे प्रतिनिधित्व करू पाहतो, ही गोष्टही खूप आश्वासक आहे. आपण आणि समाज यांचे चिंतन करणारी आदिवासी कविता पर्यावरण ऱ्हासाबद्दल, जंगलतोडीबद्दल बोलत आहे. आधुनिक शहरी समाज बौद्धिक जाणिवेने पर्यावरणाशी बांधिलकी जोपासतो. आदिवासी मात्र जंगल, तिच्याशी निगडित अशा संस्कृती व जीवन याचा आंतरिक वेध घेत जातो. आदिवासी कविता व्यापारीकरण, व्यवस्थेने लावलेले सांस्कृतिक निकष या विरुद्ध बोलते आहे.  
          तात्पर्य इतर सर्व साहित्यप्रवाहापेक्षा आदिवासी समाजाचे जीवन व संस्कृती भिन्न असल्याने या कवितेचे व आशयाचे स्वरूपही भिन्न आहे. म्हणूनच कुमरे यांच्या मते, प्रचलित समीक्षा-सौंदर्याचे निकष तिला लावता येणार नाही. आपले सौंदर्यशास्त्र संस्कृत साहित्याचे असल्याने आणि त्या साहित्याने आदिवासींना विकृत, हीन, राक्षस असे हिणवल्याने, आदिवासी सौंदर्यशास्त्राची गरज बोलून दाखवली आहे. मात्र आदिवासी कविता संख्यात्मकतेने जशी वाढली तशी गुणात्मकतेने वाढली नाही, अशी खंत व्यक्त करून कुमरे यांनी त्यासाठी आदिवासी जीवनाच्या खास वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करावयास हवे असे म्हटले आहे.
          कुमरे म्हणतात, जगातील सर्व धर्म, संस्कृती, कलात्मकता, भाषा, लिपी आणि तंत्रज्ञान यांचा स्त्रोत, अलिखित ज्ञानव्यवस्था ज्या आदिवासी संस्कृतीत आहे, त्यावर भर देण्याची गरज आहे. एकूणच काव्याच्या इतर प्रवाहापेक्षा वेगळ्या पद्धतीचे स्वरूप असलेल्या या साहित्य प्रवाहाची व कवितेची अधिक नोंद पुढील अभ्यासकांनी व विद्यापीठाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
          डॉ. भूषण रामटेके यांनी आंबेडकरी साहित्य तत्त्वज्ञानाचा पूर्वपक्ष मांडून नव्वदोत्तरी कवितेचे स्वरूप सांगितले आहे. नव्वदनंतर दलितांवरील अत्याचारात अधिक वाढ झाली. धर्म व जात यांचे अधिक प्राबल्य वाढले. अल्पसंख्यांक-बहुसंख्यांक हा वाद विकोपाला गेला. या सामाजिक वास्तवाची नोंद समता व बंधुता, लोकशाही मानणाऱ्या आंबेडकरवादी कवितेने अधिक केली आहे, याकडे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे एकीकडे आशयाच्या बाबतीत अत्यंत समकालीन असणाऱ्या या कवितेत गुणवत्तेच्या बाबतीत घसरण झाल्याचे व त्याला प्रकाशनाच्या सुलभ परिस्थिती जबाबदार असल्याचे म्हटले आहे.     
          आजची आंबेडकरवादी कविता जागतिकीकरणाच्या व प्रस्थापितांच्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नांना पारंपरिक प्रतिमा- प्रतीकांनी सामोरे जाते; ही कविता अजूनही पहिल्या आंबेडकरवादी कवितेच्या प्रभावातून अजून मुक्त झाली नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नव्वदोत्तरी कविता अधिक व्यापक, व्यामिश्र झाली नाही तर नष्ट झालेली मार्क्सवादी कविता व कोशातच अडकलेल्या ग्रामीण कवितेसारखी तिची अवस्था होईल, असे म्हटले आहे. इतर प्रवाहातील कविता आवर्तात अडकलेली असल्यामुळेच या कवितेची जबाबदारी अधिक वाढली आहे. ग्रामीण कवितेला फुले-आंबेडकरवादी विचारांपर्यंत आल्याशिवाय व आदिवासी- स्त्रीवादी कवितेला फुले-आंबेडकरवाद नाकारून पुढे जाता येत नाही असे म्हणत, सर्वच साहित्यप्रवाहांच्या विकासासाठी  या तत्वज्ञानाची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
          या विशेषांकात पृष्ठसंख्या व पुरेशा वेळेअभावी मुस्लीम, ख्रिश्चन आदी साहित्यप्रवाहातील कविता नोंदवता आली नाही याचा खेद वाटतो. ती उणीव या लेखसंग्रहाचा ग्रंथ करताना भरून काढता येईल. डॉ. अक्रम पठाण या तरुण अभ्यासकाने आपल्या, ‘मुस्लीम मराठी साहित्य’ या ग्रंथात मुस्लीम कवितेबद्दल लिहिले असून त्यात समकालीन मराठी कविता, सांस्कृतिक वास्तव, या कवितेतील वेदना, विद्रोह, प्रकटणारे ताण या आशयसूत्रांचा विचार केला आहे. डॉ. अजीज नदाफ, फ. म. शहजिंदे, बडीउज्ज्मान खावर, ए. के. शेख, खलील मोमीन, इलाही जमादार, इतबार पठाण, इब्राहिम खान, जावेद कुरेशी, नसीमा पठाण, जुल्फी शेख, फातिमा मुजावर, मुबारक शेख, एहतेशाम देशमुख, शेख इक्बाल मिन्ने, अमन तांबोळी, मिर्झा रफी अहमद बेग, शबीर मुलांनी, इक्बाल मुकादम, शफिक शेख, दि. के. शेख, सय्यद अल्लाउद्दिन, ए. एस. पठाण, अजीम नवाझ राही, शफी बोलडेकर या मुस्लीम कवींच्या कवितांबद्दल लिहिले आहे. त्यातून नव्वदोत्तरी समस्यांना सामोरे जाणारी कविता दिसून येते.
          समकालाची समग्र नोंद घेणाऱ्या सर्व नव्वदोत्तरी कवींचे व याचे साकल्याने विश्लेषण करणाऱ्या लेखकांचे व संपादक ढाणके यांचे मनापासून आभार.
अभ्यास साधने
·    कुलकर्णी, द. भि., १९९३ :  दोन परंपरा, नागपूर, विजय प्रकाशन  
·       पठाण अक्रम, २०१४ : मुस्लीम मराठी साहित्य, नागपूर, युगसाक्षी प्रकाशन 
·       धोंगडे अश्विनी, स्त्रीवादी साहित्य : स्वरूप आणि संदर्भ, पुणे, विद्या प्रकाशन
·       डहाके वसंत आबाजी, गणोरकर प्रभा, २००१: संज्ञा –संकल्पना कोश, मुंबई, ग. रा. भटकळ फौंडेशन
·    मालशे मिलिंद/ अशोक जोशी, २००७ : आधुनिक समीक्षा सिद्धांत, मौज प्रकाशन मुंबई,  
·    मुक्तिबोध शरश्चंद्र, नवी मळवाट (दु. आ.), मुंबई, मौज प्रकाशन गृह
§  लेख 
  •   जावरे अनिके, २०००, ए-मे-जून: साहित्य उत्तर आधुनिकतावाद, एक संक्षिप्त परिचय, औरंगाबाद, अभिव्यक्ती 
  •   जोशी, अ. कृ., २००५, फेब्रु : उत्तर आधुनिकतावाद, वाई, नवभारत नवभारत रंगराव, बी., २०१३, ऑनोडि
  •   रंगराव, बी. २००८, ऑनोडि, २००८, : विद्रोही साहित्याचे उत्तर आधुनिक संदर्भ, अमरावती, सर्वधारा 
  •   रंगराव, बी., २०१३, ऑनोडि : आधुनिकता/ उत्तर आधुनिकता, अमरावती, सर्वधारा 
  •       रंगराव, बी., २०१३, वार्षिक विशेषांक, दलित साहित्याची उत्तर आधुनिक मीमांसा औरंगाबाद, अस्मितादर्श 
  •        डहाके, वसंत आबाजी, २०००,ए-मे-जून : उत्तर आधुनिकतावाद आणि उत्तरवसाहतवाद, औरंगाबाद, अभिव्यक्ती
  •       दा. गो. काळे, (संपा) ऑगस्ट,२०१४ : दलित कविता विशेषांक, बुलढाणा, अतिरिक्त

----------------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी : 
- सर्वधारा | जाने-फेब्रु-मार्च | २०१७
- कवितेचा अंत:स्वर, डॉ. देवानंद सोनटक्के, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१८ 


Tuesday, May 5, 2020

साहित्याची प्रयोजने : प्राचीन आणि अर्वाचीन

      


कलावंत कशासाठी कला निर्माण करतो 
आणि रसिक कोणत्या हेतूने तिचा आस्वाद घेतो, स्वीकार करतो या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रयोजनविचार महत्त्वाचा आहे. कलानिर्मिती ही व्यावहारिक गोष्ट नाही, त्यामुळे तिच्या निर्मितीचे प्रयोजन ही गोष्ट गुंतागुंतीची आहे.
      त्यामुळे प्रयोजनाचा विचार कलानिर्मितीमधील महत्त्वाचा विचार आहे.
       साहित्याच्या प्रयोजनाचा विचार प्राचीन आणि आधुनिक साहित्यशास्त्रात सातत्याने चर्चिला गेला आहे. प्रयोजन म्हणजे हेतू किंवा उद्देश होय. 






कवी वा लेखक कोण्या हेतूने उद्देशाने लिहितो, व वाचक कोणत्या हेतूने वाचतो हा निर्मितिप्रक्रियेतील व आस्वादप्रक्रियेतील महत्त्वाचा प्रश्न असून भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही मीमांसकांनी या प्रयोजनांचा विचार केला आहे.
भारतीय साहित्यशास्त्रात मम्मटाने १. यश, २. अर्थप्राप्ती, ३. व्यवहारज्ञान, ४. अशुभनिवारण, ५. कान्तासंमित उपदेश, ६. उच्च आनंद ही प्रयोजने सांगितली आहेत.

१.    यश- यश याचा अर्थ कीर्ती असून लेखनामुळे लेखकाला कीर्ती मिळते असे हे प्रयोजन मानते.  मात्र लेखक कीर्तीसाठी लिहितो असे म्हणणे कठीण आहे असा या प्रयोजनावर आक्षेप आहे.
२.    अर्थप्राप्ती- याचा अर्थ पैसा असू लेखक पैशासाठी लिहितो, असे हे प्रयोजन मानते; मात्र केवळ याचसाठी लेखक लिहितो असेही म्हणणे कठीण आहे.
३.    व्यवहारज्ञान- याचा अर्थ जीवनाचे भान होय. लेखनामुळे वाचकाला नव्या जाणिवा, अनुभव प्राप्त होतात. ललित साहित्याने हे उद्बोधन होते, त्यासाठी लेखक लिहितो व वाचक वाचतो, असे हे प्रयोजन मानते. मात्र जरी जीवनातील सत्याची जाणीव झाली किंवा जिज्ञासापूर्ती झाली तरी हे काही ललित कृतीचे प्रयोजन नव्हे. तो फार तर त्याचा परिणाम मानता येईल, असे आक्षेपकांचे मत आहे.
४.    अशुभनिवारण- याचा अर्थ लेखनामुळे लेखकाचे अशुभ निवारण होणे होय. प्राचीन साहित्यात पदे, आरत्या, क्वचित स्तोत्र यासाठी लिहिली गेली आहेत. देवाची स्तुती केल्याने शंकर रावणावर प्रसन्न झाल्याचे उदाहरण पुराणात आहे. मात्र आधुनिक लेखनाचे हे प्रयोजन मानता येत नाही.
कान्तासंमित उपदेश- मम्मटाच्या मते, वेदशास्त्रातील उपदेश प्रभूसंमित असतो, इतिहासपुराणातील उपदेश सुहृतसंमित असतो, तर काव्यातील कांतासंमित- म्हणजे प्रेमळ पत्नीने मधुर शब्दांनी केलेला उपदेश असतो. ‘मनुष्याच्या अंत:करणाला कोमल स्पर्श करून भावनात्मक आवाहन करणे’ हे कान्तासंमित उपदेशाचे स्वरूप स. रा. गाडगीळांनी सांगितले आहे. मात्र हे देखील फलस्वरूपच आहे, कारण लेखक या हेतूने लिहितो असे मानता येत नाही.
५.    उच्च आनंद- याचा अर्थ व्यावहारिक आनंदापलीकडील उच्चतर आनंद होय. यालाच आध्यात्मिक आनंद म्हणता येईल. पूर्वी काव्याची प्रेरणाच आध्यात्मिक असल्यामुळे हे प्रयोजन मानल्या जात..
        या शिवाय डॉ. स. रा. गाडगीळ यांनी काव्यशास्त्रप्रदीप ग्रंथात आधुनिक १.काव्यनिर्मितीची प्रेरणा ,२.समाजजीवनाला गती देणे ,३.काव्य म्हणजे जीवनभाष्य,४.कला आणि नीती, ५. पलायनवाद आणि वासनातृप्ती, ६. जिज्ञासापूर्ती आणि उद्बोधन ७.आत्माविष्कार आणि शुद्ध आनंद, ८.परतत्त्वस्पर्श ही साहित्यप्रयोजने सांगितली आहेत.
१.    काव्यनिर्मितीची प्रक्रिया –
         मानवाने नवनिर्मितीच्या प्रेरणेतून धर्म, तत्त्वज्ञान शास्त्र यांप्रमाणेच कलेची निर्मिती केली आहे. वास्तवाच्या अभावातून अस्वस्थ झालेला लेखक प्रतिभेने एक अलौकिक सृष्टी निर्माण करतो तिच्या मुळाशी ही निर्मितीची प्रेरणा असते, असे हे प्रयोजन मानणारे सांगतात.
२.    समाजजीवनाला गती देणे –
          साहित्यामध्ये जीवनाचे चित्रण करून समाजजीवनाला गती देणे हे साहित्याचे प्रयोजन असून मराठीतील जीवनवादी लेखक या विचारधारेचे आहेत. कलावंत समाजाचाच भाग आहे, समाजाच्या अंतरंगातील संघर्ष चित्रित करणे हे त्याचे आद्य कर्तव्य आहे, असे वाङमयच पुरोगामी ठरते, असे ही विचारधारा मानते. कलावादी लेखक यालाच बोधवादी किंवा प्रचारकी साहित्य मानतात. या भूमिकेतून हिरीरीने लिहिणे हे एक साहित्य प्रयोजन होय.
        प्रा. देवानंद सोनटक्के म्हणतातआक्षेपकांच्या मते, हे काही साहित्याच्या निर्मितीचे प्रयोजन नव्हे, साहित्याची निर्मिती ही तात्कालिक राजकीय वा सामाजिक गरजा भागविण्यासाठी होत नाही. हे साहित्याचे साक्षात कार्य नव्हे. imaginative creation – कल्पनानिर्मित प्रतिमासृष्टी हेच साहित्याचे कार्य असून ते प्रचारकी साहित्याशी सुसंगत नाही.
३.    काव्य म्हणजे जीवनभाष्य
    literature is the criticism of life असे मॅथ्यू अर्नोल्डचे म्हणणे आहे. डी. एच. लॉरेन्स, टॉलस्टॉय हेही याच मताचे पुरस्कर्ते होते. साहित्य म्हणजे जीवनभाष्य होय. कवीच्या मनातील आदर्श काव्यसृष्टी प्रस्थापित जीवनावर भाष्य करते. उदा. तुकोबांचे प्रबोधनपर अभंग तत्कालीन धर्म, समाज व्यस्थेवरील भाष्य होते किंवा मर्ढेकरांचे काव्य तत्कालीन यंत्रयुगावरील भाष्य होते. म्हणून, असे जीवनभाष्य करणे हे देखील काव्यप्रयोजन असू शकते.
४.    कला आणि नीती
     प्रा. देवानंद सोनटक्के यांच्या मते, नीती ही सामाजिक घटना असून समाजाच्या सुव्यवस्थेसाठी समाजाकडून निर्माण केलेली ती एक मूल्यव्यवस्था असते. काव्याच्या किंवा साहित्याच्या बंधनरहित, स्वैर संचारामुळे समाजजीवनातही स्वैराचार निर्माण होईल. काव्याने, साहित्याने सामाजिक बंधने पाळली पाहिजेत असे नीतीवाद्यांचे म्हणणे आहे.
      कलाकृतीतून मानवी मनावर बरे वा वाईट परिणाम घडवता येतात म्हणून कलावंताने सामाजिक जबाबदारीने आविष्कार करावा असे नीतिवाद्यांचे म्हणणे आहे, तर कला, नीती बोध यांच्या पलीकडे असल्याने नीतीचा विचार करण्याची गरज नाही असे कलावाद्यांचे  म्हणणे आहे. तात्पर्य नीतिवादी किंवा कलावादी- यापैकी एक प्रयोजन ठेऊन लेखक लिहित असतो.

१.    पलायनवाद आणि वासनातृप्ती
      जीवनात दुखी आणि निराश झालेल्यांना आपल्या कल्पनेच्या पंखावर आरूढ त्यांना उच्च आणि अननुभूत आनंद देणे हे कलेचे प्रयोजन शोपन हॉवर, ना. सी. फडके यांनी मानले आहे. हाच पलायनवाद होय.
     देवानंद सोनटक्के यांच्या मते, प्रत्यक्ष जीवनात ज्या वासना म्हणजे इच्छांची तृप्ती होऊ शकत नाही त्यांची पूर्ती काल्पनिक कलेच्या जगात करून घेणे ही वासनातृप्ती कलावंताचे प्रयोजन असते. कवी ग्रेस यांच्या लौकिक जीवनात न लाभलेल्या प्रेयसी व मातृप्रेमाच्या अभावाची पूर्ती म्हणजे त्यांची काव्यनिर्मिती होती. मराठीतील अनेक रोमँटिक कवींच्या कविता या वासनापूर्तीच्या प्रयोजनाने निर्माण झाल्या आहेत.
२.    जिज्ञासापूर्ती आणि उद्बोधन
        अनेक गोष्टी मानव केवळ जिज्ञासेपोटी करत असतो. विश्वाचे आकलन करून घेण्याची जिज्ञासा आणि जग बदलण्याची प्रेरणा म्हणजे नवनिर्मिती. या दोन्ही प्रेरणा काव्यप्रयोजन होय. केशवसुतांची कविता हे या प्रयोजनाचे उत्तम उदाहरण होय.
           उद्बोधन म्हणजे केवळ बोध नसून जीवनाच्या विविध अंगांचे दर्शन घडविणे होय. या प्रेरणेमुळेच मानवी मनाच्या व सांस्कृतिक समृद्धीसाठी लेखक धडपडतो आणि साहित्य वा कला मानवी संस्कृतीचा वारसा ठरते. त्यामुळे उद्बोधन हे प्रयोजन नगण्य मानता येत नाही.
३.    शुद्ध आनंद आणि आत्माविष्कार
         साहित्य वाचनाने होणाऱ्या जिज्ञासातृप्तीने आणि उद्बोधनाने वाचकाच्या ठिकाणी जी वृत्ती तयार होते तिलाच शुद्ध आनंद म्हटल्या जाते. हा आनंदच काव्यानंद असून तो स्थल-काल निरपेक्ष असतो. त्यासाठी रसिकसापेक्ष कल्पनाशक्तीची गरज मात्र असते.
     आपल्याला आलेली अनुभूती प्रतिभान्वित करणे आणि तिला अपूर्व नव्या अशा स्वरूपात प्रकट करणे हे कवीचे कार्य असून त्यामुळे रसिकाच्या ठिकाणी आस्वादाच्या पातळीवर काव्यानंदाची स्थिती निर्माण करणे हेच काव्याचे प्रयोजन मानले जाते. तत्त्ववेत्ता कान्ट यालाच DIS-INTERESTED JOY असे म्हणतो, तर अभिनवगुप्ताने याच प्रतीतीला विश्रांतिकारिणी असे नाव दिले आहे.
                 कवी-लेखकाच्या अंत:करणाला प्रतीत झालेल्या सत्याचा किंवा अनुभवाचा कल्पनारम्य आविष्कार करण्याचा हेतू असणे म्हणजे आत्माविष्कार होय. हा आविष्कार माणसाच्या सर्जनशील प्रवृत्तीतूनच होतो. आपल्या प्रतीभानिर्मित सृष्टीत कवी जीवनातील अनुभवांना नवनवे आकार देण्याची क्रीडा करीत असतो.
         आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभवविश्वातून काही उत्कट व भावलेले अनुभव प्रतिभाशक्तीने अंकित करून प्रकट करणे हेच लेखकाच्या आत्माविष्काराचे प्रयोजन असते.
४.    परतत्त्वस्पर्श
         हे काव्याचे अलौकिक प्रयोजन होय. काव्याचे लौकिक प्रयोजन काहीही असले तरी अलौकिक प्रयोजन आत्मज्ञान व मोक्षप्राप्ती होय असे काहीजण मानतात. ज्ञानदेव-रामदासादी संतकवींचे हेच प्रयोजन होते.
          All true Art Is thus the expression of soul – अशी कलेची व्याख्याच गांधीनी केली होती. या सर्वांच्या विचारांचे सार असे की, विश्वाच्या मुळाशी एक निराकार, निर्गुण चैतन्य आहे. त्याचा सगुण, साकार आविष्कार म्हणजे साहित्य होय. त्यामुळे परतत्त्व हे देखील एक काव्यप्रयोजन आहे.
                  प्रा. अ. वा. कुलकर्णी यांनी याशिवाय काही प्रयोजने सांगितली आहेत.
१. मनोरंजन २. विरेचन ३. अनुभवसमृद्धी ४. स्व-रूपनिष्ठा
१.    मनोरंजन
रंजन ही मानवी मनाची प्रवृत्ती आणि गरज आहे. या मानसिक गरजेतूनच गोष्टी सांगणे आणि ऐकणे यांचा जन्म झाला म्हणून हेच प्रयोजन ठेऊन कथनात्म साहित्य निर्माण केले जाते असे काही अभ्यासकांना वाटते. अर्थात साहित्यात उच्च वाङमयीन अभिरुचीचे मनोरंजन अभिप्रेत असते.
२.    विरेचन
विरेचन म्हणजे कॅथार्सिस. ही ग्रीक तत्त्ववेत्ता अॅरिस्टाटलने मांडलेली संकल्पना आहे. त्याच्या मते, शोकांतिकेच्या दर्शनामुळे त्याच्या दया आणि करुणा या भावनांचे विरेचन होऊन मनुष्याचि चित्तवृत्ती आल्हाददायक होते. म्हणून विरेचन हेच साहित्यकृतीचे प्रयोजन ठरते असे काहींना वाटते. हे लेखक आणि रसिकसापेक्ष प्रयोजन आहे.
३.    अनुभवसमृद्धी
हे वाचकसापेक्ष व लेखकसापेक्ष प्रयोजन आहे. कलाकृती हा लेखकाच्या आत्मशोधाचा एक मार्ग असतो, या शोधातूनच त्याला अनुभवाची समृद्धी प्राप्त होत असते व असे साहित्य वाचून वाचकालाही ही समृद्धी प्राप्त करून देते. या समृध्दीसाठीच लेखन आणि वाचन केले जाते. 
४.    स्व-रूपनिष्ठा
साहित्यकृती ही एक भाषिक संघटना असते. अनुभवाचे हे रूप म्हणजे लेखकाला गवसलेल्या अनुभव- बीजाचा विस्तार असतो. लेखकाने त्या बीजानुभवाशी प्रामाणिक राहून त्याचा विस्तार आणि आविष्कार करणे हे एक लेखन प्रयोजन मानले गेले आहे. मर्ढेकरांनी यालाच वाङमयीन आत्मनिष्ठा म्हटले आहे. भालचंद्र नेमाडे यांनी यालाच लेखकाची नैतिकता मानले आहे.   
 अशाप्रकारे प्रा. सोनटक्के यांनी भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्य प्रयोजनांचा विचार व विश्लेषण केले आहे.
------------------------------------------------------------------------------------
संदर्भ ग्रंथ  :
१.    काव्यशास्त्र प्रदीप, स. रा. गाडगीळ, विजया प्रकाशन, नांदेड, १९८७
२.    साहित्यविचार, अ. वा. कुळकर्णी, प्रतिमा प्रकाशन, पुणे, दु. आ. १९९७
३.    भारतीय साहित्यशास्त्र, ग. त्र्यं. देशपांडे, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, दु.आ.१९६३
४.    रसचर्चा, पद्माकर दादेगावकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई  
संदर्भ लेख :
१.    मी का लिहिते?, कुसुमावती देशपांडे, पासंग , मौज प्रकाशन, मुंबई, १९८७

द. भि. : सहवासाचे जंतरमन्तर : डॉ. देवानंद सोनटक्के

  दभि : सहवासाचे जंतरमंतर :    डॉ.   देवानंद सोनटक्के वर्ष १९९६. त्यावेळी मी एम . ए . साठी नागपूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये मराठी विभागात...